उंबरठा ओलांडणा-यांसाठी जवळ आलाय मुहूर्त !

By सचिन जवळकोटे | Published: September 8, 2019 11:00 AM2019-09-08T11:00:29+5:302019-09-08T11:06:01+5:30

लगाव बत्ती

Muhurt has come close to crossing the threshold! | उंबरठा ओलांडणा-यांसाठी जवळ आलाय मुहूर्त !

उंबरठा ओलांडणा-यांसाठी जवळ आलाय मुहूर्त !

Next


सचिन जवळकोटे

गेल्या दोन दिवसांपासून घरोघरी आलेल्या गौराईची पूजा करण्यात गृहिणी मग्न. घरातली सुख-समृद्धी उंबरठ्याच्या आतच राहावी म्हणून ‘थांब लक्ष्मीऽऽ कुंकू लावते’ म्हणत रात्रभर जागरण करण्यात दंग. उंबरठा.. किती साधा शब्द; परंतु या शब्दानं आजपावेतो रामायण-महाभारत घडविलेलं. यंदाच्या निवडणुकीतही हाच ‘उंबरठा’ धुमाकूळ घालतोय. होय...‘पक्षाचा उंबरठा’ ओलांडून ‘दुसºयाच्या घरात सत्तेचं माप’ टाकायला निघालेल्या आयाराम-गयारामांचा मुहूर्त अखेर या आठवड्यात निघतोय. 

किस्सा पहिला..
अण्णा लातुरात..अण्णा बंगल्यात !

सोलापुरात ‘कमळ’वाल्यांची यात्रा येण्यापूर्वीची ही घटना. आदल्या रात्री ‘देवेंद्रपंत’ लातुरात होते मुक्कामाला. त्या ठिकाणी त्यांना भेटायला खास ‘दुधनी’हून म्हणे गाडी गेलेली भेटायला. ‘पंतां’ची भेट झाली. सोलापूरच्या कार्यक्रमातच प्रवेशाचा सोहळा उरकून घेता येतो का, याचीही चाचपणी झाली. (याला म्हणतात लग्नात बारसं !) मात्र ‘पंतां’नी ‘बघूऽऽ करूऽऽ सांगतोऽऽ’ म्हणत स्पष्टपणे होकार देण्याचं टाळलं. ‘अण्णां’ची गाडी पुन्हा रिटर्न निघाली. आयुष्यात कधी पार्टी सोडण्याच्या फंदात हे घराणं पडलं नव्हतं. केवळ पालकमंत्र्यांच्या नादी लागून आता तसला विचार केला गेला. ‘कोल्हापूरचे मुन्ना अन् उस्मानाबादचे राणा’ सोेलापुरात व्यासपीठावर असतील तर त्यांच्यासोबत ‘अक्कलकोटचे सिद्धूअण्णा’च का नाहीत ? पालकमंत्री काय करताहेत ? असा सवालही ‘सिद्धूअण्णां’च्या गोटात उपस्थित केला गेला.
  खरंतर, अंदर की बात वेगळीच. ‘सिद्धूअण्णां’ना घ्यायला ‘देवेंद्रपंत’ही एका पायावर तयार; मात्र लाडक्या ‘सचिनदादां’च्या विरोधामुळं ते आजपावेतो शांतच. सोलापूरच्या सोहळ्यात ‘अण्णां’ना हार घालताना उगाच घोषणाबाजी झाली असती. ‘अमितभार्इं’समोर विनाकारण राडा घडला असता. देशभर गवगवा झाला असता. पक्षप्रतिमा खराब झाली असती, अशी ‘पंतां’ना भीती वाटलेली. क्या बात है.. आजपावेतो ‘कमळाची प्रतिमा’ उखडून टाकणाºयांनाच जवळ करत ‘पार्टी इमेज’चा विचार गंभीरपणे केला जातोय. असो. याच ‘सिद्धूअण्णां’ना सुशीलकुमारांनी नुकतंच बंगल्यावर बोलावून घेतलेलं. ‘दक्षिण’चे ‘शेळके’ही होते म्हणे साक्षीला. तिथं काय झालं, हे ‘उंबरठा’ ओलांडल्यानंतरच ओपन करू या. तोपर्यंत लगाव बत्ती...

