संकुचित मनांसाठी खुल्या मनाने केलेले भाषण

By admin | Published: May 6, 2016 05:19 AM2016-05-06T05:19:42+5:302016-05-06T05:19:42+5:30

एकेकाळी बंगळुरूत ज्यांचे मोठ्या मानाने नाव घेतले जात असे ते मिर्झा इस्माइल आता बंगळुरूवासीयांच्या विस्मरणात गेले आहेत. त्यांनी म्हैसूर आणि जयपूर या दोन्ही राज्यांचे दिवाणपद

Open-ended Speech for Compromised Hearts | संकुचित मनांसाठी खुल्या मनाने केलेले भाषण

संकुचित मनांसाठी खुल्या मनाने केलेले भाषण

Next

- रामचन्द्र गुहा
(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)

एकेकाळी बंगळुरूत ज्यांचे मोठ्या मानाने नाव घेतले जात असे ते मिर्झा इस्माइल आता बंगळुरूवासीयांच्या विस्मरणात गेले आहेत. त्यांनी म्हैसूर आणि जयपूर या दोन्ही राज्यांचे दिवाणपद भूषवले होते. त्यांच्या कारभाराच्या काळात त्यांनी तिथल्या प्रशासनाला आणि सुधारणांना आधुनिक स्वरूप आणले होते. या राज्यांची राजधानी असलेल्या शहरांना अनोखे सौंदर्य प्राप्त करून आधुनिक शिक्षणपद्धतीला चालना दिली होती. म्हैसूर आणि जयपूर या दोन्ही शहरातील काही रस्त्यांना तसेच त्यांनी बांधलेल्या बाजारपेठांनासुद्धा त्यांचे नाव दिले आहे.
मिर्झा इस्माइल हे महात्मा गांधींचे जवळचे मित्र आणि चाहते होते. १९४७ सालच्या सप्टेंबरमध्ये गांधीजींनी कोलकात्यात शांती प्रस्थापित करण्यासाठी उपोषण केले होते, त्या उपोषणाच्या समाप्तीनंतर मिर्झा इस्माइल यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, तुम्ही देशाच्या अत्यंत अडचणीच्या काळात तुमच्याकडून शक्य तेवढी देश सेवा करत आहात. तुमचा हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, शीख या धर्मीयांवर, भारतातील आणि भारताबाहेरील सर्व गटांवर असलेला नैतिक प्रभाव या क्षणी तरी सर्वोच्च आहे. मिर्झा इस्माइल यांनी १९४५ साली बनारस हिंदू विद्यापीठात पदवीदान समारंभात दिलेले भाषण नुकतेच माझ्या वाचनात आले. त्यावेळी विद्यापीठाचे उपकुलगुरू होते विचारवंत सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांनी म्हैसूर येथील महाराजा कॉलेजात अध्यापन केले होते आणि ते मिर्झा इस्माइल यांना चांगले ओळखत होते. मिर्झा यांनी त्यांच्या भाषणात सर्वात आधी राधाकृष्णन यांचे आमंत्रणाबद्दल आभार मानले होते. भाषण पुढे चालू ठेवत त्यांनी श्रोत्यांचे लक्षच वेधून घेतले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा गांधी आणि काँग्रेसचे नेते अटकेत होते तेव्हा जिना आणि मुस्लीम लीग यांनी वेगाने मोठा टप्पा गाठला होता. हाच संदर्भ ठेवून मिर्झा इस्माइल यांनी असे म्हटले होते की, एखादा माणूस जेव्हा स्वत:च्या धर्माची महत्त्वाची मूल्ये आणि सत्य खोलवर जाऊन समजून घेतो तेव्हाच तो दुसऱ्यांच्या धर्माविषयी जबाबदारीने वागत असतो. पण दुर्दैवाने १९४५ ते ४६च्या दरम्यान भारतात धर्म विस्मृतीत गेला होता आणि स्वार्थी, संकुचित कल्पनांनी धर्मांना वेढले होते. सगळेच गट युद्धग्रस्त परिस्थितीत होते आणि आपआपल्या धर्माला अप्रतिष्ठा प्राप्त करून देत होते.
धर्माची कल्पना आणखी उचित, उदात्त आणि हितकारी व्हावी म्हणून मिर्झा इस्माइल यांनी अशी विचारणा केली होती की, बनारस आणि अलिगढ या दोन्ही विद्यापीठांनी एकमेकांच्या सहकार्याने, सर्व ताकद पणाला लावून मोठे कार्य का उभे केले नाही? त्यांना खात्री होती की दोन्ही विद्यापीठात ही इच्छाशक्ती होती आणि त्यांच्या एकमेकांतल्या सहकार्याने भविष्याचे चित्र उज्ज्वल राहील. मिर्झा इस्माइल यांचा असा विचार होता की अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांच्यातले सहकार्य खूप खोलवर रुजले पाहिजे आणि या सहकार्याचा सकारात्मक परिणाम संघर्षरत गटांवरसुद्धा होऊ शकतो. त्यांचा विश्वास होता की सगळ्याच विद्यापीठातील प्रत्येक पदवीधर आणि चांगले विद्यार्थी भारतीय समाजात हक्क आणि सुविधांचे दूत म्हणून काम करतील. त्याच्या तीन