आसामच्या प्रश्नांना समजून घेणे गरजेचे

By Admin | Updated: October 23, 2014 01:48 IST2014-10-23T01:48:45+5:302014-10-23T01:48:45+5:30

गेल्या वर्षी बोधगया येथील महाबोधी मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्याची चौकशी करीत असताना लक्षात आले,

Need to understand Assam's questions | आसामच्या प्रश्नांना समजून घेणे गरजेचे

आसामच्या प्रश्नांना समजून घेणे गरजेचे

डॉ. अलका सरमा
आसाममधील राजकीय कार्यकर्त्या

गेल्या वर्षी बोधगया येथील महाबोधी मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्याची चौकशी करीत असताना लक्षात आले, की या स्फोटासाठी वापरण्यात आलेली साधने आसाममधील गुवाहाटी येथून आणण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात म्यानमारमधून हकालपट्टी झालेल्या रोहंगिया मुसलमानांचा हात होता हेही उघड झाले. या मुसलमानांवर म्यानमारने कारवाई केल्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. त्यांना स्वीकारण्यास बांगलादेश तयार नाही; कारण ते काही बांगलादेशचे नागरिक नाहीत. वास्तविक त्यांना कोणतेही राष्ट्र स्वीकारायला तयार नाही. तरीही त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे आणि आसामची सरहद्द त्यांना प्रवेश करण्यास सुलभ वाटते, म्हणून त्यांनी आसामात आश्रय घेतला आहे. अशा तऱ्हेने ३० हजार रोहंगिया मुसलमानांनी आसामात आश्रय घेतला आहे.
काही आठवड्यांपूर्वी ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा’ महत्त्वाचा घटक असलेल्या दिलबागसिंग याला गुवाहाटी येथे अटक करण्यात आली. खलिस्तान चळवळीसाठी शस्त्रास्त्रे संपादन करण्यासाठी दिलबागसिंग गुवाहाटीत होता.
पंजाब पोलिसांकडून समजले की जे तीन दहशतवादी
गट खलिस्तान निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांपैकी एका गटाचा दिलबागसिंग हा कमांडर होता. ईशान्येकडील भागातील, विशेषत: आसामातील जे दहशतवादी गट
आहेत त्यांच्यापाशी शस्त्रास्त्रांचा विपुल साठा आहे. त्यामुळे
ते इतर दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रे विकत असतात. ही शस्त्रास्त्रे चीनमधून आणण्यात येतात. भारताची म्यानमारसोबत असलेली सीमारेषा ही दहशतवाद्यांसाठी
स्वर्ग ठरली आहे. या सीमेवरून भारतात शस्त्रे आणणे अत्यंत सुलभ असते. नागालँड येथील दिमापूर हे शहर शस्त्रास्त्रांच्या विक्रीचे मोठे केंद्र आहे. अलीकडे दिमापूरहून आसामात आणण्यात येत असलेले शस्त्रास्त्रांचे साठे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले.
प. बंगालमध्ये बरद्वान येथे अलीकडे झालेल्या स्फोटाची चौकशी करताना बांगलादेशमधून आसामात दहशतवादी कशा पद्धतीने घुसखोरी करतात हे पाहायला मिळाले. बांगलादेश आणि आसाम येथे राहणाऱ्या लोकांच्या खाण्याच्या सवयी, पोशाख, भाषा, इ.मध्ये इतका सारखेपणा आहे, की त्यांना वेगळे काढणे कठीण होते. त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. बोधगया मंदिरावर झालेला हल्ला असो, की बरद्वान येथे झालेला स्फोट असो, त्यामागे आसामातील लोकांचा हात असल्याचे दिसून आले आहे. दारिद्र्यामुळे हे तरुण गांजलेले असल्याने ते सहज दहशतवादी कृत्यांकडे आकृष्ट होतात. त्यांना आसामात शस्त्रास्त्रे तयार करण्याचेही शिक्षण देण्यात येते.
आसाम आणि ईशान्य भारतातील इतर प्रदेशात वंश, धर्म, जात, भाषा आणि राष्ट्रीयत्व यांची विविधता आढळते. त्यामुळे एका गटाला दुसऱ्या गटाविरुद्ध संघर्ष करण्यास चिथावणी देणे येथे सोपे झाले आहे. त्यातूनच येथे हिंसाचाराच्या घटना घडत असतात. ब्रिटिशांनी फोडा, झोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबिली होती. आसामातही तोच प्रकार सुरू आहे. परस्परांविरुद्ध द्वेषाची भावना पसरविण्याचे पोषक वातावरण आसामात पाहावयास मिळते. त्यामुळे या भागात वांशिक भेदाची मुळे खोलवर रुजली असून, त्यातूनच शांतताभंगाची कृत्ये घडत असतात.
अशा परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस किंवा लष्कर काहीच करू शकत नाही. केवळ जमाती-जमातीतील सलोखा हा घटकच सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकतो. बदला घेण्याची भावना येथील प्रत्येक जमातीत आढळते. पण चांगल्या भवितव्याची प्रत्येक जमात आशा बाळगून आहे. भारतासारख्या विशाल देशाला संघराज्याचे स्वरूप अत्यंत उपयोगी ठरते. येथील प्रादेशिक पक्ष, प्रादेशिकतेची भावना, प्रादेशिकतेचे स्वरूप समजून घेऊन अन्य समाजघटकांनी ते स्वीकारायला हवे. तरच राष्ट्रही त्या समाजघटकांना स्वीकारू शकेल. याबाबतीत मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या प्रदेशाला एकूण भारतात सामावून घेण्याची प्रक्रिया वेगाने व्हायला हवी. त्यासाठी देशप्रेमाची भावना या समाजघटकात दृढ करावी लागेल. ती जबाबदारी देशाच्या मुख्य भागाने पार पाडायला हवी. त्यासाठी या भागाने कार्यक्रम आखावा. आसाम आणि ईशान्येकडील राज्ये यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी संपूर्ण भारताने आसामकडे लक्ष पुरवायला हवे. आसामच्या प्रश्नांविषयी भारतीय जनतेने काळजी करणे त्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.

Web Title: Need to understand Assam's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.