मुलायम सिंह यादव : सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 12:58 PM2022-10-11T12:58:58+5:302022-10-11T12:59:22+5:30

Mulayam Singh Yadav : देशातील काही राज्यांमध्ये काही नेते हे सर्वसामान्य घरातून आले सर्वसामान्य घरातून येऊन सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते झाले त्यांच्यापैकी एक मुलायम सिंह यादव.

Mulayam Singh Yadav : An extraordinary leader of common people | मुलायम सिंह यादव : सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते

मुलायम सिंह यादव : सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते

Next

- क्रांती शाह
  (संस्थापक, युवक बिरादरी)

राजकारणाची नाडी पकडण्याची अतुलनीय क्षमता असलेले अत्यंत लढाऊ नेते, समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गुरगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

तीस वर्षांपूर्वी दिल्लीत राम मनोहर लोहिया यांच्या चाहत्यांचं एक संमेलन भरलं होतं. माझ्या व्यक्तिगत जीवनात गांधी विचारांचे संस्कार झाले असले तरी राष्ट्रसेवा दलाच्या आकर्षणामुळे मी जयप्रकाश आणि लोहिया या व्यक्तिमत्वांकडे वळलो होतो. या दिल्लीच्या संमेलनात मी मुलायम सिंह यादव यांना प्रथमतः भेटलो आणि आमची ओळख झाली. पुढे काही काळानंतर बच्चन परिवार आणि युवक बिरादरी जवळ येत गेले. प्रामुख्याने जया बच्चन यांच्यामुळे. 2004 मध्ये माझा आणि मुलायम सिंह यादव यांचा पहिला प्रदीर्घ परिचय त्यांच्या निवासस्थानी झाला. माझी पार्श्वभूमी त्यांना काही प्रमाणात माहिती होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा मी चाहता तर आहेच मात्र ते मला पितृतुल्य आहेत. वसंतदादांच्याबद्दल आमचं बोलणं झालं, त्यांच्याच अनुषंगाने काही विषयांची ओळख करता करता मी मुलायम सिंह यांच्या जवळ पोहोचलो. राजकारणापलीकडे एक व्यक्ती म्हणून मला त्यांच्यातील अनेक पैलू शोधता आले. लाल मातीच्या आखाड्यात कुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले आणि उत्तम कुस्तीपटू असलेले मुलायम सिंह काही काळ शिक्षकी पेशात रमले. मात्र, त्यांचं शिक्षणावरच प्रेम पाहून मी थक्क झालो.

मुलांच्यावर भारतीय भाषेतील संस्कार झालेच पाहिजेत, मातृभाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय विरासत समजावून द्यायचे असेल तर आपल्या भाषा आपल्या उत्तम आल्या पाहिजेत हा आग्रह मला त्यांच्या ठायी जाणवला. पुढे जेव्हा मी त्यांना 'एक सूर एक ताल' या युवक बिरादरीच्या उपक्रमाची माहिती देत होतो तेव्हा ते मला म्हणाले, "क्रांती भाई आप उत्तर प्रदेश में एक सूर एक ताल सुरू करो" आणि 2004 मध्ये प्रजासत्ताक दिनी महिनाभराच्या अखंड आणि मोठ्या प्रयत्नांतर लखनऊच्या प्रसिद्ध स्टेडियमवर 30 हजार विद्यार्थ्यांचा एक सुर एक ताल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यासाठी उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने नेताजींच्या नेतृत्वात 1 महिन्याचा कालावधी आम्हाला प्रशिक्षणासाठी दिला होता आणि या कालावधीमध्ये पाच भारतीय भाषांमधील सात गीतांचे प्रशिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना दिलं होतं. त्यामध्ये मराठीतील केशवसुतांचं 'तुतारी' हे गीत मुलायम सिंह यादव यांना खूप आवडलं होतं. त्या गीताचा अर्थ त्यांनी मला विचारला, त्यामधील सामाजिक भाव जाणून घेतला आणि त्यांनी मला सुचवलं की माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत प्रतिवर्षी 15 जिल्ह्यांमध्ये किमान 1 लाख विद्यार्थ्यांना 'एक सूर एक ताल'चं प्रशिक्षण द्या. यामधून धार्मिक एकतेचा, पर्यावरणाचा आणि मूल्याधिष्ठित भारतीय भाषांचा संस्कार करण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य आम्हाला दिलं. 

पुढे सुदैवाने एका कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. या कार्यक्रमातून प्रभावित होऊन मुलायम सिंह यांनी मला त्यांच्या सैफई या मूळ गावी बोलावलं आणि देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ सैफई नगरीत दहा हजार विद्यार्थ्यांचा एक सुर, एक ताल कार्यक्रम सादर केला. आणि या माध्यमातून मी त्यांच्या अधिक जवळ गेलो आणि आमचे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होत गेले. मला अभिमानाने सांगावसं वाटतं की, मला कुठल्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नसताना माझ्या व्यक्तीगत आवडी निवडी आणि मुलायम सिंह यादव यांच्या मनात असलेलं विद्यार्थी प्रेम हे उत्तम जमलं. पुढे याच गोष्टींमुळे त्यांच्या निवासस्थानी माननीय राष्ट्रपती, राज्यपाल अशी दिग्गज मंडळी असताना त्यांनी मला जेवायला आमंत्रण दिलं. मुलायम सिंह यादव यांचं आपल्या कर्मभूमीवर विशेष प्रेम होतं. त्यांच्यामुळे सैफई ही शैक्षणिक क्षेत्रात आदर्श नगरी बनली होती. त्या ठिकाणी त्यांनी मास्टर चंदगीराम यांच्या नावाने हजारो खेळाडूंना एकत्र आणणारं एक उत्तम स्टेडियम निर्माण केलं होतं. हे स्टेडियम म्हणजे त्यांच्या क्रीडाप्रेमाचं द्योतक होतं. 

पुढे मी नेताजींच्या सोबत काम करत राहिलो आणि त्यांच्यामुळे मला उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली. व्यक्तिशः मी गायक किंवा वादक नसताना कार्यक्रम संकल्पना आणि संयोजन या गोष्टी माझ्या असल्यामुळे 2004 ते 2017 जवळजवळ 300 दिवस उत्तर प्रदेशात होतो. सामान्यातून असामान्य बनत गेलेल्या देशातील मोजक्या मुख्यमंत्र्यांपैकी ते एक. जनसामान्यांच्या बरोबर विशेषतः शेतकऱ्यांच्या सुखदुःखात समरस झालेलं हे व्यक्तीमत्व होतं. सर्वसामान्य घरातुन येऊनही उत्तर प्रदेशच्या जनतेच्या मनात मात्र त्यांनी स्थान मिळवलं होतं. भविष्यात देशाचं राजकारण बदलत गेलं मात्र मुलायम सिंह यादव यांच्यासारखी व्यक्तीचं स्थान मात्र लोकांच्या मनात कायम अढळ राहीलं. राजकीय लोकांच्या आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात मात्र जे व्यक्ती सर्वसामान्य लोकांच्या सोबत राहतात, त्यांच्यामध्ये समरस होतात, ती खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवून जातात. देशातील काही राज्यांमध्ये काही नेते हे सर्वसामान्य घरातून आले सर्वसामान्य घरातून येऊन सर्वसामान्य जनतेचे असामान्य नेते झाले त्यांच्यापैकी एक मुलायम सिंह यादव.

Web Title: Mulayam Singh Yadav : An extraordinary leader of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.