‘अय्याशी’साठी आपलीच मुलं विकणारी माता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 08:04 IST2025-07-29T08:03:53+5:302025-07-29T08:04:19+5:30
आपले ‘छंद’ पूर्ण करण्यासाठी तिनं त्याला चक्क विकून टाकलं.

‘अय्याशी’साठी आपलीच मुलं विकणारी माता!
कोणाला कसला शौक असतो तर कोणाला कसला. आपले हे शौक पूर्ण करण्यासाठी मग ते कुठल्याही थराला जातात. चीनच्या गुआंग्झी प्रांतातील हुआंग या २६ वर्षीय तरुणीलाही असेच अनेक शोैक होते. छोनछोकीत राहायला, नवनवीन, भारीतले ब्रँडेड कपडे घालायला, नवीन वस्तू घ्यायला, बाहेर फिरायला, हॉटेलिंग करायला, ऑनलाइन स्ट्रिमिंग करायला तिला फार आवडायचं.
पण त्यासाठी पैसे आणायचे कुठून? मग तिला एक ‘आयडिया’ सुचली. अर्थातच ती कल्पना मानवतेला काळिमा फासणारी होती. आपले शौक पूर्ण करण्यासाठी तिनं बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे तिनं बाळाला जन्मही दिला. तिला मुलगा झाला होता! कसंबसं काही दिवस तिनं त्याला सांभाळलं. पण मग पुढे काय करावं? आपले ‘छंद’ पूर्ण करण्यासाठी तिनं त्याला चक्क विकून टाकलं.
हुआंगची ली नावाची एक तरुण नातेवाईक होती. तिला मूलबाळ नव्हतं. आपल्याला मूल व्हावं यासाठी ती हरतऱ्हेनं उपाय करीत होती. अनेक डॉक्टरांकडे खेटा मारून झाल्या होत्या, अनेक आधुनिक उपचार करून झाले होते. जो कोणी जे काही सांगेल त्याचा सल्ला प्रमाण मानून तेही करून झालं होतं, अगदी बुवा-बाबांकडेही ती जाऊन आली होती, पण तिला मूल काही होत नव्हतं.
ही ‘संधी’ साधून हुआंगनं ऑक्टोबर २०२०मध्ये आपली नातेवाइक ली हिला आपल्या मुलाला ४५ हजार युआनला (सुमारे पाच लाख रुपये) विकून टाकलं. असंही आर्थिक अडचणींमुळे तिला या मुलाला सांभाळणं कठीण झालं होतं. शिवाय या मुलाचा बाप कोण हेही तिला ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्याला विकून टाकणं हेच तिला श्रेयस्कर वाटलं. मिळालेल्या पैशांवर तिनं पुन्हा ऐश सुरू केली. वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी ती करायला लागली. ऑनलाइन स्ट्रिमिंगही तिनं पुन्हा सुरू केलं. सुरुवातीला तिनं या पैशांवर बरीच मजा केली. पण हा पैसा तरी किती दिवस पुरणार? हळूहळू तो संपायला लागला. तिच्या ऐशोआरामावर मर्यादा यायला लागल्या. नंतर तर तिच्याजवळचा सगळाच पैसा जवळपास संपला..
आता काय करायचं? तिच्या डोक्यात पुन्हा तीच आयडिया आली. ती पुन्हा एकदा गर्भवती राहिली. यावेळीही तिला मुलगाच झाला! चीनमध्ये असंही ‘वंशाचा दिवा’ चालविण्यासाठी मुलांना मोठी मागणी असते. त्यांचं महत्त्व अपार. पैशांची तंगी असल्यामुळे हुआंगनं याही मुलाला विकून टाकलं. यासाठी यावेळी तिनं एक एजंट पकडला. ‘मिळेल ती’ रक्कम, यावेळी फक्त ३८ हजार युआन (सुमारे साडेचार लाख रुपये) घेऊन तिनं मुलगा त्या एजंटला विकून टाकला. एजंटनं हा मुलगा पुढे एक लाख तीन हजार युआनला (सुमारे बारा लाख रुपये) विकला. यावेळीही हा सगळा पैसा हुआंगनं ऐश करण्यात उडवला.
मुलाची विक्री झाल्याची खबर पोलिसांना लागली. त्यांनी हुआंगला अटक केल्यावर तिनं याआधीही आपल्या एका मुलाला विकलं असल्याचं त्यांना कळलं. ही केस न्यायालयात गेली. न्यायालयानंही हुआंगला दोषी ठरवलं, तिच्या कृत्यावर त्यांनी गंभीर ताशेरे ओढले. न्यायाधीशांनी तिला पाच वर्षं दोन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीस हजार युआनची (सुमारे तीन लाख रुपये) शिक्षा सुनावली. हुआंगकडून ज्यांनी मुलं विकत घेतली होती, त्यांनाही न्यायालयानं तुरुंगात पाठवलं.