मिस्टर मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 09:33 IST2025-04-04T09:32:44+5:302025-04-04T09:33:43+5:30

Elon Musk: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी लिबरल-डेमॉक्रॅट न्यायाधीशाची निवड करून विस्कॉन्सिनने अमेरिकेत राजकीय वारं फिरत असण्याचे संकेत दिले आहेत.

Mr. Elon Musk, money cannot buy people! | मिस्टर मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात!

मिस्टर मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात!

- निळू दामले
(ज्येष्ठ पत्रकार) 

अमेरिकेतील राजकीय वारं आता फिरलंय. ज्या विस्कॉन्सिन राज्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात आपली मतं टाकली होती, त्याच विस्कॉन्सिनच्या मतदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी लिबरल-डेमॉक्रॅट न्यायाधीशाची निवड केली आहे.

विस्कॉन्सिनच्या या निवडणुकीकडं साऱ्या अमेरिकेचं लक्ष होतं. कारण त्या निवडणुकीतले एक उमेदवार न्या. ब्रॅड स्किमेल यांना थेट ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. एका ऑनलाइन कार्यक्रमात ट्रम्पनी भाषण करून ‘स्किमेलना निवडून द्या’ असं आवाहन केलं होतं. एवढंच नाही तर या निवडणुकीची सूत्रं ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या हाती सोपवली होती. डेमॉक्रॅटिक पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवार न्या. सूझन क्रॉफर्ड यांची निवडणूक घोषणा होती ‘मस्क वि. विस्कॉन्सिन’. न्या. क्रॉफर्ड स्वतःसाठी निवडणूक लढत नव्हत्या, त्या मस्क यांना हरविण्यासाठी निवडणूक लढत होत्या.

लोकांचा राग मस्कवर का आहे? कारण मस्क लोकांना विकत घेऊ पाहत होते. या निवडणुकीवर मस्क यांनी जवळपास दोन कोटी डॉलर खर्च केले. मस्क यांनीही त्यांच्या प्रचाराचं सूत्र ठेवलं होतं ‘डेमॉक्रॅट्सना हरवा!’ त्यांनी सरळसरळ योजनाच जाहीर केली होती. ‘डेमॉक्रॅटना हरवा’ या आवाहनावर लोकांनी सह्या कराव्यात, एक सही केली की  मस्क १०० डॉलर देणार. मस्कनी दोन माणसांना आपले प्रतिनिधी नेमले, त्यांच्यावर स्किमेल यांच्यासाठी मतं ‘आणण्या’ची जबाबदारी होती. या प्रत्येक प्रतिनिधीला १० लाख डॉलर दिले गेले. मस्कनी कार्यकर्ते नेमले. कार्यकर्त्यानं मतदाराचा स्किमेलच्या पोस्टरसह फोटो काढायचा. एक फोटो काढला तर मस्क २० डॉलर देणार, असं सरळ गणित होतं.

मॅडिसन या राजधानीच्या शहरापासून दूर असलेल्या एका खेड्यातल्या मतदान केंद्रावर त्या खेड्यातला शिक्षक मतदानाला आला. त्याचं नाव टायलर जेडिक. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, ‘मस्कनं फार पैसे खर्च केले. म्हणजे पैसे घ्या आणि मत द्या. ज्याच्याकडं जास्त पैसे त्याला मतं मिळणार. मला हे मान्य नाही!’ खुद्द मॅडिसनमध्ये थेरेसा हेलेनबर्ग मतदानाला गेली. तीही पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयासाठी मतदान करीत होती. ती म्हणाली, ‘टीव्ही आणि सोशल मीडियावर जाहिरातींचा नुसता पाऊस पडतोय. याला मत द्या, त्याला मत देऊ नका. मी काही मस्कच्या निवेदनावर सही केलेली नाही!’

विस्कॉन्सिन हे स्विंग स्टेट आहे. इथे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जाम चुरस असते. विस्कॉन्सिन ज्याला निवडतं, तो अध्यक्ष होतो, असा संकेतच आहे. २०२४ साली कमला हॅरिसपेक्षा पाव टक्का जास्त मतं ट्रम्पनी मिळवली, निवडून आले.  ‘स्किमेल हरले म्हणजे मस्क हरले, मस्क हरले म्हणजे ट्रम्प हरले’ असं लोक म्हणतात.

ट्रम्प यांनी निवडून आल्या आल्या परदेशातून आलेल्या स्थलांतरितांना पकडायला सुरुवात केली. मेक्सिकोतून येणारे लोक गुन्हेगार असतात, त्यांना हाकला हे ट्रम्प यांचं निवडणुकीतलं आश्वासन. या मोहिमेचा भाग म्हणून पोलिस विस्कॉन्सिनमध्ये पोहोचले. विस्कॉन्सिन अमेरिकेत सर्वांत जास्त दूध व्यवसाय करतं. दूध व्यवसायात फार माणसं लागतात. गोरे अमेरिकन श्रमाची कामं करायला तयार नसतात. मेक्सिको इत्यादी ठिकाणहून आलेली माणसं श्रमाची कामं करतात. त्यांच्यावर ट्रम्प यांचा दात. पोलिस मेक्सिकन कामगारांची सरसकट धरपकड करू लागले. गंमत म्हणजे दूध व्यवसायातले मालक गोरे रिपब्लिकन, ट्रम्प यांचे पाठीराखे. आपल्या धंद्यावर टाच आणणारं ट्रम्प प्रेम त्यांना कसं परवडणार? - ते गेले विरोधात! 

आणखी एक खोच आहे. मस्क यांच्या टेस्ला कारचं एक प्रकरण विस्कॉन्सिनच्या कोर्टात आहे. विस्कॉन्सिनच्या कायद्यानुसार त्या राज्यातल्या ग्राहकांना मस्क यांना थेट कार विकता येत नाही. दुकानदारांतर्फेच विकावी लागते. मस्क यांना व्यवसायातले ‘मध्यस्थ’ नको आहेत. स्किमेल निवडून आले असते तर तिथल्या न्यायालयात रिपब्लिकनांचं बहुमत झालं असतं आणि विस्कॉन्सिनमधला कायदा मस्कच्या बाजूनं वळला असता... ते आता होणार नाही. मिस्टर इलॉन मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात!- असं विस्कॉन्सिनच्या मतदारांनी बजावलंय. या निवडणुकीचा निकाल अमेरिकेत वारं फिरत असल्याचा निदर्शक आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
  (damlenilkanth@gmail.com)

Web Title: Mr. Elon Musk, money cannot buy people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.