No more friends! | दोस्त दोस्त ना रहा !

दोस्त दोस्त ना रहा !

- सचिन जवळकोटे

कधीकाळी ‘थोरले काका बारामतीकर, थोरले दादा अकलूजकर अन् सुशीलकुमार सोलापूरकर’ यांचा दोस्ताना जगजाहीर. ‘सुशीलकुमारां’नी शहर बघावं. ‘दादां’नी जिल्हा सांभाळावा, अशी अलिखित वाटणी ‘काकां’च्या साक्षीनं झालेली. मात्र काळाच्या ओघात ‘सोलापूरकर अन् अकलूजकर’ राज्यात जसजसे मोठे होत गेले, तसतसे ‘बारामतीकर’ही सोलापूर जिल्ह्याच्या गल्लीबोळात अधिकाधिक लक्ष घालू लागले. इथंच सारी गणितं बिघडली. दोस्ती तुटली. लोकसभा इलेक्शनमध्ये ‘दादां’नी दंगा घातला, तर आता ‘सुशीलकुमारां’च्या चेल्यांनी ‘बळीरामकाकां’ची टोपी उडवून थेट ‘बारामतीकरां’शीही पंगा घेतला. दोस्त दोस्त ना रहा.. पॉलिटिक्स में अब मजा आ रहा.. लगाव बत्ती.

नेमकं काय घडलं ?

सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी ‘एसएमसी’ ग्रुप खूप स्ट्राँग होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन होतं. ‘शिवदारे-माने-चाकोते’ त्रिमूर्ती म्हणजे इथल्या राजकारणातला शेवटचा परवलीचा शब्द होता; मात्र त्यांच्या वारसदारांना आपल्या घराण्याचा जुना दबदबा टिकविता न आलेला. शेळगीचे 'राजूअण्णा' सूतगिरणी ते सुपरमार्केट व्हाया बँक, एवढंच विश्व तयार करून बसलेले. ‘भाऊबंदकी’मुळे हैराण झालेले ‘विश्वनाथअण्णा’ तर मंगळवार पेठेत ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच रमलेले. राहता राहिले 'कुमठ्या'चे ‘दिलीपराव’. त्यांचा स्वभाव नेहमीच बंडखोर; मात्र कायमस्वरूपी एकाच नेत्याकडे त्यांचा राबता कधीच न राहिलेला. या धरसोड वृत्तीचे कैक तोटेही त्यांना सहन करावे लागलेले.
मागच्याच्या मागच्या विधानसभेला ‘दक्षिण’मध्ये आपल्या विरोधात डझन-दोन डझन माणसं कुणीकुणी कशी उभी केली, हे सारं माहीत असूनही पाच वर्षे ते ‘माजी आमदार’ बनून आतल्या आत धुमसत राहिलेले. त्यांचा तो रुसवा-फुगवाही लोकसभेच्या प्रचारात ‘सुशीलकुमारां’नी जवळून पाहिलेला. त्यानंतर त्यांनी या सा-या अपमानाचा ‘मध्य’मध्ये काढण्याचा अयशस्वी प्रयत्नही केलेला.

नवं सरकार आल्यानंतर ‘सावंतां’चं पानिपत झालं. त्यांचं बोट धरून मोठ्या थाटामाटात ‘बाण’ पकडलेल्यांच्या स्वप्नाचंही पाणी-पाणी झालं. त्यामुळं ‘घरवापसी’चा विचार करणा-या ‘दिलीपरावां’नी मध्यंतरी ‘बिपीनभाईं’कडून ‘जनवात्सल्य’शी संपर्कही साधलेला. कुठल्या वेळी कुणाला कुठं मध्यस्थी करायला लावायची, हे झटकन ओळखण्यात तसे ते खूप माहीर; मात्र यावेळी बंगल्यावर ‘बिपीनभाईं’चा शब्द पित्यानं ‘सुपुत्री’कडं टोलवला. अपेक्षेप्रमाणं स्पष्टपणे नकार मिळाला. मग अखेर नाइलाजानं ‘दिलीपरावां’नी ‘बारामती’ची वाट धरली. ‘दूध पंढरी’ची गाय आपल्या अंगणात बांधून नव्या सत्ताकारणाची कास पिळायला सुरुवात  केली.. अन् इथंच ‘हात’वाल्या लेकरांनी हंबरडा फोडला.

मात्र कसं घडलं ?

