मुंबई स्फोटाच्या तोंडावर उभी!

By Admin | Updated: February 1, 2016 02:26 IST2016-02-01T02:26:24+5:302016-02-01T02:26:24+5:30

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे.

Mumbai stands on the face of explosives! | मुंबई स्फोटाच्या तोंडावर उभी!

मुंबई स्फोटाच्या तोंडावर उभी!

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे. एक चौ.किमी म्हणजे १०० हेक्टर्स असे गृहीत धरले तर मुंबईचे क्षेत्रफळ आज ३३,४७१ हेक्टर्स होते. या संपूर्ण जागेवर पायाभूत सोयीसुविधा, लोकलचे जाळे वगळता उरलेल्या जागेवर १.५ कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले सहावे शहर बनले आहे. २०३० मध्ये मुंबईची लोकसंख्या २.८ कोटींच्या घरात जाईल, त्यावेळी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले चौथे शहर बनेल.
या मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी देवनार १३२, मुलुंड २५, गोराई १९.६, तर कांजूरमार्ग १४१ हेक्टर्स अशी चार डम्पिंग ग्राउंड्स आहेत. मुंबईकरांचा कचरा या ३१७ हेक्टर्स जागेवर जमा होतो. साहजिक चारही डम्पिंग ग्राउंडच्या परिसरातील लोक आज जीव मुठीत घेऊन जगत आहेत. देशाच्या या आर्थिक राजधानीला शांघाय करण्याची घोषणा कुठे गेली माहिती नाही; पण साधा कचऱ्याचा प्रश्नही पुरेसा मार्गी लागलेला नाही. सगळी डम्पिंग ग्राउंड्स उपनगरात आणि जॉगर्स पार्क, समुद्रकिनारे, खेळाची अद्ययावत सुसज्ज मैदाने चर्चगेट, सीएसटी ते शीवपर्यंत एकवटली आहेत. मुंबईचा कचरा आमच्याकडे का, असा सवाल उपनगरांमध्ये राहणारे करू लागले आहेत.
यातून जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल तेव्हा होईल, पण देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने मात्र पेट घेतला. दोन दिवस मुंबईला कडकडीत उन्हात राख व धुराने वेढून टाकले. आगीचा फटका देवनार आणि परिसराला नाही तर अवघ्या मुंबईला बसला. थंडी असल्याने खूश असणाऱ्या मुंबईकरांनी धुके पसरले म्हणून आनंद साजरा केला. पण धुक्यासोबत येणाऱ्या राख आणि धूलिकणांची चादर कडकडीत उन्हातही कमी होईना तेव्हा कुठे घटनेचे गांभीर्य लोकांना कळाले.
प्रशासनाने देवनार परिसरातील शाळा, कॉलेजना दोन दिवसांची सुटी जाहीर केली. घरादारांच्या खिडक्या बंद करून बसण्याची वेळ या भागातल्या लोकांवर आली. पण मोठमोठ्या मॉलमध्ये मात्र उदंड गर्दी तशीच. ‘नटसम्राट’ असो की ‘एअरलिफ्ट’ लोक सिनेमांना गर्दी करीतच होते.
भेळ, वडापावच्या गाड्या असो की मासे विकणारे असोत, जो तो आपापल्या सोयीने कचऱ्यांचे ढीग वाट्टेल तेथे सोडून जाताना नेहमीच दिसतो. लोकही जाता येता रस्त्यावर, लोकलच्या डब्यात, सीटी बसमध्ये दिलखुलासपणे कचरा सोडून जात आहेत. पान खाऊन पिचकाऱ्या मारीत असतात.
आज डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याने पेट घेतला. महापालिकेचे अधिकारी ‘कचरा आहे, तो तर पेटणारच’ असे म्हणत हात वर करत आहेत. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य मंत्रालयापासून पालिकेपर्यंत कोणालाही नाही. स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली सगळेच बेलगाम वागत सुटले आहेत.
हे शहर कधीही झोपत नाही आणि कोणालाही उपाशी ठेवत नाही, यावरच्या अतिविश्वासापोटी प्रत्येकजण धावतोच आहे. कोणालाही मुंबईविषयी काही पडलेले नाही. हे शहर सुंदर राहिले पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, हे शहर टिकले तर आपण टिकू यावरही कोणाचा विश्वास उरलेला नाही. जो तो ओरबाडण्याच्या मागे लागला आहे.
वाढत्या लोकसंख्येचे आणि शहरांचे नियोजन ज्यांनी करायचे त्या राजकीय नेत्यांकडे पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पलीकडचा विचार नाही. मतांचे गठ्ठे जोपासणे याशिवाय दुसरा कार्यक्रम नाही. चरस, गांजा, अफू आणि गुंडगिरीच्या विळख्यातून स्वत:स मुक्त करून घेत सिंगापूरने कात टाकली आणि मग २०१५ मध्ये एक कोटी भारतीयांनी त्या शहराला भेट दिली. त्याचा आनंदोत्सव सिंगापूर पर्यटन विभाग साजरा करत आहे आणि दोन कोटी मुंबईकर मात्र ‘धुरांच्या रेषा हवेत काढी’ म्हणत बसले आहेत...
- अतुल कुलकर्णी

Web Title: Mumbai stands on the face of explosives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.