‘या’ची सांगता निवडणुकीतच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:45 AM2018-12-31T05:45:14+5:302018-12-31T05:45:54+5:30

पराभवाची चिन्हे दिसू लागताच भाजपाने आपली पातळी सोडून अत्यंत घृणास्पद अशा खासगी आरोपांना सुरुवात केली आहे. अशा आरोपांसाठी सामान्यपणे स्त्रियांना लक्ष्य बनविले जाते.

 The only one in the elections is in the elections | ‘या’ची सांगता निवडणुकीतच

‘या’ची सांगता निवडणुकीतच

Next

पराभवाची चिन्हे दिसू लागताच भाजपाने आपली पातळी सोडून अत्यंत घृणास्पद अशा खासगी आरोपांना सुरुवात केली आहे. अशा आरोपांसाठी सामान्यपणे स्त्रियांना लक्ष्य बनविले जाते. भाजपानेही त्याच मार्गाने जाऊन अगुस्ता वेस्टलॅण्डच्या सौद्यातल्या दलालामार्फत सोनिया गांधींचे नाव त्यात समोर आणले आहे. हे नाव पुढे आणतानाही त्याने त्याच्या कुजबुजीच्या पद्धतीनुसार पूर्ण आरोप समोर न आणता ते नाव काहीशा गूढ पद्धतीने व समाजात संशय उत्पन्न होईल अशा तºहेने समोर केले आहे. राफेल प्रकरणातील मोदी सरकारची व त्याने नेमलेल्या अनिल अंबानी या दलालाची ४० हजार कोटींची दलाली पुढे येताच भाजपाला असे काही करणे आवश्यकही होते. अगुस्ता वेस्टलॅण्ड हा खटला गेले कित्येक महिने सुनावणीला आला आहे व आर्थिक चौकशी करणाऱ्या यंत्रणा त्याचा तपास पूर्ण करीत आल्या आहेत. त्यात आजवर अनेक नावे पुढे आली. पण सोनिया गांधी व गांधी कुटुंबातील कुणाचेही नाव त्यात कधी घेतले गेले नाही. त्यामुळे हा वार वाया जाणार असे लक्षात येताच कोणत्या तरी अनधिकृत चिठ्ठीत सोनिया गांधींचे नाव आल्याचे पुढे करून त्यांना या प्रकरणात गोवण्याचा दुष्ट डाव भाजपाने रचला आहे. सुमारे ३६०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात आजवर कोणत्याही बड्या व्यक्तीचे नाव आले नसले तरी त्याच्या बातम्या जोरात येतील याची काळजी सरकारने घेतली आहे. आताही या खटल्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने एका कागदावर ‘इटालियन स्त्री व तिचा मुलगा’ असे कोणतेही नाव न लिहिता ती चिठ्ठी आपल्या वकिलाकडे दिली. ती स्त्री कोण याची माहिती आर्थिक तपासणी यंत्रणेला नाही, सरकारला नाही व संबंधित न्यायासनासमोरही ती आली नाही. भाजपाच्या प्रवक्त्यांनी मात्र हाती हत्यार आल्यासारखे सोनिया गांधींचे नाव पुढे करून जणू काही या साºया खटल्यामागे त्याच आरोपी आहेत, असा कांगावा सुरू केला आहे. मुळात देशातील सगळ्या आर्थिक तपासणी यंत्रणा आता सरकारच्या हातच्या बाहुल्या बनल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका समोर आहेत आणि ६ मार्चला त्यांची आचारसंहिता लागू होत आहे. पुढे आरोप करता येत नाहीत. नव्या योजना जाहीर करता येत नाहीत. रामाचे मंदिर तेवढ्यात बांधून होत नाही. मात्र या काळात राफेल विमानांच्या खरेदीचा घोटाळा त्याच्या निकालापर्यंत जाऊ शकतो. त्याआधी आपल्या बचावासाठी एक आक्रमक हत्यार मोदींना आणि त्यांच्या पक्षाला हवे आहे. शिवाय ते गूढ असेल व त्यातून फक्त संशय निर्माण होईल असेही ते हवे होते. ते आता त्याला या रूपाने मिळाले आहे. आता ‘हा आर कोण’ आणि ‘ही इटालियन आई कोण’ एवढे जरी प्रचारात आणले तरी मोदींना त्याचे राजकारण करता येणार आहे. मात्र हा कमालीच्या हीन पातळीवरचा प्रकार आहे आणि काँग्रेसच्या आनंद शर्मांनी तसे म्हटलेही आहे. मात्र कुजबुज चालू ठेवणे व गुप्त पातळीवरील प्रचाराला ऊत आणणे यावर संघ परिवाराचा भर नेहमीच राहत आला आहे. त्याचाच उपयोग ते या वेळीही करतील. कोणत्याही संशयावर त्याला बचावाची संधी न देता व त्यातील आरोपांची पूर्ण माहिती न देता त्याला कोर्टाबाहेर बदनाम करीत सुटणे हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर पातळीहीन आहे. तो खासगी व संस्थात्मक पातळीवर केला गेला तरी तो कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने निर्भयपणे करताही येतो. असा प्रचार एकेकाळी संघ परिवाराने राजीव गांधींना बदनाम करण्यासाठी बोफोर्स विमानांबाबत केला. मात्र एवढ्या वर्षांनंतरही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आताचे हेलिकॉप्टर प्रकरण त्याच प्रकाराचा वापर करून सोनिया व राहुल गांधी यांच्याविरुद्ध चालविले जाईल. ते तसे चालू ठेवणाºया यंत्रणा मोदींजवळ आहेत शिवाय त्यांच्या ताब्यात असलेल्या माध्यमांच्या व ड्रोन्सच्या फौजाही त्यांना या कामात जुंपता येणार आहेत. त्यामुळे बदनामीची ही मोहीम आता दीर्घकाळ चालणारही आहे. तिला उत्तर द्यायचे ते मतपेटीतून द्यावे लागणार आहे. कारण संशयांना उत्तर देता येत नाही आणि ज्याला उत्तर देता येईल, असे आरोप या प्रकरणात कुणी करताना दिसत नाहीत. तीन राज्यांत आपटी खाल्ल्यानंतरही ज्याची बुद्धी ताळ्यावर आली नाही, त्या सूडबुद्धीने पेटलेल्या पक्षाच्या या मोहिमेची सांगता येत्या निवडणुकीतच करावी लागणार आहे.

Web Title:  The only one in the elections is in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.