In the ninth month the pregnant woman walked two hundred and fifty kilometers; Then the writing of 'Lokmat' also came to her aid! | नवव्या महिन्यात गर्भवती अडीचशे किलोमीटर चालली; तेव्हा 'लोकमत'ची लेखणीही तिच्या मदतीला धावली !

नवव्या महिन्यात गर्भवती अडीचशे किलोमीटर चालली; तेव्हा 'लोकमत'ची लेखणीही तिच्या मदतीला धावली !

- सचिन जवळकोटे

डोक्यावर रणरणतं ऊन. पायाखाली वितळू लागलेलं डांबर. चाळीस-बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानात ती कशीबशी आपलं पोट सावरत निघालेली. तिच्यासोबत असलेल्या पतीचा वेग जास्त होता. मात्र, तिच्यासाठी तोही हळुवारपणे चालू लागलेला. त्यांच्यासोबत असलेले बाकीचे खूप पुढे गेलेले. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं. नजरेआड होईपर्यंतचा हायवे पुरता सन्नाटा घेऊन पसरलेला. नाही म्हणायला एखादं दुसरं वाहन मागून पुढून जायचं. मात्र, 'त्याला आता थांबवावं,' ही इच्छाही या दाम्पत्याची न राहिलेली. कोणी आपल्यासाठी थांबणार नाही, याची त्यांना पुरेशी खात्री झालेली.. कारण हा दाहक प्रवास गेले पाच-सहा दिवस ते सातत्याने करत होते. रात्री कुठेतरी हायवेलगतच्या झाडाखाली पाठ टेकून थोडीशी विश्रांती घेत होते. भल्या पहाटे पुन्हा उठून चालत होते.


 होय.. पुण्याहून सोलापूरपर्यंत खडत-रखडत पायी चालत हे जोडपं आलं होतं. आता आपल्या कानावर रोज हजारो किलोमीटर चालणाऱ्या मजुरांच्या कहाण्या आदळताहेत. त्यामुळे एवढ्याशा अडीचशे किलोमीटरचं काय कौतुक, असाही सवाल बंद दरवाजाच्या घरात बसून आपल्याला पडू शकतो.. तर मंडळी, हीच तर आहे या दाम्पत्याची मोठी कहाणी. केवळ पोटासाठी नव्हे तर पोटातल्या बाळासाठी संकटांशी संघर्ष करणाऱ्या 'शीला'ची आहे ही दर्दभरी कहाणी. नवव्या महिन्यात एखाद्या गर्भवतीनं एवढी पायपीट केल्याची कदाचित ही पहिलीच असावी घटना.

नाव तिचं शीला. पती खासगी वायरमनचं काम करतो. दोघेही मूळचे गुलबर्ग्याचे. कर्नाटकातले. पोट भरण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले. त्यांच्या संसारात आता लवकरच 'गुड न्यूज'ही येणार आहे. याच महिन्यात तिच्या बाळंतपणाची तारीख डॉक्टरांनी  सांगितलेली. केवळ याच कारणामुळे दीड महिन्यांपूर्वी 'लॉकडाऊन' होऊनही ते दोघे पुण्यातच थांबलेले. मात्र, या काळात त्यांना खूप विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागलं. नेहमीच्या दवाखान्यात जाताना कुठलंच वाहन मिळालं नाही. आजूबाजूचे इतर दवाखानेही बंद झालेले. त्यावेळी दोघांच्या पूर्णपणे लक्षात आलं की, पुण्यात या काळात बाळंतपण करणं खूप त्रासदायक. खूप अवघड. त्यापेक्षा कसंही करून आपल्या गावी गेलं तर घरचे तरी मदतीला येऊ शकतात.. म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपलं गाव गाठण्याचा निर्धार केला. योगायोगानं पुण्यातले इतर नातेवाईकही याच वेळी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांनीही गावाकडची वाट धरली.