किस्सा दुसरा..

दिलीपमालक बोलत्यात लय भारीऽऽ
सोलापुरात नुकताच ‘धनुष्यबाण’वाल्यांचा मेळावा झाला. कधी नव्हे ते सारे गट खूप दिवसांनी एकत्र आले. पक्षात राहून ‘गद्दारी’ करणा-यांसाठी मुठी आवळल्या गेल्या. बाहेरून पक्षात आलेल्या ‘प्रामाणिक’ नेत्यांना सलामही ठोकला गेला. आपण ‘धनुष्याची निष्ठा’ शंभर टक्के जपू, अशा शपथाही दोन्ही ‘दिलीप’रावांनी घेतल्या. एक बार्शीचे तर दुसरे कुमठ्याचे. सोबतीला ‘रश्मीदीदीं’नीही ‘पक्षनिष्ठा’ कशी जपायची असते, यावर कळवळून भाषण ठोकलं. आम्ही पामरं हे सारं मोठ्या कौतुकानं सांगतोय. उगाच कुणी कुत्सितपणे गालातल्या गालात हसू नये.
असो...‘दिलीप’मालकांनी मात्र मोठ्या दिलदारपणे ‘महेशअण्णां’साठी ‘मध्य’वरचा दावा सोडल्याची घोषणा भाषणात केली. वेळ फिरली की नेतेमंडळी ‘हातात धनुष्य’ घेतात हे सोलापूरकरांना माहीत होतं. मात्र ‘हातात धनुष्य’ आलं की नेतेमंडळींचे विचारही बदलतात, हे पाहून भोळ्या शिवसैनिकांना गलबलून आलं. ‘याराना असावा तर दिलीप मालक अन् महेशअण्णांसारखाऽऽ’ अशी कुजबूजही एकानं ‘बरडे-वानकर’कडं बघत केली. कार्यक्रम संपला.
  मात्र त्याच रात्री शहरात पुन्हा गलबला झाला. फोनाफोनी झाली. ‘मध्य’मध्ये दिलीपमालक उभारले तर चित्र काय राहील ? निकाल काय लागेल ? याचा अंदाज म्हणे खुद्द ‘मालकां’च्या गोटातूनच घेतला जाऊ लागला. कैक मेंबरांनाही फोन गेले. ही गोष्ट मुरारजी पेठेत पोहोचली. पक्ष बदलल्यानंतरही ‘हात’वाले पिच्छा सोडत नाहीत, याची पुरती जाणीव ‘महेशअण्णां’ना झाली. म्हणूनच की काय, तेही आतून ‘कमळ’वाल्यांशी टचमध्ये. ‘देवेंद्रपंतां’ना आपल्या मंदिरात बोलाविण्यासाठी ते परंड्याच्या ठाकुरांनाही भेटलेले. कोल्हापूरच्या ‘चंदूदादां’कडूनही ‘कामाला लागाऽऽ’चा शब्द घेतलेला...अन् हेच सर्वात मोठ्ठं दुखणं ‘तानाजीरावां’चं. कारण ‘सावंतशाही’साठी सर्वात मोठे विरोधक म्हणे ‘कमळ’वालेच. सर्वात मोठे स्पर्धक म्हणजे ‘मातोश्री’शी डायरेक्ट लिंक वालेच. लगाव बत्ती...

किस्सा तिसरा..

