Novak Djokovic :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:00 AM2023-01-31T11:00:52+5:302023-01-31T11:01:56+5:30

Novak Djokovic : अखंड मेहनत हे नोवाकचं वैशिष्ट्य. नुकतीच त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. वयाच्या पस्तिसाव्या वर्षीही अपराजित राहण्याचा त्याचा ध्यास प्रेरणादायी आहे.

Novak Djokovic :An 'undefeated' fighter who has watered down records for the principle! | Novak Djokovic :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या!

Novak Djokovic :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या!

googlenewsNext

- संजीव पाध्ये
(क्रीडा अभ्यासक)
सर्बियाचा कणखर टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा झोकात जिंकली. अंतिम सामन्यात सरळ तीन सेटमध्ये त्याने स्तेनोफिसचे आव्हान संपुष्टात आणले. सगळे पंडित आज मान्य करतात, की तो एक अद्वितीय टेनिसपटू आहे. त्याच्या खेळातल्या चुका शोधाव्या लागतात. त्या जवळपास नसतात म्हणा ना, इतका तो मजबूत खेळाडू आहे. या खेळासाठी शारीरिक आणि मानसिक; दोन्ही प्रकारची क्षमता प्रखर लागते. त्याच्याकडे दोन्ही बाबतीतली तेजतर्रार अशी ताकद आहे. त्याचे फटके जोरकस असतात. तो बॅकहॅन्ड फटकेसुद्धा जबर मरतो. त्याची सर्व्हिस दमदार असते. नेटजवळ तो चपळाई करत जातो. तो स्मॅश आणि स्लाइस लगावण्यात वाकबगार आहे. साहजिकच आज तो जागतिक मानांकनामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. 
सलग ३७३ आठवडे प्रथम क्रमांकावर राहण्याचा त्याचा विक्रम राहिलाय. तो खरं तर आणखी काही आठवडे अव्वल राहिला असता, पण कोविड काळात त्याने कोविडवरची लस घ्यायला नकार दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये आल्यावर त्याला स्पर्धेत प्रवेश दिला गेला नाही. लस न घेण्याच्या निर्णयामुळे त्याला परत जावं लागलं. त्याला नंतर अमेरिकन स्पर्धेतही मज्जाव केला गेला. मात्र, त्याने आपले विक्रम आणि आकडेवारीवर पाणी सोडताना लस घ्यायचं सपशेल नाकारलं. 
त्याचे म्हणणे असे होते, लस घ्यायची सक्ती नसावी. ज्यांना ती घ्यावीशी वाटते, त्यांनी जरूर घ्यावी. पण, ती प्रत्येकाने घेतलीच पाहिजे ही बळजबरी नको. मुळात हॉटेलमध्ये खेळाडूंना कुणाच्याही संपर्कात न येण्याची जी अट होती, तीसुद्धा त्याला पसंत नव्हती. यामुळे आकडेवारी आणि विक्रम याबाबतीत त्याचं मोठं नुकसान झालं. असं असलं तरी त्याला अद्वितीय मानणारे असंख्य आहेत. 
त्याने त्याच्या वेळचे दोन दिग्गज फेडरर आणि नदाल यांना वारंवार नमवलं आहे. नदालबरोबरची त्याची झुंज नेहमीच थरारक राहिली आहे. २०११मध्ये  ऑस्ट्रेलियन स्पर्धेतच या दोघांमध्ये जो अंतिम सामना झाला होता तो पाच तास त्रेपन्न मिनिटे चालला होता. हासुद्धा एक विक्रम होता. यानंतर या दोघांची बऱ्याचदा गाठ पडली आणि नोवाक त्यात काकणभर भारी ठरल्याचं दिसलं. फेडरर बरोबरसुद्धा तो नेहमी अटीतटीने खेळताना दिसला. 
त्याला वाजदा यांचं मार्गदर्शन बराच काळ लाभलं. काही काळ बोरिस बेकरसारख्यानेसुद्धा त्याला मार्गदर्शन दिलं. सर्बियामध्ये असला की, तो नियमित चर्चमध्ये जातो. तेवढाच तो बौद्ध धर्माचासुद्धा उपासक आहे. विम्बल्डनमध्ये असताना तो तिथल्या बुद्ध विहारात जातो. 
नोवाकचे आणखी एक विशेष म्हणजे तो गमत्या आहे. त्याला बऱ्याच पुरूष आणि महिला टेनिसपटूंच्या नकला करता येतात. त्याची ही कला समजल्यावर त्याचे व्हिडीओ निघाले. त्याचा दानशूरपणासुद्धा अनेकदा दिसून आला आहे. देशात कुठल्याही प्रकारचे संकट आले तरी तो मदतीला कायमच पुढे असतो. युद्ध असो, पूर असो किंवा कोविड; त्याने आर्थिक मदत केली नाही, असे झाले नाही. 
आई आणि वडील दोघांनीही त्याला घडवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी त्याच्या हातात छोटी रॅकेट आणि बॉल दिला होता. त्याचे वडील फास्ट फूडचा व्यवसाय करायचे. नोवाकला त्यांनी खेळासाठी कायमच प्रोत्साहन दिलं. नोवाकनं आपल्याकडून खेळावं असं इंग्लंडला वाटत होतं. ते त्याला आपल्याकडे वळवू पाहत होते. टेनिसमधली आपली पीछेहाट रोखण्यासाठी त्यांना नोवाक हवा होता. यासाठी घसघशीत शिष्यवृत्तीही त्यांनी देऊ केली होती. पण नोवाक या आमिषाला भुलला नाही. त्यानं ठरवलं होतं, खेळेन तर सर्बियासाठी. तो निर्धार त्यानं तडीला नेला. वयाच्या पस्तीसाव्या वर्षीही अपराजित राहण्याचा त्याचा ध्यास प्रेरणा घ्यावा असाच आहे.

Web Title: Novak Djokovic :An 'undefeated' fighter who has watered down records for the principle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.