मस्क म्हणतात, ‘ते’ मला मारून टाकतील!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 10:59 IST2025-03-22T10:58:44+5:302025-03-22T10:59:19+5:30
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत ठळकपणे भरणारी एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जगातील गर्भश्रीमंत इलॉन मस्क यांची ‘दोस्ती’ अधिक गहिरी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं.

मस्क म्हणतात, ‘ते’ मला मारून टाकतील!'
संदर्भ बदलला, परिस्थिती बदलली की अनेक गोष्टी बदलतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर खुद्द त्या देशासाठी आणि जगासाठीही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मित्र बदलले, भूमिका बदलल्या, ‘हिशेब’ बदलले..
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत ठळकपणे भरणारी एक गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जगातील गर्भश्रीमंत इलॉन मस्क यांची ‘दोस्ती’ अधिक गहिरी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं. त्यामुळेच ट्रम्प यांच्या प्रशासनात इलॉन मस्क यांचं वजन वाढलं. त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. त्यांनी जणू अमेरिका आणि जगच बदलायला घेतलं. यातली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे DOGE. - काय आहे ही योजना? ट्रम्प आणि मस्क यांच्या मते अमेरिकेत वायफळ खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि ‘बिनकामाचे’ कमर्चारी तर इतके भरून ठेवले आहेत की त्यांच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे अशा ‘बेकार’ कर्मचाऱ्यांना कामावरून, नोकरीवरून तातडीनं काढून टाकून अमेरिकन व्यवस्था स्वच्छ करण्याचा विडा त्यांनी उचलला. अर्थातच यात सर्वांत मोठी भूमिका बजावली आणि बजावत आहेत ते इलॉन मस्क.
स्वत:च्या खासगी कंपन्यांतले कर्मचारी त्यांनी ज्या तडकाफडकी काढून टाकले, त्यांना घरी पाठवलं, तीच आणि तशीच पद्धत अवलंबत त्यांनी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरी पाठवलं. अर्थातच ज्यांच्या पोटावर पाय पडला, ज्यांना अचानक नोकरीतून काढून टाकलं, त्यांच्यापुढे जगण्या-मरण्याचाच प्रश्न निर्माण झाला. ते सगळे मस्क यांच्याकडे खाऊ की गिळू या नजरेनं पाहू लागले. संतापलेल्या नागरिकांनी मस्क यांच्या कंपनीनं तयार केलेल्या टेस्ला गाड्यांनाच आपलं लक्ष्य बनवायला सुरू केलं. लोकांनी आतापर्यंत अनेकांच्या टेस्ला गाड्यांना आग लावली, जाळून त्या भस्मसात केल्या. यासंदर्भात मस्क यांनी अतिशय गंभीर विधान करताना मोठी चिंताही व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, नाराज झालेल्या, चिडलेल्या या लोकांनी एकत्र येऊ आता षड्यंत्र रचायला सुरुवात केली आहे. मला मारून टाकण्याचा त्यांचा इरादा आहे.
फाक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, जेव्हा कोणीतरी एखादा, फसवणूक करणाऱ्या लोकांना पकडतो किंवा फसवणूक करून निर्माण केलेली संपत्ती तो त्यांच्याकडून काढून घेतो, तेव्हा असे लोक खूप अस्वस्थ होतात. जी व्यक्ती अशी फसवणूक रोखते, ती रोखण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यास मारून टाकण्याचा विचार हे लोक करतात. या घटनेत ती व्यक्ती म्हणजे मी आहे!
मस्क म्हणतात, टेस्लाच्या गाड्यांचा, टेस्लातील कर्मचाऱ्यांचा किंवा ज्यांनी टेस्ला गाड्या खरेदी केल्या आहेत, त्यांचा याच्याशी काय संबंध आहे? त्यांच्या गाड्या कशासाठी जाळता? अशा उपद्रवी लोकांना टेस्लाचं नुकसान करायचं आहे, कारण प्रशासनातील ‘कचरा’ काढण्याचा आणि भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मस्क यांचं म्हणणं आहे, ही फसवणूक इतकी मोठी आहे की, अमेरिकन अर्थव्यवस्थेला त्यामुळे दरवर्षी दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान सहन करावं लागतं आहे. असंच जर चालू राहिलं असतं, अमेरिकेचं दिवाळं निघायला वेळ लागला नसता..