निलेकणी अभिनंदनास पात्र; पण अशी 'नंदन' वने फुलावी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:18 AM2023-06-22T10:18:22+5:302023-06-22T10:21:58+5:30

निलेकणी हे देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत.

Nandan Nilekani deserves congratulations; But such a 'paradise' forest should bloom! | निलेकणी अभिनंदनास पात्र; पण अशी 'नंदन' वने फुलावी! 

निलेकणी अभिनंदनास पात्र; पण अशी 'नंदन' वने फुलावी! 

googlenewsNext

चक्रीवादळाचे थैमान, त्यामुळे देशभर लांबलेले मान्सूनचे आगमन, परिणामी चिंताक्रांत झालेला बळीराजा, मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचाराचा डोंब, क्षुल्लक कारणांवरून निर्माण होत असलेले धार्मिक- जातीय तणाव, असे नकारात्मकतेचे मळभ दाटले असतानाच, मंगळवार एका आनंददायक बातमीची सुखद सर घेऊन आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी मुंबईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटी) तब्बल ३१५ कोटी रुपयांची देणगी दिली, ही ती बातमी निलेकणी यांना १९७३ मध्ये मुंबई आयआयटीत विद्युत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश मिळाला होता. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी ही भरीव देणगी दिली. 

निलेकणी हे देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. आज इन्फोसिसची वार्षिक उलाढाल अब्जावधी डॉलर्सच्या घरात आहे. त्यामुळे निलेकणी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून पदवी घेतली, त्या संस्थेला देणगी दिली, तर त्यात काय मोठे? अशा नाक मुरडणाऱ्या प्रतिक्रिया उमटू शकतात; पण निलेकणी यांच्यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळविणारे अनेक उद्योगपती भारतात आहेत आणि त्यांच्यापैकी किती जणांनी अशा मोठ्या देणग्या दिल्या आहेत? भारतीय संस्कृतीत दानधर्माला खूप महत्त्व दिले आहे. अनेकजण दानधर्म करतातही; पण दान सत्पात्री पडावे, याची काळजी किती जण घेतात? निलेकणी यांनी ती घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या देणगीचे महत्त्व मोठे आहे. पाश्चात्य जग भौतिक सुखाला जास्त महत्त्व देते आणि आम्ही मात्र मोहमायेपासून दूर राहतो, असा अभिमान आपण भारतीय बाळगतो. तो सार्थ की वृथा, हे ज्याचे त्याने ठरवावे; पण पाश्चात्य जग आणि भारतातील धनाढ्य मंडळींकडून केल्या जाणाऱ्या परमार्थाची तुलना केल्यास, भारतीयांवर नक्कीच मान खाली घालण्याची वेळ येते. 

सात पिढ्यांसाठी तरतूद करून ठेवणे, हा वाक्प्रचार भारतात ठायीठायी वापरला जातो; पण सातच काय सत्तर पिढ्या काहीही न करता सुखात जगू शकतील, एवढी तरतूद करून ठेवल्यावरही पैशांची हाव सुटत नाही, अशी अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या अवतीभवती असतात. दुसरीकडे आपण ज्यांच्यावर भौतिक सुखांच्या मागे धावण्याचा ठपका ठेवतो, ते पाश्चात्य मात्र आयुष्य सुखासमाधानात व्यतित केल्यावर आपल्या पुढील पिढ्यांची फार काळजी न करता, गाठीशी असलेला पैसा सत्कर्मी लावताता पाश्चात्य जगातील उद्योगपतींनी स्थापन केलेली विविध प्रतिष्ठाने आणि त्या माध्यमातून जगभरात वंचितांसाठी केली जाणारी कामे बघितली, तर डोळे फाटायला होतात. भारतातही काही उद्योगपती अशी कामे करतात; परंतु दुर्दैवाने त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, एवढी कमी आहे. त्यामागचे कारण पाश्चात्य जग आणि भारताच्या भिन्न सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीत दडलेले आहे. 

भारतातील सामाजिक चौकटीत पूर्वापार अध्यात्म, दानधर्म यावर जास्त जोर देण्यात आला आहे. त्यामुळे इहलोकात अवतीभवती दृष्टीस पडत असलेले दीनदुबळे, वंचित, पीडित यांच्याकडे दुर्लक्ष करून, स्वर्गलोकात स्थान मिळविण्यासाठी आमची सगळी धावपळ सुरू असते. इहलोकातील दीनदुबळ्यांच्या सेवेतच खरे स्वर्गसुख असल्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची शिकवण कधीच आमच्या पचनी पडली नाही. आम्ही त्यांना केवळ त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. दुसरीकडे पाश्चात्य जगात वंचित घटकांसाठी सहाय्यभूत ठरतील, अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यांच्या कडक नियामक धोरणांनीही त्यामध्ये मोठी भूमिका अदा केली. 

भारतात मात्र उद्योगांची सामाजिक बांधिलकी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) ही संकल्पनाच पाश्चात्य जगाच्या तुलनेत खूप उशिरा म्हणजे पार २०१३ मध्ये आली. त्यानंतरच्या एक दशकातही सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे आणि कडक नियामक धोरणे अमलात आणण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. बरेचदा भारतीय उद्योग आणि पाश्चात्य जगातील उद्योग यांची बरोबरी होऊ शकत नाही, अशी मांडणी केली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यामध्ये तथ्यही होते; पण अलीकडे भारतीय उद्योगांनी मोठी झेप घेतली आहे. सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात मात्र ती झेप दुर्दैवाने दिसलेली नाही. देशाला पुढे न्यायचे असल्यास तंत्रज्ञानावरच जोर द्यावा लागणार आहे. ती जाणीव ठेवल्याबद्दल नंदन निलेकणी अभिनंदनास पात्र आहेत; पण अशी आणखी किती तरी 'नंदन'वने फुलणे आवश्यक आहे.

Web Title: Nandan Nilekani deserves congratulations; But such a 'paradise' forest should bloom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.