वर्षांपूर्वी, गांधीजींनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात भाषण केले होते. गांधींनी त्यांच्या भाषणात बनारस हिंदू विद्यापीठाला असे आवाहन केले होते की, त्यांनी ज्या विद्यापीठांच्या नावात मुस्लीम शब्द आहे त्यांच्याशी संवाद वाढवावा. गांधीजींनी श्रोत्यांना असा प्रश्नसुद्धा केला होता की तुम्ही अलिगढ विद्यापीठातील तरु णांना तुमच्या विद्यापीठाकडे आकर्षित करू शकतात का? तुम्ही त्यांच्यासोबत ओळख वाढवू शकतात का? गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे हेच बनारस विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मुख्य कार्य आणि विद्यापीठाबद्दलचे कर्तव्य होते. मला माहीत नाही, की बनारस विद्यापीठात भाषण देण्यापूर्वी मिर्झा इस्माइल यांनी गांधीजींचे भाषण वाचले होते की नाही. पण मिर्झा इस्माइल यांचा परस्पर सौहार्दावर प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी पाकिस्तान चळवळीला प्रखर विरोध केला होता. कदाचित म्हणूनच त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाला अलिगढ मुस्लीम विद्यापीठासोबत सहकार्य वाढवण्यासाठी आवाहन केले होते, त्यातून ते देशाचे मोठे हित बघत होते. त्यांच्या भाषणात इस्माइल यांनी विज्ञान, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विषय छेडला होता. त्यांनी असे म्हटले होते की, या तीन गोष्टीतून बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत; पण त्यांचा चांगला आणि वाईट उपयोगसुद्धा होऊ शकतो या विषयी सजग केले होते. त्यावेळी नुकतेच हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्बचा वापर करण्यात आला होता. इस्माइल यांनी दूरदर्शीपणा राखत इशारा दिला होता की लवकरच अशा असुरी शक्ती जगातील बऱ्याच देशांकडे असतील. रेडिओच्या संशोधनाविषयी बोलताना ते म्हटले होते की, रेडिओचा वापर जेव्हापासून सुरू झाला आहे, तेव्हापासून त्याचा उपयोग असत्यावर आधारित कार्यक्रमांचा प्रचार करण्यासाठी आणि राष्ट्रीय धोरणात विसंगती निर्माण करण्यासाठी होऊ लागला आहे. औद्योगिक आणि आर्थिक विकासावर बोलताना मिर्झा इस्माइल म्हटले होते की, जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा एकच ध्येय असले पाहिजे ते म्हणजे नागरिकांना पुरेसा रोजगार आणि चांगले जीवनमान, त्यांची सध्याच्या बिकट अवस्थेतून मुक्ती व्हायला हवी.
भाषणाच्या अंतिम भागात या सच्च्या भारतीयाने विद्यापीठांनी उत्तम शिक्षण देताना विद्यार्थ्यांचे जीवन कशाप्रकारे वैचारिक, वाचिक आणि कृतिशील पातळीवर समृद्ध करावे याचा ऊहापोह केला होता. त्यांनी म्हटले होते की, विद्यापीठाच्या प्रशासकांनी खुल्या मनाने कारभार करावा कारण लवचिकता नसलेले मन हे चंचल मनापेक्षा अधिक घट्ट असते. त्यांनी पुढे असे म्हटले होते की, ज्यांचे मन रिकामे आहे आणि संकुचित आहे असे देशात खूप आहेत. मिर्झा इस्माइल यांचे भाषण दीर्घकाळासाठी उचित आहे आणि ते सध्या देशातील विद्यापीठात असलेल्या परिस्थितीला साजेसे आहे. देशातील विद्यापीठे सध्या अशांत वातावरणात आहेत, त्याला काहीअंशी जबाबदार आहेत ते तिथले प्रशासक जे नवनिर्मितीपेक्षा संकुचितपणाला प्राधान्य देत आहेत. दुसरे कारण असे की विरोधी राजकीय विचारसरणी असल्याने काही विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सत्यशोधनाच्या कार्याला रोखण्यात आले आहे.
मिर्झा इस्माइल यांचे भाषण देशभरातील उप-कुलगुरुंनी, शिक्षणसंस्था चालकांनी, विद्यापीठ आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी वाचायला हवे, अभ्यासायला हवे. हे भाषण वाराणसीचे खासदार यांनीसुद्धा वाचायला हवे. हे भाषण इंडियन एन्युअल रजिस्टर, १९४५च्या पहिल्या आवृत्तीत प्रकाशित झालेले आहे. त्याची एक प्रत माझ्याकडे आहे तशीच ती भारतातील कुठल्याही संपन्न वाचनालयात असायला हवी.

 

Web Title: Open-ended Speech for Compromised Hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.