पूर्वीच्या काळी मराठी म्हणीत ‘वड्याचं तेल वांग्यावर’ निघायचं; मात्र या ‘हात’वाल्यांनी ‘कुमठ्याचा राग चक्क वडाळ्या’वर काढला. झेडपीच्या विरोधी पक्षनेते पदावरून ‘बळीरामकाकां’ना काढावं, असं पत्रही ‘पाटलां’च्या ‘प्रकाश’रावांनी दिलं. या पत्रामुळं ‘माळशिरस’चे ‘प्रकाश’ एकदम ‘प्रकाशझोता’त आले. अनेकांनी तर कपाळाला आठ्या पाडून ‘कोण आहेत हे प्रकाश ?’ असा सवालही केला. सोलापुरातल्या काही कार्यकर्त्यांनीही गोंधळून जात ‘आम्हीबी कधी बघितलं नाय राव,’ एवढंच कसंबसं उत्तर दिलं. मुळात ‘प्रकाश’राव अध्यक्ष कसे झाले, याचा शोध आजही काही कार्यकर्त्यांना न लागलेला. केवळ ‘उज्ज्वलाताईं’च्या शब्दाखातर त्यांना जिल्ह्याचा अध्यक्ष केलं गेलेलं, हेही कदाचित शहरातल्या ‘प्रकाश’रावांना माहीत नसावं. कारण ‘मसरे गल्ली’तले हे ‘वाले’ही आजकाल म्हणे तसलेच बनलेले. ‘सुम्म कुंडरी.. होली बिडू,’ म्हणजे ‘गप बसा.. जाऊ द्या सोडा,’.. 

..तर मूळ मुद्दा हा की ‘बळीरामकाका’ हटविण्याच्या या धाडसी मोहिमेला ‘सुशीलकुमारां’चा आतून पाठिंबा आहे काय ?.. कारण हे दोन्ही ‘प्रकाश’ तसे ‘स्वयंप्रकाशी’ नाहीतच. ‘मग कसं.. साहेब म्हणतील तसं,’ एवढं एकच वाक्य या दोघांना प्रामाणिकपणे पाठ. नेत्याच्या परवानगीशिवाय या पत्रावर ‘पाटलां’नी सही केल्याची शक्यता खूप कमी. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘सुशीलकुमार’ म्हणे तब्येतीसाठी ‘संपर्क क्षेत्राबाहेर’. या काळात त्यांनी मोबाईलही बंद ठेवलेला. त्यामुळं या प्रकरणात सध्या दोनच मोठ्या बातम्या हाती लागण्याच्या शक्यता. एक तर ‘बळीरामकाकां’ना पर्यायानं ‘बारामतीकरां’ना डिवचण्याचं खूप मोठं धाडस ‘सुशीलकुमारां’नी दाखविलं, ही पहिली मोठी ब्रेकिंग.. अथवा ‘सुशीलकुमारां’ना अंधारात ठेवून परस्पर असला अचाट प्रयोग करण्याची हिंमत ‘हसापुरे-बळोरगी’सारख्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली, ही दुसरी धक्कादायक ब्रेकिंग. लगाव बत्ती.

मात्र पुढं काय होणार ?

‘काका वडाळाकर’ हे केवळ झेडपीचे विरोधी पक्षनेतेच नव्हे तर ते ‘घड्याळा’चे जिल्हाध्यक्षही. गेल्या वर्षी वादळात बुडू पाहणा-या जहाजाचं कप्तानपद त्यांना दिलेलं. ‘थोरल्या काकां’चे ते खास विश्वासू दूत, यावर ‘नरखेड’च्या ‘उमेश’चा कदाचित विश्वास नसला तरी बाकीचे कार्यकर्ते तरी तसं समजतात. झेडपीत ‘अकलूजकरां’ना अपात्र ठरवावं म्हणून याच ‘बळीरामकाकां’नी माथेफोड केलेली. आता त्याचा वचपा काढण्याची संधी ‘अकलूजकरां’ना आयतीच गवसलेली. कारण झेडपी अध्यक्ष त्यांचाच. त्यामुळं ‘कांबळेंच्या सहीचं काय झालं ?’ असा प्रश्न नवा विरोधी पक्षनेता येईपर्यंत पत्रकारांकडून सातत्याने विचारला गेला तर आश्चर्य वाटायला नको. लगाव बत्ती.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘लक्ष्मी-विष्णू’ चाळीतल्या ‘दिलीपभाऊं’पासून अनेक नेते ‘घड्याळ’ सोडून ‘हात’ धरायला एका पायावर तयार होते. मात्र ‘तुमचे साहेब नाराज होतील,’ या एका भीतीपोटी ‘सुशीलकुमारां’नी तो प्रवेश सोहळा टाळलेला. याच भीतीनं पंढरपुरातही ‘भालकेनानां’ना धडा शिकवण्याची सुरसुरी त्यांनी निष्प्रभ करून टाकलेली. त्यापायीच बॅलेट पेपरवर नाव असूनही ‘काळुंगें’ना शेवटी घरी बसविलेलं. म्हणूनच ‘बारामतीकरां’ना दुखविण्याची डेअरिंग आजही नसेल तर ‘पाटलांचे प्रकाश’ लवकरच आपलं पत्र मागं घेतील. तसं झालं नाही तर मात्र ‘मध्य’च्या प्रचारात ‘सुशीलकुमारां’वर केलेली जहरी टीका अजूनही जखम बनवून भळभळतेय, हेच स्पष्ट होईल. मग ‘दिलीपरावां’ना मोठं करणा-या ‘बळीरामकाकांना’ही नक्कीच त्याची किंमत चुकवावी लागेल. लगाव बत्ती..

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: No more friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.