- नितीन गडकरी; केंद्रीय परिवहन मंत्री

राजकारणात अनेक कठीण प्रसंग येतात. त्याला सामोरे जावे लागते. अशावेळी संयम महत्त्वाचा असतो. मला सुषमाजींचा संयमी असण्याचा गुण सर्वाधिक भावला. महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची मागणी सातत्याने केली जाते. मी त्याचे समर्थन करतो; पण अनेक व्यासपीठांवरून मी सांगत आलो की, सुषमाजी कोणत्याही आरक्षणाविना राजकारणात टिकल्या, मोठ्या झाल्या. त्या केवळ महिला म्हणून नव्हे, तर कर्तृत्वाने मोठ्या झाल्या.माझा व त्यांचा स्नेह सदैव आठवणीत राहील. माझ्या प्रकृतीवरून त्या मला खूप रागवत. एकदा माझी तब्येत बिघडली. एम्सच्या डॉक्टरांना घेऊन त्या माझ्या घरी आल्या. मला तपासायला लावले. सुषमाजींनी आग्रह केला म्हणून मी एम्समध्ये जाऊन तपासणी केली. माझ्या रिपोर्ट्सची त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. काही दिवस गेल्यावर मी प्रकृतीकडे दुर्लक्ष करतोय, हे त्यांना कळल्यावर त्यांनी थेट कांचनला फोन लावला. ‘नितीनला समजावून सांग. तो तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. माझं ऐकत नाही,’ असे कांचनला सांगितले. सुषमाजींच्या अशा वागण्याने ममतेत कारुण्य मिसळले जाई.सुषमाजींच्या कन्येची तब्येत बरी नव्हती तेव्हा माझ्या घरून खास पराठे व त्यासोबत दह्याची चटणी मी पाठवली. तिने आवडीने खाल्ली. वारंवार तिला आठवण येई. पुढे कित्येक दिवस पराठे व दह्याची चटणी हा खास मेन्यू माझ्या घरून मी पाठवित असे. सुषमाजींकडे मी पोहोचण्याआधी पोहे तयार असत. मला आवडतात म्हणून त्या आवर्जून बनविण्यास सांगत.

मी लोकसभा निवडणूक नागपूरमधून लढविण्याचा निर्णय घेतला. त्या नाही म्हणाल्या. राजकीय करिअर अडचणीत येईल म्हणाल्या. मी मात्र कठीण मतदारसंघातून लढण्यावर ठाम होतो. विजयी झाल्यावर त्यांना भेटायला गेलो. तेव्हा सुषमाजी म्हणाल्या, ‘नितीन, तू जे बोललास ते करून दाखवलंस!’आई-वडिलांप्रमाणे त्या मला ‘हे करू नको - ते करू नको’ असे सांगत असत. आताच्या लोकसभा निवडणुकीत मी जुन्या-पुराण्या हेलिकॉप्टरमधून फिरत असे. प्रचारासाठी सुषमाजी महाराष्ट्रात होत्या. ते हेलिकॉप्टर पाहून मला रागवल्या. अशी रिस्क घेऊन प्रचार करू नकोस, म्हणून दम दिला. मी स्वत: जाणार नाही व तूदेखील जाऊ नकोस, असे म्हणाल्या. मी त्यांचे ऐकले.

मी दुसऱ्यांदा खासदार झालो. केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली. सुषमाजींना भेटायला गेलो. सक्रिय राजकारणातून त्या निवृत्त झाल्या, आता मंत्री नसतील; याचे मलाच वाईट वाटत होते. सुषमाजी शांत होत्या. चेहऱ्यावर करारीपणा मात्र कायम होता.

मृत्यू निश्चित आहे. तो कधी तरी येणारच. पण काहींचे नेतृत्व, कर्तृत्व, सहवास, व्यक्तित्व, स्मृती, निर्णय, स्वभाव पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतात. सुषमाजींना भाजपचा कार्यकर्ता कधीच विसरणार नाही. भाजपचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर पक्ष पुढे जात राहील.अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींच्या काळात त्यांनी पक्षात काम केले. माझ्यासारख्या दुसऱ्या पिढीतल्या अध्यक्षासमवेतही काम केले. तो त्यांचा मोठा गुण होता. दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी मी नकार दिला. तेव्हा त्या काहीशा नाराज झाल्या. आपण (पक्ष) सर्व टीकेला उत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या. मी मात्र पक्षाने उत्तरे देण्याच्या विरोधात होतो. माझ्यावर अन्याय झाला, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ते बोलूनही दाखविले.

स्वपक्षात अनेक मतभेदांचे प्रसंग येतात. निर्णय घेणे कठीण जाते. निर्णयात एकवाक्यता नसते. मतभेदांच्या प्रसंगांमध्ये श्रेष्ठ नेत्यांना ज्येष्ठत्व स्मरून, ‘तुम्ही असं करू नका,’ असे सांगण्याचा करारी विनम्रपणा सुषमाजींमध्ये मला अनेकदा दिसला. स्पष्टवक्तेपणा, निर्भीडता, कामावर अतीव श्रद्धा व पक्षाविषयी आत्मीयता त्यांच्या ठायी-ठायी होती.विरोधकांशी त्यांचा सकारात्मक संवाद होता. त्या विनाकारण कधीही ‘रिअ‍ॅक्ट’ होत नसत. पक्षांतर्गत कितीही कठीण प्रसंग आले, तरी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. नकारात्मक गोष्ट सांगण्याची त्यांची नजाकत होती. शाब्दिक प्रहार करताना जखम होऊ न देण्याचे कौशल्य त्यांच्यात होते. धारदार वक्तृत्व हा त्यांचा सर्वांत लोभस गुण होता. वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राजकीय कर्तृत्व गाजवले. कोणावरही टीका करण्याचा प्रसंग आला तरी त्यांच्या संयमी वाणीतील धारदारपणा कमी झाला नाही. कलम ३७० हटविणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्या-झाल्या, सुषमाजींनी ‘ट्विट’ करायला घेतले. त्यात एक वाक्य होते- ‘मी आयुष्यभर याच दिवसाची प्रतीक्षा करीत होते.’ निर्वाणीचे शब्द त्यांनी लिहिले? स्वराज कौशल यांनी सुषमाजींना विचारलेदेखील- ‘तू असे का लिहितेस?’ सुषमाजी शांत राहिल्या!
लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाच्या बैठकीसाठी मी मुख्यालयात पोहोचलो. सुषमाजीही त्याच वेळी आल्या. मी त्यांना चरणस्पर्श केला. म्हणालो, ‘सुषमाजी, माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. मी तुम्हाला त्यांच्या जागी मानतो.’ सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. काय गमावले सुषमाजींच्या जाण्याने मी? अस्वस्थता, वेदना, नाराजीच्या क्षणांमध्ये कधीतरी रडावेसे वाटले तर एक घर होते त्यांचे! दिल्लीतले माझे ते घर कायमचे हरवले आहे!

Web Title: nitin gadkari express his feelings after former external affairs minister sushma swarajs demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.