ऑनलाइन गेमिंग! संधी की संकट? कायदेशीर अन् बेकायदेशीर खेळांमधील फरक मुलांना समजावून सांगणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:27 IST2025-09-21T09:27:03+5:302025-09-21T09:27:15+5:30
मुद्द्याची गोष्ट : राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण हे कला, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारे ठरले. केंद्राने त्याच काळात ऑनलाइन गेमिंग व बेटिंगविरोधी कायदा करून, आर्थिक धोके रोखण्याचे पाऊल उचलले. एकीकडे रोजगारनिर्मिती व खेळांना प्रोत्साहन, तर दुसरीकडे सट्टेबाजीवर बंदी. या दोन घटना समजणे आवश्यक आहे.

ऑनलाइन गेमिंग! संधी की संकट? कायदेशीर अन् बेकायदेशीर खेळांमधील फरक मुलांना समजावून सांगणे गरजेचे
डॉ. दीपक शिकारपूर
उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक
कौशल्यावर आधारित ऑनलाइन खेळांविषयी विचार करता, हे गेम्स पूर्णपणे स्पर्धात्मक कौशल्य, अभ्यास, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार यावर आधारलेले असतात. यात बुद्धीला चालना देणारे व्हिडिओ गेम्स, पझल्स, क्विझ, शैक्षणिक ॲप्स तसेच टीमवर्क वाढवणारे मल्टीप्लेयर गेम्स यांचा समावेश होतो. हे गेम्स विद्यार्थ्यांचे विषयातील ज्ञान वाढवतात, त्यांच्यातील तार्कीक विचारशक्ती आणि वेगवेगळ्या विषयांच्या कौशल्याचा विकास करतात.
उदाहरणार्थ, भाषिक कौशल्यासाठी शब्दकोडी, गणिती विचारसरणीसाठी गणिती पझल्स, किंवा विज्ञान, इतिहास, भूगोल विषयांचा प्रत्यय आणून देणारे शैक्षणिक सिम्युलेशन गेम्स हे विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरतात. ते मुख्यतः मनोरंजन व शिक्षण याची सांगड घालतात. अशा गेम्समध्ये आर्थिक व्यवहार किंवा लकी ड्रॉ सारखी संधी किंवा आकर्षण नसते, त्यामुळे अपायकारक व्यसनोत्सुकता अथवा सामाजिक, आर्थिक धोके उद्भवत नाहीत.
निखळ करमणुकीसाठी विकसित ॲनिमेटेड फिल्म्स यांचे स्वरूप बऱ्याच प्रसंगी मूल्यशिक्षण, सर्जनाशी व्यक्तिमत्व विकास, कल्पनाशक्तीला वाव देणे आणि आरामदायक विरंगुळा हेच असते. ॲनिमेटेड फिल्म्स या मुलांसाठी तसेच प्रौढांसाठीही तितकेच आकर्षक माध्यम असतात. या माध्यमातून सृजनशील कथानक, गोड संगीत, रंगीत पात्रे आणि तंत्रज्ञानाचा मनोवेधक उपयोग पाहायला मिळतो. या फिल्म्स ज्ञानवर्धनासोबत मनोरंजन, दैनंदिन जगण्याचा गोडवा, संस्कार, जीवनमूल्यांचे संदेश, सामाजिक प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रभाव पाडतात. उदा हनुमान, महावतार नरसिंह आदी.
तिसरा प्रकार म्हणजे पैसे लावावे लागणारे जुगार किंवा बेटिंगचे खेळ. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातून निर्माण होणारा फक्त निव्वळ आर्थिक लाभ अथवा तोटा या भावनेला केंद्रस्थानी आहे. कौशल्य, शिक्षण किंवा आरोग्य या काहीच गोष्टींशी याचा थेट संबंध नसतो. पैसे किंवा मालमत्तेवर सट्टा लावून येणाऱ्या अपयश-यशाचा प्रवास हा अनेकदा नशेशिवाय, अनियंत्रित, विकृत आणि व्यसनात्मक असतो. यात लकी ड्रॉ, कार्ड्स, नंबर गेम्स, कॅसिनो गेम्स, ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या खेळांवर फेस-टू-फेस किंवा ऑनलाइन सट्टेबाजी, अशी रूपे आहेत.
कोणते तीन पैलू स्पष्ट दिसतात?
तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन गेमिंगचे तीन पैलू स्पष्ट दिसतात – शिक्षण व कौशल्यवर्धन, संस्कार आणि मनोरंजन देणारे ॲनिमेशन आणि व्यसनमूलक जुगार. पहिले दोन अंग समाजासाठी उपयुक्त तर तिसरे अंग विनाशकारी. त्यामुळे तरुण पिढीला योग्य वेळी मार्गदर्शन देणे ही पालक, शिक्षक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
AVGC-XR धोरणात काय?
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटीला प्रोत्साहन
कला, कौशल्य व तंत्रज्ञान यांचा संगम
रोजगार निर्मिती आणि तरुणांना संधी
सुरक्षित गेम्सचे फायदे
पझल्स व क्विझमुळे ज्ञानवृद्धी
भाषिक व गणिती कौशल्य वृद्धिंगत
टीमवर्क आणि तार्किक
विचारशक्ती वाढ
जुगाराचे धोके
आर्थिक नुकसान आणि कर्जबाजारीपणा
मानसिक ताण व नातेसंबंधातील तणाव
गुन्हेगारी व व्यसनाचा धोका
पालक व शिक्षकांची भूमिका
आज मोबाइल हा मुलांच्या हातात सहज पोहोचतो. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करणे अपरिहार्य आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर खेळांमधील फरक मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. सुरक्षित, शिक्षणपूरक गेम्स निवडून देणे, तसेच मैदानावरील खेळ, वाचन, कला व छंद याकडे वळवणे आवश्यक आहे. पालक स्वतः मोबाइल व्यसनात अडकले तर मुलांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. शाळा-महाविद्यालयांत नागरिकशास्त्र विषयात ऑनलाइन व्यसनाचे दुष्परिणाम शिकवले गेले पाहिजेत.
श्रीमंत होण्याचा हव्यास...
हे खेळ सुरुवातीला चित्तथरारक, मोहक आणि ‘लवकर श्रीमंत होण्याचा’ हव्यास निर्माण करणारे असले तरी पुढे जाऊन आर्थिक नुकसान, मानसिक आरोग्याच्या समस्या, सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये तणाव आणि अनेकदा गुन्हेगारी जन्मास घालतात. यामुळेच यावर कायद्याने बंदी आहे.