‘विजूमालकां’ना पालकमंत्रीपद कसं काय मिळालं, याचं ‘उत्तर’ आजपावेतो कट्टर कार्यकर्त्यांना न सापडलेलं. ‘केवळ आपल्याला शह देण्यासाठी काळजापूरच्या देशमुखांना मोठं केलं जातंय,’ हे ओळखण्याइतपत होटगी रोडवरचे देशमुखही नसावेत नक्कीच भोळे...असो. या दोन देशमुखांचा विषय नुकताच मुंबईतल्या एका मंत्र्याच्या बंगल्यात निघाला. त्याचं झालं असं...‘वारणानगर’च्या एका मोठ्या नेत्याला घेऊन ‘उत्तर’मधले ‘मिलिंद वकील’ नुकतेच ‘चंदूदादां’ना अत्यंत ‘विनय’शीलपणे भेटले. त्यावेळी बोलता-बोलता आतली वेगळीच माहिती कानी पडली. दोन देशमुखांच्या कुरघोड्यात पार्टीच्या दोन हमखास जागा हातच्या तर जाणार नाहीत नां, याचा म्हणे गुप्त सर्व्हे एक खाजगी कंपनी सोलापुरात करतेय. तसा रिपोर्ट दिल्लीला गेला तर कदाचित शेवटच्या क्षणी धक्कादायक निर्णय घेण्याच्या मानसिकतेत वरिष्ठ नेते मंडळी. म्हणजे ‘बापू’ थेट तुळजापूरकडं तर ‘मालक’ चक्क अक्कलकोटला; कारण कोणतीही रिस्क घेण्याच्या अवस्थेत नसलेले ‘कमळ’वाले करू शकतात काहीही. दोन्ही देशमुखांना पाठवू शकतात तुळजापूर-अक्कलकोटच्या देवदर्शनालाही.
...हा रिपोर्ट येतोय येत्या मंगळवारपर्यंत. मात्र असा निर्णय होण्याची शक्यता कमीच...कारण ‘विजूमालक’ हे तसे ‘पंतां’चे अत्यंत लाडके. सोलापूरच्या जनादेश यात्रेत व्यासपीठावर आठवणीनं त्यांनी ‘मालकां’ना भाषण करायला लावलेलं. इकडं ‘सुभाषबापू’ही ‘नागपूरकरां’च्या खास मर्जीतले. ‘भीमा-सीना’ खो-यात फुललेलं उसाचं शिवार सोडून थोडंच ते तुळजापूरच्या दुष्काळी घाटात जातील ? लगाव बत्ती...

दादां’ना तिकीट पाहिजे...
...‘कमळ’वाल्यांना आमदार पाहिजे !

गेले काही दिवस शांत बसलेल्या ‘बबनदादा’ गटात कालपासून भलताच उत्साह दाटून आलाय. बहुधा वरनं सांगावा आलाय, ‘कमळ तुमच्यासाठीच हायऽऽ’ म्हणूनच की काय गावोगावी बैठका झडू लागल्यात. खरंतर, निर्णय अगोदरच ठरलाय. आता केवळ चाचपण्या सुरू झाल्यात. यंदा काहीही करून माढ्याच्या ‘दादां’ना कमळाचंच तिकीट पाहिजे...तर ‘कमळ’वाल्यांनाही निवडून येणाराच आमदार... कारण या मतदारसंघात एकही नाव ‘गॅरंटेड’ दिसेना. ‘सावंत’ही म्हणे तिकडं परंड्यातच गुंतणार. टेंभुर्णीच्या ‘कोकाटें’नी ‘अकलूजच्या दादां’साठी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र ‘दादा अकलूजकर’ स्वत: काही माढ्यात उभारणार नाहीत; कारण ‘पंढरपूर’चं दूध पोळल्यानंतर ‘माढ्या’चं ताकही ते दहावेळा फुंकून पिण्याचा केवळ विचारच करताहेत.. अन् वेळ पडली तर मोडनिंबच्या ‘शिवाजीरावां’ना ते दुसºया चिन्हावर आतून ताकद देण्याची शक्यताही कमीच. कारण ‘हात-घड्याळ’च्या काळात काहीही केलं तरी चालायचं. इथं ‘कमळ’ पडलं भलतंच ‘शिस्तप्रिय’. नव्या पार्टीत एवढा मोठा धोका पत्करण्याची मानसिकताही नाही कुणाचीच. त्यामुळे ‘बबनदादा-देवेंद्रपंतां’मध्ये ‘आमचं ठरलंय’. पण या गदारोळात बिच्चाºया ‘संजयमामां’चं काय ? आहे ते अध्यक्षपद टिकविलं तरी पुष्कळ. लगाव बत्ती..

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Muhurt has come close to crossing the threshold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.