राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी जनतेला पुन्हा एकवार दिलेले, जम्मू आणि काश्मीरच्या प्रदेशाला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन महत्त्वाचे व तेथील जनतेला दिलासा देणारे आहे. त्या प्रदेशातील वातावरण निवळताच हा दर्जा त्याला पुन्हा दिला जाईल, असे ते म्हणाले आहेत. त्याच वेळी त्या प्रदेशात निवडणुका घेण्यात येऊन तेथे सध्याच्या केंद्रशासित प्रदेशाचे सरकार स्थापन करण्यात येईल व त्यामार्फत त्या प्रदेशात मोठ्या सुधारणा घडवून आणल्या जातील, असेही ते म्हणाले आहेत. (या भाषणात त्यांनी लेह-लडाखच्या प्रदेशाचा उल्लेख टाळणे उचित समजले आहे. कारण त्या प्रदेशावर चीनची असलेली नजर साऱ्यांना ज्ञात आहे. त्यासाठी तो प्रदेश केंद्राच्या नियंत्रणात राहणे आवश्यकही आहे.)याच वेळी ईद या मुसलमानांच्या पवित्र सणाच्या वेळी त्या सबंध प्रदेशातील नियंत्रण सैल केले जाईल आणि जनतेला या सणात मोकळेपणे भाग घेता येईल याचीही शाश्वती त्यांनी दिली. काश्मिरी जनतेला अशा आश्वासनाची आवश्यकता होती आणि तेही पंतप्रधानांकडून दिले जाणे महत्त्वाचे होते. तथापि, ३७० वे कलम रद्द करणे आणि ते जनतेच्या गळी उतरविणे ही गोष्ट साधी नाही. जनतेवरील नियंत्रण सैल होताच व तेथील नेत्यांना मोकळे करताच त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर असंतोष उसळेल अशी भीती अजूनही साऱ्यांना वाटते. हा असंतोष प्रत्यक्षात उसळला तर तो कमालीच्या सौम्यपणे व संयमाने हाताळणे ही तेव्हाची गरज असेल. दुर्दैवाने काश्मिरी जनतेला संयमी व सौम्य हाताळणीची सवय नाही, त्यामुळे तसे करणे अधिक गरजेचे आहे. शिवाय सरकारकडून जराही जास्तीची कारवाई झाली तर अतिरेक्यांचा वर्ग आणि पाकिस्तानचे सरकार त्याचा गैरफायदा घेऊ शकेल आणि तो प्रश्न पुन्हा जागतिक बनविण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकेल.
संपादकीय : काश्मीर प्रश्नाबाबत आश्वासक भूमिकेची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:38 IST