मात्र, जसं-जसं ते चालत पुढे आले तसं त्यांच्या लक्षात आलं की, एकही गाडी आपल्याला रस्त्यात मिळणार नाही. तरीही मोठ्या आशेनं त्यांनी चालणं चालूच ठेवलं. हडपसरचा स्टॉप गेला. लोणी-काळभोरही मागं पडलं, तरीही कुठली गाडी ब्रेक दाबायलाही तयार नव्हती. एखादं दुसरं वाहन तिच्या पोटाकडे पाहून सहानुभूतीनं क्षणभर थांबायचं. मात्र, माणुसकीपेक्षाही कोरोनाची भीती अधिक मोठी ठरल्याचं ड्रायव्हरच्या डोळ्यातून दिसून यायचं. गाडी निघून जायची. दोघेही हताश होऊन एकमेकांकडे बघायचे. पुन्हा हातात हात घालून चालत निघायचे. नाही म्हणायला त्यांच्या बॅगा इतर नातेवाईकांनी घेतल्या होत्या, एवढंच काय ते समाधान.
 हायवेवरच्या कैक गावांमध्ये त्यांना जरी सहारा मिळाला नसला, किमान तिरस्कार तरी त्यांच्या वाटेला नाही आला. काही ठिकाणी स्वतःहून डबेही मिळाले. कुठे एखाद्या मावशीनं गरमागरम चपाती करून दिली, तर कुठं एखाद्या आजीबाईनं लांबून स्वतःच्या डोक्यावर हाताची बोटं मुडपत तिला आशीर्वादही दिले. पंधराची बाटली पंचवीस रुपयांना विकणाऱ्या एखाद्या बंद टपरीवाल्यानं पैसे न घेताच पाणीही दिलं.


   असं करत-करत दोघे सोलापूरपर्यंत चालत आले. सोलापूरजवळ आल्यानंतर जुना पुणे नाक्याच्या पुलाखाली सुदैवानं यांची भेट 'लोकमत टीम'सोबत झाली. फोटोग्राफर यशवंत सादूल यांनी घटनेचं गांभीर्य तत्काळ ओळखलं. त्यांनी पटापट फोटो काढले. त्यांची मुलाखतही घेतली.


 खरं तर, 'नवव्या महिन्यातल्या गर्भवती स्त्रीचा अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास,' एवढी बिग स्टोरी हाती आल्यानंतर टीम तातडीनं ऑफिसकडे रवाना झाली असती. मात्र, या 'लोकमत टीम'नं पत्रकारितेइतकाच माणुसकीचाही धर्म खूप मोठा असल्याचा प्रत्यय या चौकाला आणून दिला. पुलाखाली उभारलेल्या एका ट्रॅफिक हवालदाराला तिच्या शारीरिक अवस्थेची माहिती दिल्यानंतर यंत्रणा हलली. भले हा पूल 'वसुली'साठी कितीही बदनाम असला तरी 'सोलापुरी खाकी'मधली 'माणुसकीची दिलदारी' सर्वश्रुत होती. त्या दाम्पत्याला पुलाखाली सावलीत थांबवून ठेवलं गेलं. बऱ्याच काळानंतर एक मोटरसायकलस्वार समोरून येताना दिसला. पोलिसाला पाहून त्यांनं घाबरून दुचाकीचा वेग वाढविला. मात्र, हवालदारानं पळत जाऊन त्याला रस्त्यातच थांबविलं. नीट समजावून सांगितलं. आदेश नव्हे तर विनंती केली.


  मग काय.. त्यानं या दाम्पत्याला आपल्या दुचाकीवर बसविलं. बसताना ती थोडीफार अवघडली. मात्र, तळपत्या उन्हात कसंबसं चालण्यापेक्षा हा त्रास तिला क्षणभर बरा वाटला असावा. त्या दुचाकीस्वारानं त्यांना हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डाजवळ सोडलं. योगायोगानं कर्नाटकला जाणारी काही वाहनं तिथंच थांबली होती. त्यांनाही नीट समजावून विनंती केल्यानंतर या दाम्पत्याची कष्टातून सुटका झाली. त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना गाडी मिळाली. जाताना 'लोकमत टीम'कडं अत्यंत कृतज्ञतेनं पाहणाऱ्या या दाम्पत्याच्या डोळ्यात पत्रकारितेबद्दलचा विश्वास अन् आदर स्पष्टपणे उमटला होता. कारण, 'पत्रकारिता परमो धर्म:' लोकमत नेहमीच जपत आला होता.

 ( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: In the ninth month the pregnant woman walked two hundred and fifty kilometers; Then the writing of 'Lokmat' also came to her aid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.