आता फक्त चमत्कारच..
By Admin | Updated: July 23, 2014 10:47 IST2014-07-23T10:47:24+5:302014-07-23T10:47:46+5:30
तिकडे अजितदादांनी सारी प्रतिष्ठा सिंचनात घालवली, असे काँग्रेसने म्हणायचे आणि त्याच्या सभासदांनी टाळ्या पिटायच्या. अशा स्थितीत ही माणसे जनतेशी नाते कशी जुळविणार आहेत?

आता फक्त चमत्कारच..
>राज्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ हमखास निवडून येता येईल, असा खात्रीशीर मतदारसंघ नाही, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कधी निवडून येत नाही आणि दिल्लीहून येणारा प्रभारी कोण आहे, तो काय करतो आणि येतो तरी कशासाठी, हे कोणाला सांगता येत नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था आहे. त्यातच नारायण राण्यांनी बंड पुकारल्यासारखे करून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपण राजीनामा दिल्याने आपल्या मागे कोकणातली माणसे झुंडीने येतील, अशी खात्री बाळगून ते तिकडे गेले; पण त्यांच्या दर्शनालाही कुणी फिरकले नाही. सरकारला स्थैर्य नाही, मंत्र्यांना पाठिंबा नाही, पक्षात जोर नाही आणि हे सारे सावरायला कोणी पुढे येताना दिसत नाही. तिकडे शरद पवारांचा पक्ष केवळ नशिबाच्या जोरावर तरला आहे. प्रत्यक्ष सुप्रियाबाईंना निवडणूक जड गेली आणि बाकीचे जे तीन जण परवा निवडून आले, ते कसे आले ते त्यांनाच माहीत. जाणकार म्हणतात, खुद्द शरद पवार असते, तरी त्यांची हालत खस्ता झाली असती. राज्यसभेत जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी पुढचे वास्तव दिसत असल्याने घेतला होता. पराभवाला महिने लोटले, पण पक्षात कसली हालचाल नाही. कोणी आखाड्यात जात नाही आणि पुढची कुस्ती कशी लढायची, याची चिंता करीत नाही. लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच पक्षाने हातची शस्त्रे जमिनीवर ठेवली होती. इथे तर ती जमिनीवरून उचलण्याच्या तयारीतही कोणी दिसत नाही. मराठय़ांना आरक्षण देऊन झाले आणि मुसलमानांनाही ते देण्याचे औदार्य करून झाले. ज्या काळात आरक्षण संपविण्याची चर्चा देशात सुरू झाली, त्या काळात महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांना हे सुचले. त्याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता अर्थातच नाही. कारण, सारे मराठे आत्ताच सत्तेत आहेत आणि ज्या मेट्यांनी त्या आरक्षणाचा नारा दिला, ते परपक्षात गेले आहेत. राण्यांमुळे राजकारणात भूकंप होईल, असे भाकीत त्यांच्या भगतांनी केले होते. पूर्वी शेषनागाने फणा हलविला की भूकंप होतो, असे म्हणत. राण्यांमध्ये शेषनागाचे बळ नाही. ‘मी आणि माझे दोन बछडे’ एवढय़ापुरते र्मयादित राजकारण करणारी आणि इतरांना कस्पटासमान लेखणारी माणसे कशाचा भूकंप घडवितात? त्यांनी त्यांच्यापुरते हलून दाखविले तरी पुरे. तिकडे अजितदादा १४४ नाही, तर २८८ अशा गमजा करीत आहेत. शरदकाकांनी कानपिचक्या दिल्या, तरी त्यांचे तसे उंडारणे चालूच आहे. सगळी जाणकार व शहाणी माणसे त्यांनी त्यांच्या कोंडदेवांवरील छुप्या हल्ल्याने गमावली आहेत, भांडारकरांवरील हल्ल्यातल्या गुन्हेगारांना संरक्षण देऊन त्यांनी सारी सदिच्छा गमावली आहे काँग्रेस पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी जोवर सारा देश व त्यातली सारी माणसे आपली मानली, तोवरच देश व समाज त्यांच्या मागे गेला. गांधीजींपासून राजीव गांधींपर्यंतचे त्यांचे राजकारण सर्वसमावेशक होते. त्यांनी तुकड्यांचे राजकारण केले नाही. आताचे मराठी काँग्रेसवाले तुकड्यांच्या पलीकडे पाहत नाहीत. त्यांच्यातल्या राण्यांसारख्यांना तर तुकडाही नको, ते आणि त्यांचेच तेवढे हवे. हा निवडणुकीच्या तयारीचा मार्ग नाही. ही आत्मनाशाची तयारी आहे. ऑक्टोबर महिन्यात निवडणुका व्हायच्या आहेत. ऑगस्ट महिन्यात आचारसंहिता लागू होईल. हाताशी उरलेल्या ४-६ आठवड्यांत ही माणसे कितीसे दिवे लावणार वा लावू शकणार आहेत? पाच वर्षांत जे करता आले नाही, ते पाच आठवड्यांत करून दाखवण्याचे आव्हान ही दुबळी माणसे कशी पेलणार आहेत? दिल्लीवाले दिल्लीत खचले आहेत आणि मुंबईकरांना महाराष्ट्रात साध्या सभाही घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस पक्षाचे मराठी जनतेशी आजवर राहिलेले नाते कसे तुटले व ते कोणी तोडले याची साधी चर्चाही या दुबळ्या मनाच्या माणसांना आजवर करावीशी वाटली नाही. ज्यांना पराभव काही शिकवत नाही, त्यांना विजयही मिळविता येत नाहीत. चिखलात रुतलेल्या अशा अवघड अवस्थेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पडित पक्षांची आपसातली भांडणे मात्र जोरात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही संपत नाहीत. मुख्यमंत्री अपात्र आहेत, असे राण्यांनी म्हणायचे आणि राष्ट्रवादीने त्यावर हसायचे. तिकडे अजितदादांनी सारी प्रतिष्ठा सिंचनात घालवली, असे काँग्रेसने म्हणायचे आणि त्याच्या सभासदांनी टाळ्या पिटायच्या. अशा स्थितीत ही माणसे जनतेशी नाते कशी जुळविणार आहेत? याही स्थितीत त्यांना ते जुळविता आले, तर तो चमत्कार म्हणावा लागेल, अन्यथा आत्मघात आहेच.