आजचा अग्रलेख: असा पाऊस पाहिला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 06:50 AM2021-07-24T06:50:17+5:302021-07-24T06:50:52+5:30

संपूर्ण किनारपट्टीसह उत्तर कर्नाटक, महाराष्ट्रात राज्यभर पावसाने व्यापून टाकले आहे. तो कमी होण्याचे नाव घेत नसल्याने महापुराचे संकट लोकांच्या अंगणात आले आहे. 

never seen such rain in maharashtra | आजचा अग्रलेख: असा पाऊस पाहिला नाही!

आजचा अग्रलेख: असा पाऊस पाहिला नाही!

Next

एकविसावे शतक सुरू झाले अन् वारंवार येणाऱ्या महापुराने पाऊस म्हणजे संकट वाटू लागले आहे. उत्तम पाऊस झाला तर सर्व संकटातून मुक्ती देणारा, संकटमोचक वाटणारा हा पाऊस असा कसा महाभयंकर  बनला आहे ! २००५मध्ये कृष्णा खोऱ्यासह कोकण, उत्तर कर्नाटक इत्यादी विभागांत महापुराने थैमान घातले होते. तेव्हा ज्येष्ठांची पिढी म्हणत होती की, असा पाऊस पाहिलाच नाही. २०१९ मध्ये केवळ कृष्णा-भीमा नद्यांच्या खोऱ्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आणि २००५च्या महापुराच्या स्मृती पूर्णपणे वाहून गेल्या. आता परत लवकर अतिवृष्टी, महापुराचे संकट येणार नाही, असे वाटत असताना केवळ दोन दिवसांत वातावरण बदलून गेले. महानगरी मुंबईला दोन दिवस झोडपून काढले. आता संपूर्ण किनारपट्टीसह उत्तर कर्नाटक, महाराष्ट्रात राज्यभर पावसाने व्यापून टाकले आहे. तो कमी होण्याचे नाव घेत नसल्याने महापुराचे संकट लोकांच्या अंगणात आले आहे. 

विशेषत: कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांची दैन्यावस्था झाली आहे. बेळगावपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इत्यादी जिल्ह्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस अक्षरश: ओतला जातो आहे. महाबळेश्वरला नेहमी भरपूर पाऊस होतो; पण शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सहाशे मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दाजीपूर अभयारण्याच्या परिसरातून भोगावती आणि तुलसी या नद्यांचा उगम होतो. त्यांच्या पाणलोट क्षेत्रात आठशे मिलीमीटर पाऊस चोवीस तासांत झाला. महाराष्ट्राची मान्सूनच्या पावसाची वार्षिक सरासरी ६०० ते ७०० मिलीमीटर असताना एका दिवसात आठशे मिलीमीटर पावसाचे पाणी कोणती नदी वाहून घेत जाणार? लोकांनी नद्यांचे काठ आणि जोडलेले पाट उद्ध्वस्त करून नदीपात्रापर्यंत ऊस शेती केली आहे. अतिक्रमणे करून बांधकामे केली आहेत. नदीपात्रातील वाळू बेफाम उपसा करून गाळ भरला गेला आहे. अलमट्टीचे पाणी सोडण्याचे प्रमाण चांगले असल्याने मागे फुगवटा येण्याचा प्रश्नच नाही तरी कोल्हापूरच्या पश्चिमेचे पाणी पंचगंगेतून पुढे सरकत का नाही, याचा आता तरी गांभीर्याने विचार करायला हरकत नाही. 

अलमट्टीच्या नावाने बाेटे माेडून घेत तात्पुरती सुटका हाेईल; पण कायमची नाही. आता अलमट्टीचे कारण देता येणार नाही. काेल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाण्याची पातळी पंचेचाळीस ते पन्नास फूट हाेण्यास केवळ सहा-सात तास लागले. हा पाऊस असाच पडत राहिला तर सर्वच धरणांचे दरवाजे उघडावे लागतील. काेयना, वारणा, दूधगंगा या माेठ्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. बहुतांश धरणे सत्तर टक्क्यांहून अधिक भरली आहेत. परिणामी पावसाचे मुक्त पाणलाेट क्षेत्रातील पाणी आणि पाणलाेट क्षेत्रातून धरणात आलेले पाणी यांचा हिशेब घालण्यास संधीच नाही. कारण अद्याप  दाेन महिने पावसाळा आहे. धरणे सुरक्षित राहणे फार महत्त्वाचे आहे. काेकणातील नद्या अधिक उथळ असल्याने पाण्याला वेग प्रचंड असताे. यावेळी दरडी काेसळण्याचे प्रमाणही खूप माेठ्या प्रमाणात घडले आहे. मुंबई-ठाणे पट्ट्यात सलग तीन दिवस दरडी काेसळल्या, तसेच महाबळेश्वर परिसरात सुमारे वीस गावांवर दरडी काेसळल्या आहेत. काेकणला जाेडणारे सर्व घाट रस्ते बंद पडले आहेत. पुणे-बंगलाेर महामार्ग बंद पडला आहे. काेल्हापूर शहराला जाेडणारे सारे रस्ते बंद पडले आहेत. हवामान बदलाचा आणि अतिवृष्टीचा, तसेच ढगफुटीचा संबंध असणार आहे. कृष्णा नदीचे  खाेरे कधीच महापूरप्रवण नव्हते. वीस-पंचवीस वर्षांतून एक-दाेन दिवस अतिवृष्टी झाली तर महापूर यायचा आणि त्वरित पाणी उतरून जात असे. 

आता हा धाेका दरवर्षीचा झाला आहे. २०१९मध्ये महाप्रचंड महापूर आला हाेता. हादेखील अपवाद असावा, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आणि महापुराने काेल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कऱ्हाड आदी शहरांत येऊन मुक्काम ठाेकला आहे. काेकणात राजापूर, चिपळूण, खेड इत्यादी ठिकाणी काही तास पूर यायचा तसाच जायचा; पण यावेळी आठ दिवस टिकून आहे. या छाेट्या शहरांनी आपल्या विस्ताराची दिशाच बदलायला हवी. राजापूर शहर नदीपात्राच्या कडेवरून हलवून महामार्गावर वसविण्याचा प्रयत्न झाला; पण लाेक सहभागाविना ताे प्रयत्न अयशस्वी झाला. सांगली, काेल्हापूर, इचलकरंजी इत्यादी शहरांनी विस्ताराचा मार्ग बदलायला हवा. पावसाचा आनंद होण्याऐवजी लोकांना त्याची अक्षरश: भीती वाटू लागली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना झाली पाहिजे, अन्यथा दरवर्षी ‘असा पाऊस पाहिलाच नव्हता’, असे म्हणण्याची वेळ येईल...
 

Web Title: never seen such rain in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app