डॉ. अमोल अन्नदातेआरोग्य व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक
सध्या थायलंड, हाॅंगकाॅंग व सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतातही गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले आहेत. सध्या देशात ३०० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती असली, तरी हा आकडा जास्तच असणार. मुंबईमध्ये मे महिन्यात १६ रुग्णांना गंभीर कोरोना संसर्ग होऊन त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात हा आकडा नगण्य वाटत असला, तरी कोरोना परत मोठ्या प्रमाणावर लाटेच्या स्वरूपात येणार का? आता पसरत असलेल्या कोरोनाचे नेमके स्वरूप काय आहे? हे प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत.
कोरोनाची साथ ओसरल्यानंतर तो पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाचे सौम्य व क्वचित गंभीर रुग्ण साथ ओसरल्यानंतरही आढळून येतातच. २०२२ साली देशभर ‘ओमिक्रॉन’ या सौम्य कोरोनाची साथ आपण अनुभवली. सध्या पसरत असलेला कोरोना हा ओमिक्रॉनमध्ये जनुकीय रूपांतर होऊन ‘जेएन १’ या नावाने ओळखला जाणारा कोरोना व्हायरस आहे. यामुळे सौम्य स्वरूपाचा कोरोना होत असला, तरी हा ओमिक्रॉन पहिल्या, दुसऱ्या लाटेतील कोरोनापेक्षा जलद गतीने पसरणारा व ३० पट अधिक वेगाने संसर्गित होणारा व्हायरस आहे.
सहसा उन्हाळा संपताना व पावसाळा सुरू होतानाचा सध्याचा काळ हा ‘जेएन १’ पसरण्यासाठी अनुकूल आहे. राज्यात अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस कोरोना पसरण्यासाठी अधिक पोषक ठरू शकतो. सौम्य आजार असला, तरी ६० पेक्षा जास्त वय, गरोदर स्त्रिया, कुठलाही आजार असलेले सर्व वयोगटातील लोक यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेत तसेच नंतरच्या ओमिक्रॉनच्या साथीत भारतातील जवळपास प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे. तसेच ६७ टक्के लोकांनी कोरोना लसीचे किमान दोन डोस घेतलेले आहेत. म्हणून ‘जेएन १’ या सध्याच्या प्रजातीविरुद्ध भारतीयांमध्ये चांगली प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण येण्याची शक्यता कमी आहे. पण सौम्य केसेसची संख्या वाढू शकते. केसेस सौम्य असल्या तरी प्रतिकारशक्ती कमी असलेल्या काही रुग्णांवर गंभीर परिणाम झाल्यास पुरेशी तयारी हवी. सौम्य आजार झाला तरी कोरोनामुळे किमान दोन आठवडे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून तो टाळण्यासाठीच्या उपाययोजना आत्तापासून करायला हव्यात. फ्लूची लस काही प्रमाणात कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करते. त्यामुळे साध्या सर्दी, खोकल्यापासूनही संरक्षण मिळू शकेल. कोरोनाच्या गंभीर आजारात बॅक्टेरियल न्यूमोनियाची लागण होऊन रुग्ण अधिक गंभीर होतात. त्यासाठी न्युमोकोकल लस घेणे हिताचे ठरू शकेल. कोरोना लस अजूनही देशातील ३३ टक्के लोकांनी घेतलेली नाही. ज्यांनी घेतली त्याचा सध्या पसरत असलेल्या ‘जेएन १’ प्रजातीविरोधात फारसा उपयोग होणार नाही. म्हणून लस न घेतलेल्यांनी आधीची लस घेतल्याने काही उपयोग होणार नाही. जशी सर्दी, खोकल्यासाठी दरवर्षी फ्लूची त्या वर्षासाठीची नवी लस येते, तशीच आता कोरोना लसही दर दोन वर्षांनी तरी विकसित करावी लागणार आहे. कारण जनुकीय रूपांतर (म्युटेशन) होऊन कोरोना विविध स्वरूपात येतच राहणार आहे.
कोरोना किंवा कुठल्याही साथीत खरी समस्या तेव्हाच येते जेव्हा एकावेळेला मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण येतात व रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. याची शक्यता नगण्य असली, तरी असे झालेच तर त्यासाठी आपण तयार आहोत का? याची पडताळणी करून पाहायला हवी. महाराष्ट्राकडे कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव आहे. त्यादृष्टीने रुग्णालये सज्ज केली तर त्याचा उपयोग इतर आजारांच्या उपचारांसाठीही होईल.
रुग्णांची संख्या वाढली तर मास्कचा वापर करण्याची वेळ येऊ शकते. अनेकांना कोरोनामुळे लॉकडाऊनचीही भीती सतावते आहे. ‘जेएन १’मुळे लॉकडाऊन करण्याइतपत परिस्थिती नक्कीच बिघडणार नाही. पण त्यासाठी आधीच्या कोरोना लाटांतून धडे घेऊन उपाययोजना मात्र आवश्यक आहेत.dramolaannadate@gmail.com