आंबेडकरी चळवळीसमोर उभे ठाकलेले नवे आव्हान
By Admin | Updated: July 7, 2016 03:55 IST2016-07-07T03:55:02+5:302016-07-07T03:55:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीचे केंद्र म्हणून स्थापन केलेले आंबेडकर भवन व ज्या छापखान्यात बाबासाहेबांनी जनता प्रबुद्ध भारत सारखी दलितोद्धाराच्या चळवळीस वाहिलेली साप्ताहिके

आंबेडकरी चळवळीसमोर उभे ठाकलेले नवे आव्हान
- बी. व्ही. जोंधळे
(आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीचे केंद्र म्हणून स्थापन केलेले आंबेडकर भवन व ज्या छापखान्यात बाबासाहेबांनी जनता प्रबुद्ध भारत सारखी दलितोद्धाराच्या चळवळीस वाहिलेली साप्ताहिके छापली ती बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस राज्याचे माहिती आयुक्त व पीपल्स इम्प्रुव्हमेंटचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या बेदरकारपणे पाडण्यात आली ही बाब आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने निश्चितच क्लेशदायक आहे. बाबासाहेबांची शासकीय पातळीवर, मग ते सरकार कोणत्या का पक्षाचे असेना घोर उपेक्षा होतेच होते; पण आंबेडकर भवन नि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस कुणी भुईसपाट करावी, तर दलित समाजातीलच रत्नाकर गायकवाड यांच्यासारख्या दलित समाजाच्या सुखदु:खाशी काहीही घेणे-देणे नसणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने! आता आंबेडकर भवन पाडताना त्यांनी भलेही कायद्याच्या तांत्रिक बाबीचा आधार घेतला असेल; पण बाबांनी स्थापन केलेल्या संस्थांवर व त्यांनी वास्तव्य केलेल्या वास्तंूवर आंबेडकरानुयायांची अपार श्रद्धा असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित वास्तूंना धक्का लावताना शंभर वेळा विचार करावा लागतो याचेही भान रत्नाकर गायकवाडांना नसावे ना?
आपल्या अविवेकी कृत्याचे समर्थन करताना त्यांनी असे म्हटले आहे की, आंबेडकर भवनाच्या जागी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील सतरा मजली इमारत उभी करावयाची आहे. ठीक आहे, पण म्हणून यासाठी बाबासाहेबांनी उभारलेली वास्तूच मोडून टाकण्याची गरज होती? सरकारी अधिकाऱ्यांना जमिनी कशा मिळवाव्यात, पैसा कसा उभारावा याच्या खुब्या चांगल्याच ज्ञात असतात. तेव्हा रत्नाकर गायकवाडांनी असे काही आपले बुद्धिकौशल्य दाखवून स्वतंत्रपणे बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न का केला नाही? आणि दुसरे असे की, ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन करण्याचे शासकीय आदेश असताना गायकवाडांनी बुद्धभूषण प्रेस व आंबेडकर भवन कशासाठी पाडले? उद्या समजा अमुक किल्ला- तमुक ऐतिहासिक वाडा जुना झाला, मोडकळीस आला म्हणून तो पाडून टाका, असे म्हणता येईल काय? नाही. मग तरीही गायकवाड यांना आंबेडकर भवन पाडण्यासाठीे बारा हत्तींचे बळ कुठून आले? तर याचे उत्तर असे की, गटबाज राजकीय नेत्यांच्या दिवाळखोर राजकारणामुळे बाबासाहेबांच्या समाजात जे बेकीचे उदंड पीक आले आहे त्यामुळे कुणाचे कुणाला भयच राहिलेले नसल्यामुळे एका पांढरपेशी सनदी अधिकाऱ्याला आंबेडकरी चळवळीशी बेईमानी करण्याचे दगाबाज बळ प्राप्त होते हे विसरून चालणार नाही.
