एक दिवस मुंबईबुडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 05:22 AM2020-10-10T05:22:20+5:302020-10-10T05:22:36+5:30

गेल्या काही वर्षांत आपण सारेच मुंबईसोबत जे वर्तन करीत आहोत ते पाहता एक दिवस आपल्या सर्वांसकट मुंबई बुडणार आहे. त्या दिवशी कदाचित आरोप-प्रत्यारोप करायला आपण कुणीच हजर असणार नाही.

One day Mumbai will sink due to develop projects | एक दिवस मुंबईबुडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ!

एक दिवस मुंबईबुडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ!

Next

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

परतीच्या पावसाने मुंबईला तुफान तडाखा दिला आणि वरळी, परळ, दादर वगैरे भागात जमलेल्या, घराघरांत घुसलेल्या तुफान पाण्याची, बुडालेल्या वाहनांची दृश्ये, छायाचित्रे सर्वत्र फिरू लागली. समुद्रालगत असलेल्या मुंबई शहराला साचलेले पाणी नवे नाही. ज्याप्रमाणे ‘मुंबईची तुंबई’ होणे नवे नाही तसेच दरवर्षी मुंबई बुडाली की, राजकीय आरोप-प्रत्यारोप हेही नवे नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत आपण सारेच मुंबईसोबत जे वर्तन करीत आहोत ते पाहता एक दिवस आपल्या सर्वांसकट मुंबई बुडणार आहे. त्या दिवशी कदाचित आरोप-प्रत्यारोप करायला आपण कुणीच हजर असणार नाही.



याच पावसाळ्यात अशीच एकाच दिवशी महिनाभराची वृष्टी झाल्यानंतर मंत्रालयासमोरील रस्त्यावर व गिरगाव चौपाटीसमोर तुफान पाणी साचले होते. त्यातून वाट काढून घरी पोहोचलेल्या शरद पवारांनी ‘मंत्रालय व गिरगाव चौपाटीसमोर एवढे पाणी आपण कधी पाहिले नाही’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मुंबईत एकाच दिवशी भरमसाठ पाऊस होण्याचा मोठा इतिहास आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात दहा वर्षांत एक-दोनवेळा तसे घडत होते. मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रसंग वरचेवर येऊ लागले आहेत. ग्रामीण भागात पावसाच्या बरसण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने शेतीचे जसे नुकसान झाले आहे तसे मुंबईत पावसाच्या पद्धतीत बदल झाल्याने येथील जनजीवनावरही परिणाम झाला आहे.



मात्र आपण ना त्या बदलेल्या पद्धतीचा गांभीर्याने विचार करीत आहोत ना मुंबई शहरातील वाढत्या बांधकामांचा विचार करीत आहोत. गेल्या काही वर्षापासून मुंबईत दोन मोठी कामे सुरू झाली आहेत. एक मेट्रो रेल्वे-तीन प्रकल्पाचे तर दुसरे कोस्टल रोडच्या बांधकामाचे. मेट्रो प्रकल्पाकरिता मुंबईच्या पोटात खोदकाम केले गेले. मुंबईच्या वाहतुकीकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सॉईल टेस्टिंगपासून अनेक तांत्रिक बाबी तपासून प्रकल्प राबवला असला तरी ही कामे करताना यापूर्वी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांची हजारो कोटी रुपये खर्च करून केलेली कामे मेट्रोच्या कामामुळे विस्कळीत तर झालेली नाहीत ना?- याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे. दक्षिण मुंबईतील शेकडो वर्ष जुने वृक्ष यंदा पावसाळ्यात उन्मळून पडणे, मलबार हिल येथे दरड कोसळणे हे मेट्रोच्या कामामुळे जमीन भुसभुशीत होण्याचे परिणाम तर नाहीत ना, याचा शास्रीय अभ्यास व्हायला हवा.



नरिमन पॉइंट परिसरात कोस्टल रोडचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरिता हरकती-सूचनांची सुनावणी न घेतल्याने पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली नाही. मागील सरकारने हा प्रकल्प राष्ट्रीय हिताचा असल्याने तसे केल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. मात्र तो स्वीकारला गेला नाही. सर्वोच्च न्यायालयात याबाबतची याचिका प्रलंबित आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस जशी स्थगिती मिळाली तशी ती कोस्टल रोडच्या उभारणीस मिळाली नाही. परिणामी गेल्या सहा महिन्यांत म्हणजे कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई ठप्प झालेली असताना या प्रकल्पाचे काम वाऱ्याच्या वेगाने सुरू आहे. कदाचित भविष्यात प्रकल्पाचे बांधकाम इतपत होईल की, ती ‘टाळता न येण्याजोगी’ बाब झाल्याने न्यायालयाचे हात बांधले जातील, असा विचार सत्ताधारी करीत असतील. कोस्टल रोडमुळे बिल्डरांचे उखळ पांढरे होणार आहे.



मुंबईत पाणी तुंबल्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिगत पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे सांगितले. मुंबईत अशा पाण्याच्या टाक्या उभारण्याकरिता कुठे जागा शिल्लक आहे तेही सांगितले असते तर उत्तम झाले असते. मैदानांचे भूखंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सना आंदण देऊन अनेक मोकळ्या जागा संपुष्टात आणलेल्या आहेत. रस्ते काँक्रिटीकरण, सिमेंटचे पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे साचलेले पावसाचे पाणी मुरण्याची सोय राहिलेली नाही. तात्कालीक लाभाच्या निर्णयांचे परिणाम सध्या मुंबईकर भोगत आहेत.



मुंबईत अगदी सुरुवातीला बॅकबे रेक्लमेशन झाले. त्यानंतर मिठी नदीमध्ये भराव घालून वांद्रे-कुर्ला संकुल उभे केले गेले. सीआरझेडच्या सक्त नियमांमुळे काही काळ भराव घालण्यास चाप लागला. मात्र २०१२मध्ये सीआरझेडचे नियम सैल झाल्यापासून ठिकठिकाणी भरावाचे छोटे-मोठे प्रयत्न सुरू आहेत. दादर, मालाड, जुहू, वर्सोवा येथील काही भागात समुद्र आत घुसला आहे. समुद्राची पातळी वाढत असल्याचे कोस्टल रोडच्या निमित्ताने केलेल्या अभ्यासातच नमूद केले आहे. त्यामुळे एक दिवस मुंबईच्या आणि अर्थातच आपल्याही नाकातोंडात नक्की पाणी शिरेल.

Web Title: One day Mumbai will sink due to develop projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.