Need to take lessons from Bangladesh! | बांगलादेशपासून धडा घेणे गरजेचे!
बांगलादेशपासून धडा घेणे गरजेचे!

ठळक मुद्देगत तीन वर्षांपासून बांगलादेश सातत्याने वृद्धी दराच्या बाबतीत भारतावर मात करीत आहे.बांगलादेशाने आर्थिक वृद्धी दरात जो चमत्कार घडवून दाखवला आहे, तो औद्योगिक क्षेत्राच्या बळावर! दुसरीकडे बांगलादेशाची निर्यात मात्र तब्बल ८.८ ते ११.५ टक्क्यांनी वाढत आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे गुरुवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आगमन झाले. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर हसिना प्रथमच भारतात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतातील मतदात्यांनी नरेंद्र मोदी यांना, तर बांगलादेशी मतदात्यांनी शेख हसिना यांच्यावर भरघोस विश्वास प्रकट केला. बांगलादेशची सुत्रे शेख हसिना यांच्याकडे आल्यापासून भारत आणि बांगलादेशातील द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय सुधार झाला आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर उभयपक्षी संबंध आणखी उंच पातळीवर पोहचले आहेत. कधीकाळी बांगलादेशही पाकिस्तानप्रमाणेच भारतासाठी डोकेदुखी बनला होता, यावर आता कुणी विश्वासही ठेवणार नाही, एवढे उभय देशांमधील संबंध मैत्रीपूर्ण झाले आहेत.


संबंध मैत्रीपूर्ण झाले असतानाच, आता बांगलादेश आर्थिक आघाडीवर भारतासोबत स्पर्धाही करू लागला आहे. आशियाई विकास बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दक्षिण आशियातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था हा बहुमान बांगलादेशाने भारताकडून हिरावला आहे. गत आर्थिक वर्षात बांगलादेशचा वृद्धी दर ७.९ टक्के होता, तर भारताचा ६.८ टक्के! पुढील वर्षी बांगलादेशची अर्थव्यवस्था ८.१ टक्के दराने वाढेल, तर भारताची ६.५ टक्के दराने! त्याच्या पुढील वर्षात बांगलादेशचा वृद्धी दर अवघ्या ०.१ टक्क्याने घटून ८.० टक्के होईल, असा अंदाज आहे. त्या वर्षात भारताचा वृद्धी दर वाढण्याचा अंदाज आहे; मात्र तरीही तो बांगलादेशाच्या तुलनेत ०.८ टक्क्यांनी कमीच असेल! गत तीन वर्षांपासून बांगलादेश सातत्याने वृद्धी दराच्या बाबतीत भारतावर मात करीत आहे.
भारतात बांगलादेशची प्रतिमा मागास, गरिबीत पिचलेला देश अशीच आहे. अजूनही बव्हंशी तेच बांगलादेशाचे वास्तव आहे; मात्र गत काही वर्षांपासून त्या देशाने कात टाकायला प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे भारतातील मंदीसदृश स्थितीसाठी औद्योगिक क्षेत्रातील पिछेहाटीला प्रामुख्याने जबाबदार धरले जात असताना, बांगलादेशाने आर्थिक वृद्धी दरात जो चमत्कार घडवून दाखवला आहे, तो औद्योगिक क्षेत्राच्या बळावर! गत काही वर्षांपासून सेवा उद्योग क्षेत्र हे भारताच्या आर्थिक विकासाच्या गाड्याचे इंजीन बनले आहे. बांगलादेशात मात्र औद्योगिक क्षेत्र इंजीनची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये तयार कपडे (रेडीमेड गारमेंट) उद्योगाचा सिंहाचा वाटा आहे. आज भारतासह जगातील कोणत्याही देशात तुम्ही तयार कपडे खरेदी करता, तेव्हा ते कपडे बांगलादेशात बनले असण्याची दाट शक्यता असते.
औद्योगिक क्षेत्रात घेतलेल्या या झेपेचा बांगलादेशाला दुहेरी फायदा झाला आहे. एक तर रोजगार निर्मितीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि निर्यातही खूप वाढली आहे. तयार कपड्यांच्या जागतिक बाजारपेठेत वाढत असलेल्या बांगलादेशाच्या दबदब्याचा थेट फटका भारतीय उद्योगांना बसत आहे. भारतीय मालापेक्षा दर्जेदार व स्वस्त माल बांगलादेशातून उपलब्ध होत असल्याने जगभर बांगलादेशात तयार झालेल्या कपड्यांची मागणी वाढतच आहे. गत सहा वर्षांपासून भारताच्या निर्यातीमध्ये अवघ्या दीड टक्क्यांची वार्षिक वाढ होत आहे. दुसरीकडे बांगलादेशाची निर्यात मात्र तब्बल ८.८ ते ११.५ टक्क्यांनी वाढत आहे. लवकरच जागतिक महासत्ता होणार असल्याचा दावा करीत असलेल्या भारताने बांगलादेशच्या या नेत्रदीपक प्रगतीतून धडा घेणे गरजेचे आहे.


आज भारतात आर्थिक मंदीसदृश वातावरण आहे. अर्थतज्ज्ञ त्यासाठी प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील पिछेहाट, निर्यातीत अपेक्षित वाढ न होणे आणि रोजगार निर्मिती ठप्प होण्यास जबाबदार ठरवित आहेत. या पाशर््वभूमीवर भारताने बांगलादेशाकडून काही धडे घेणे गरजेचे आहे. जर बांगलादेशासारखा सर्वच बाबतीत पिछाडलेला देश औद्योगिक क्षेत्राची झपाट्याने वाढ करू शकतो, निर्यातीचे नवनवे विक्रम करू शकतो, तर भारताला ते का जमत नाही, याचा अत्यंत गांभीर्याने विचार होणे आणि त्यावर उपाय शोधणे अत्यंत गरजेचे आहे. देशाची प्रगती होण्यासाठी देशाबाहेरून देशात पैशाची आवक होणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी आयातीच्या तुलनेत निर्यात वाढविण्याशिवाय इतर कोणताही पर्याय असू शकत नाही. कृषी क्षेत्र निर्यातवाढ करण्यास आणि रोजगार निर्माण करण्यास सक्षम नसेल, तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यापैकी सेवा क्षेत्रामध्ये वाढ होण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राशिवाय पर्याय नाही. इथे बांगलादेशच्या उदाहरणावरून भारताला बरेच काही शिकता येऊ शकते.
अर्थात भारत आणि बांगलादेशातील कार्यसंस्कृती आणि कायदे व नियमांमधील फरकामुळे भारताला बांगलादेशाचा कित्ता हुबेहूब गिरविता येणार नाही; मात्र अवघ्या काही वर्षात त्या देशाने औद्योगिक क्षेत्र आणि निर्यातीमध्ये वाढ कशी केली, आर्थिक मंदीचा प्रभाव जगभर दिसून येत असताना, बांगलादेश मात्र त्यापासून कसा मुक्त राहू शकला, याचा अभ्यास निश्चितपणे फायद्याचा ठरू शकतो.

- रवी टाले    
ravi.tale@lokmat.com  

Web Title: Need to take lessons from Bangladesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.