आंबेडकर भवन पाडल्यानंतर समाजातून जो तीव्र संताप व्यक्त होत आहे तो स्वाभाविकच म्हटला पाहिजे; पण पुढे काय? आपण केवळ प्रतिक्रियावादीच ठरणार आहोत की, आजच्या संतापाचे रूपांतर आंबेडकरी चळवळ बांधण्यात होणार आहे? बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन नेते काँग्रेसच्या वळचणीला गेल्यामुळे रिपब्लिकन पक्षात अंतर्गत लाथाळ्या माजून समाज दुभंगला होता. महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात दलित समाजावार खेडोपाडी मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होते. दलित समाजाला कुणी वालीच नव्हता. या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलित पँथरचा जन्म झाला. पँथरने त्या काळी महाराष्ट्रात आपला एक दरारा निर्माण करून दलित समाजाला अभय दिले होते. बाबासाहेबांचे लेखन सरकारी पैशाने छापून प्रभू रामचंद्रांची बदनामी का करण्यात येते, असा प्रश्न जेव्हा पत्रकार माधव गडकरींनी त्यांच्या लेखातून उपस्थित केला होता तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने दलित संघटनांनी अभूतपूर्व असा रिडल्सचा मोर्चाही काढला होता. बाबासाहेबांच्या नावास दलितविरोधी सवर्ण मानसिकतेने जो हिंस्र विरोध केला त्यास मूँहतोड जबाब देणारी नामांतराची लढाईसुद्धा दलितेतर परिवर्तनवाद्यांनी व आंबेडकरानुयायांनी मोठ्या तडफेने लढवून नामांतराचा लढाही जिंकला. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेला जमीन सत्याग्रहाचा लढाही अभूतपूर्व ठरला. या पार्श्वभूमीवर आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजातून आज जो तीव्र रोष व्यक्त होत आहे तो दलित, शोषित कष्टकरी समाजाच्या जीवन-मरणाच्या बुनियादी प्रश्नांना नजरेसमोर ठेवून चळवळीत रूपांतरित होणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे.
बाबासाहेबांच्या विचारांचा सोयवादी विसर पडल्यामुळे आज आंबेडकरी चळवळीस मरगळ आली आहे. बाबासाहेबांनी दलित शोषित समाजाच्या उद्धारासाठीच व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती; पण रिपब्लिकन नेत्यांनी पक्षाचे असंख्य तुकडे केले. सत्तेच्या तुकड्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाणी भरतानाच हिंदुत्ववाद्यांशी अनैसर्गिक मैत्री करतानाही कुणाला कुठलीच खंत वाटेनाशी झाली. समाजाला बौद्धिक मार्गदर्शन करण्याची ज्यांची जबाबदारी आहे तो बुद्धिवादी वर्गही काँग्रेस, भाजपाच्या आश्रयास गेला. (अपवाद) बाबासाहेबांनी म्हटले होते मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकर भवन पाडून याचा प्रत्यय आणून दिला. समाजातून जो आय.ए.एस., आय.पी.एस. वगैरे वर्ग तयार झाला त्याला बाबासाहेबांनी सांगितलेले सामाजिक ऋण फेडण्याचा विसर पडला. बाबासाहेबांनी अपार खस्ता खाऊन सामाजिक शैक्षणिक संस्था उभारल्या; पण हितसंबंधियांनी बाबासाहेबांच्या संस्थांची वाढ न करता त्यांच्या संस्थांची अवस्था मात्र दयनीय करून टाकली. बाबासाहेबांनी ज्ञानाशी, गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. मात्र, त्यांच्या शैक्षणिक संस्थांतून याचीच वानवा जाणवू लागली. आंबेडकर भवन पाडल्याचा समाजाचा राग रास्तच आहे; पण बाबासाहेबांच्या ठिकठिकाणच्या शैक्षणिक संस्थांच्या जागेत अतिक्रमण झाले याचा मात्र सर्वांनाच विसर पडला. ज्यांच्या हाती तूप-साय आहे ते समाजाचे काय याचा मात्र विचार करायला तयार नाहीत आणि समाजाचे तरी काय सांगावे? दिवसातून शंभर वेळा जयभीम म्हणणारा, पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून दीक्षाभूमी, चैत्यभूमी, महूला जाणारा समाज निवडणुकीत आपली मते विकू लागला. परिणामी, अस्तनीतील निखाऱ्यांनाही चेव येऊन मग ते निर्भयपणे बाबासाहेबांच्या वास्तू पाडतात. तात्पर्य, बाबासाहेबांच्या विचारांची मोडतोड थांबविणे आणि त्यांच्या संकल्पनेतील आंबेडकरी चळवळ उभारणे हे आंबेडकरानुयायांचे खरे कर्तव्य आहे. भावनिक उद्रेक संपला की, सारे गाडे परत मूळ पदावर येते याचा विसर आंबेडकरानुयायांना पडून चालणार नाही, असे म्हटले तर गैर ठरू नये.