जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 09:37 IST2024-12-18T09:36:31+5:302024-12-18T09:37:27+5:30

पण, त्याची ही दोन्ही मुलं मात्र नाराज आहेत. 

novak djokovic children do not have their own mobile phones | जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही!

जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही!

दहा वर्षांचा मुलगा स्टीफन आणि सात वर्षांची मुलगी तारा. स्थळ बेलग्रेड, देश सर्बिया. ही दाेन्हीही मुलं शाळेत जातात. त्यांच्याकडे सगळं काही आहे. त्यांना कसलीच ददात नाही. पैशांची तर नाहीच नाही. कारण त्यांचा बाप जगातल्या ‘सर्वाधिक श्रीमंतांपैकी’ एक आहे. पैशानं तर तो श्रीमंत आहेच, पण त्याच्या कार्यकर्तृत्वानं आणि मैदानाात त्यानं गाजवलेल्या पराक्रमानं, विचारांनीही तो ‘श्रीमंत’ आहे. जगभरातले तरुण आपण त्याच्यासारखंच ’श्रीमंत’ व्हावं म्हणून आस लावून बसलेले आहेत. पण, त्याची ही दोन्ही मुलं मात्र नाराज आहेत. 

वर्गातली मुलं, त्यांचे मित्र-मैत्रिणीही त्यांना चिडवतात. त्यांना त्याबद्दल वाइट वाटतं. कारण या दोन्ही मुलांकडे त्यांचा स्वत:चा ‘पर्सनल’ मोबाइल नाही. ज्या शाळेत, ज्या वर्गात ते शिकतात, तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याचा स्वत:चा मोबाइल आहे. स्टीफन आणि तारा यांच्याकडे मात्र मोबाइल नसल्यानं मुलं त्यांची काही वेळा खिल्ली उडवतात. मोबाइल हवा म्हणून मग आपल्या वडिलांकडे ते हट्टही धरतात.. आमच्या सर्व मित्र-मैत्रिणींकडे मोबाइल आहे, मग आम्हालाच मोबाइल वापरायची परवानगी का नाही? पण वडिलांचं म्हणणं आहे, मुलांना मुळात मोबाइलची गरजच नाही. मग कशाला त्यांना आपण स्वत:हून एखाद्या व्यसनात गुंतवायचं? त्यापेक्षा मुलांनी खेळावं, मजा करावी, शिकावं.. मोबाइल हवा म्हणून हट्ट धरणाऱ्या आपल्या मुलांना ते प्रेमानं समजावूनही सांगतात. वडिलांचं म्हणणं मुलांना पटतंही, पण वर्गातल्या मुलांनी, मित्र-मैत्रिणींनी चिडवल्यावर त्यांना पुन्हा वाटायला लागतं, एवढास्सा मोबाइल. त्याला कितीक पैसे लागणार आहेत, मग आपले बाबा आपल्याला मोबाइल का घेऊन देत नाहीत?... 

एक मात्र खरं, त्यांचे वडील कायम देशविदेशात फिरत असतात, बऱ्याचदा ते घरापासून दूरच असतात, पण तरीही ते मुलांच्या कायम ‘जवळ’ असतात. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी आपल्या मुलांच्या संपर्कात असतात. प्रत्यक्ष मुलांसोबत असताना तर मुलांना मोबाइल काय, इतर कुठल्याही गोष्टीची आठवणही येत नाही, इतकं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.. 

कोण आहे हा ‘श्रीमंत’ माणूस आणि तरीही तो आपल्या मुलांच्या हाती मोबाइल का देत नाही? त्याचं नाव नोवाक जोकोविच. टेनिस सम्राट! त्याच्याविषयी फार काही बोलण्याची गरज नाही. त्याची टेनिस कारकीर्द, त्याचा टेनिसचा प्रवास, आज तो ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण, टेनिस जगतातलं त्याचं स्थान.. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेला सर्बियाचा हा ३७ वर्षीय जिद्दी खेळाडू एक ‘विचारी’ माणूस म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत नोवाकनं सांगितलं, कोणाहीपेक्षा, कशाहीपेक्षा माझं माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर सर्वाधिक प्रेम आहे. पण त्यांच्या पालनपोषणाच्या संदर्भात काही गोष्टींबाबत मी तितकाच आग्रहीदेखील आहे. मुलांच्या हाती मोबाइल नको, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुलांचं बालपण कोमेजतं. अर्थात त्यांची ती कमी मी त्यांच्या ‘सोबत’ राहून पूर्ण करतो. 

मुलं आणि मोबाइल या कारणावरून बऱ्याचदा नोवाक आणि त्याची प्रिय पत्नी जेलेना यांच्यात वादविवादही होतात; पण नोवाकच्या आग्रहापोटी या दाम्पत्यानं अजूनही आपल्या मुलांच्या हाती मोबाइल दिलेला नाही. जेलेना म्हणते, त्यांना तो कधी मिळेल, मिळेल की नाही, हे मला माहीत नाही. मला दोघांचंही म्हणणं पटतं, पण कोणा एकाचीच बाजूही मी घेऊ शकत नाही..

नोवाक म्हणतो, मी माझ्या मुलांमध्ये हे बिंबवू पाहतोय की आपल्याला सहजशक्य असणाऱ्या अनेक गोष्टी आपण घेतल्याच पाहिजेत असं नाही. दुनिया एखाद्या गोष्टीच्या मागे धावते आहे म्हणून आपणही त्यामागे धावलं पाहिजे असंही नाही. आपली ओळख कायमच ‘स्वतंत्र’ असली पाहिजे. मुलांच्या विकासासाठी खेळाहून अधिक मोठी गोष्ट दुसरी काही असू शकत नाही. प्रत्येक मुलानं कोणता का असेना, पण खेळ खेळावा. माझाही प्रयत्न असतो की मुलांबरोबर रोज टेनिस खेळावं. माझ्या व्यस्त दिनचर्येमुळे मला ते शक्य नाही, पण कोणतीही आणि कितीही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय मॅच असो, जगभरात कुठेही असलो तरी, मुलांसाठी मी कायमच उपलब्ध असतो..

मी शिस्तप्रिय आहे; पण ‘कठोर’ नाही! 

नोवाकचं म्हणणं आहे, काही बाबतीत मी जरा जास्त शिस्तप्रिय आहे, हे खरंय, पण मी ‘कठोर’ नाही. मुलांचं पालनपोषण कसं करावं हे मलाही चांगलं माहीत आहे. बाप म्हणून माझं ते कर्तव्य आणि जबाबदारीही आहे. माझ्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड, त्यांचं आरोग्य, त्यांची जीवनशैली, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची प्रगती, त्यांचं आजारपण या प्रत्येक गोष्टीविषयी मला माहीत असतं. मुलांच्या आईपेक्षाही मी त्यांची अधिक काळजी घेतो..

Web Title: novak djokovic children do not have their own mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.