Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

By किरण अग्रवाल | Published: April 22, 2021 09:39 AM2021-04-22T09:39:41+5:302021-04-22T09:42:29+5:30

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे.

Nashik Oxygen Leak: The accident in Nashik is mind numbing | Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

Next

- किरण अग्रवाल

एकीकडे कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील बाधितांना रुग्णालयातील ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याची सार्वत्रिक ओरड होत असताना दुसरीकडे नाशकात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तब्बल 24 रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु मरण कसे स्वस्त होऊ पाहते आहे हेदेखील यातून स्पष्ट व्हावे.

नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे, कारण ही एक दुर्घटना तर आहेच परंतु त्याच सोबत यामध्ये व्यवस्थांच्या बेपर्वाईचा पदरही लाभुन गेलेला दिसतो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन टॉकीत वायू भरला जात असताना त्या टाकीच्या व्हालमधून गळती होतेच कशी व गळती सुरू झाल्यानंतर ती रोखण्यासाठी दीड ते दोन तासांची यातायात करण्याची वेळ का आली, असे काही प्रश्न यातून समोर येऊन गेले आहेत ज्याची उत्तरे शोधली जाणे गरजेचे ठरले आहे.

नाशकातील ज्या डॉ जाकिर हुसेन रुग्णालयात ही दुर्घटना घडली ते हॉस्पिटल पूर्णतः कोरोना बाधितांसाठी वाहिलेले आहे. अवघ्या महिनाभरापूर्वीच तेथे ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. या टाक्या खरेदी करून स्वतः बसविण्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या भाड्याने घेतल्या आहेत, त्यामुळे त्यासंबंधीची हाताळणी करण्याचा ठेका, त्यातील अटी शर्ती आणि ठेकेदारीची गणिते यानिमित्ताने चर्चेत येऊन गेली आहेत. व्यवस्थेची हाताळणी जर ठेकेदाराची जबाबदारी असेल तर या गळतीचा व त्यातून जीव गमावलेल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. राज्य शासनाने व महापालिकेनेही जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या आहेत, परंतु पैशाने संबंधितांचा जीव परत येणार नाही. झालेली हानी भरून निघणे शक्य नाही, त्यामुळे या संदर्भातील बेपर्वाईची निरपेक्षपणे चौकशी होऊन यापुढे असे व्यवस्थेतील दोष टाळण्या बाबत लक्ष दिले जाणे अगत्याचे आहे. 

Nashik Oxygen Leak: High level inquiry into Nashik tragedy to be held, CM orders | Nashik Oxygen Leak: नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

राहिला विषय राजकारणाचा, तर ही घटना दुर्घटनाच आहे यात शंका नाही; त्यामुळे त्यावर उगाच राजकारण करणे योग्य ठरू नये. पण एकीकडे एकेक जीव वाचवणे महत्त्वाचे ठरले असताना एकाच वेळी तांत्रिक दोषातून इतक्या मोठ्या प्रमाणात जीव गमावले जात असतील तर यात होणाऱ्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करता येऊ नये. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने व महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने, उठसूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांनी यासंबंधीचे भान बाळगायला हवे. झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल काय यायचा तो येईलच; परंतु वैद्यकीय तांत्रिक सज्जता व तज्ज्ञता याकडे यानिमित्ताने लक्ष देणे किती गरजेचे आहे ते लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्णालये, बेड्स, ऑक्सीजन, इंजेक्शन्स याची कमतरता अधिक भासण्याची लक्षणे पाहता किमान जी व्यवस्था उपलब्ध आहे त्यातील तांत्रिक दोष कसा टाळता येईल व तज्ज्ञांच्या सेवा घेऊन नाशकात घडल्यासारखी दुर्घटना कशी टाळता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाले व या दुर्घटनेतील हलगर्जीपणाला कारक ठरलेले घटक शोधले गेले तर यात बळी गेलेल्यांच्या जीवाला खरी श्रद्धांजली लाभेल. केवळ अश्रू ढाळून व आरोपांच्या पिचकाऱ्या मारून चालणार नाही, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या सक्षमतेच्या दृष्टीनेही गांभीर्याने विचार करून निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.

Web Title: Nashik Oxygen Leak: The accident in Nashik is mind numbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.