सर्रास वापरले जाणारे चुकीचे शब्द आणि उच्चार

By admin | Published: February 26, 2015 11:35 PM2015-02-26T23:35:54+5:302015-02-26T23:35:54+5:30

साधारणत: ७०-८० वर्षांपूर्वीच्या मराठीत मरण पावलेल्या व्यक्तीचा उल्लेख मयत किंवा मृतक असा असावयाचा आणि तो शब्दार्थाने योग्यच होता.

The most common words and dialects used | सर्रास वापरले जाणारे चुकीचे शब्द आणि उच्चार

सर्रास वापरले जाणारे चुकीचे शब्द आणि उच्चार

Next

दिलीप श्रीधर भट - 
साधारणत: ७०-८० वर्षांपूर्वीच्या मराठीत मरण पावलेल्या व्यक्तीचा उल्लेख मयत किंवा मृतक असा असावयाचा आणि तो शब्दार्थाने योग्यच होता. पण काही विद्वानांना हा शब्द ग्राम्य वाटला, म्हणून कैलासवासी, स्वर्गवासी सारखे शब्द त्यांनी वापरणे सुरू केले व ते रूढ झाले. स्वर्गीयचा अर्थ स्वर्गासमान, स्वर्गासारखा आहे. जसे आपण म्हणतो स्वर्गीय आनंद, स्वर्गीय सुख, स्वर्गीय सौंदर्य, स्वर्गीय संगीत इत्यादी.
मुस्लीम व्यक्ती मरण पावल्यावर त्यास पैगंबरवासी व ख्रिश्चन व्यक्ती मरण पावल्यावर ख्रिस्तवासी हा शब्दप्रयोग आपण करतो तोही अयोग्य आहे. कारण त्यांच्या धार्मिक धारणेनुसार त्यांची शवं दफन केली जातात व निवाड्याच्या दिवशी त्यांचे पुनरुत्थान होऊन त्यांच्या पाप-पुण्याप्रमाणे त्यांना स्वर्ग, नरक प्राप्त होणार असतो. त्यामुळे मुस्लीम, मरहूम व ख्रिश्चन लेट हा शब्द मृताच्या आधी लावतात. सर्वच मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाआधी ‘दिवंगत’ हा शब्द लावणे योग्य ठरते. संसदीय शब्दही ‘दिवंगत’ हाच आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर भागाला पश्चिम महाराष्ट्र असे लिहिले, बोलले जाते. पश्चिम महाराष्ट्र हा रूढ शब्द अयोग्य आहे. तो दक्षिण महाराष्ट्र हवा. कारण तो विभाग उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यांच्या खाली आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकण (ठाणे जिल्हा ते सिंधुदुर्ग जिल्हा) आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भ.
हॉर्स ट्रेडिंगचे रूपांतर घोडे बाजार असे झाले आहे. ते अयोग्य आहे. घोडे, उंट, हत्ती यांचे मेळे भरतात. पण बैल बाजार भारतातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात वर्षभर भरत असतात. लाखो बैलजोड्यांची खरेदी-विक्र ी करोडो रुपयात होते. म्हणून घोडे बाजार ऐवजी ‘बैल बाजार’ हे हॉर्स ट्रेडिंगचे रूपांतर योग्य ठरते.
आजही बॉम्बे हायकोर्ट हे इंग्रजी नाव कायम आहे. ते मुंबई उच्च न्यायालय झाले पाहिजे, कारण मुंबई उच्च न्यायालय-नागपूर खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ असे नामकरण झाले आहे. पण महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय असे होऊ शकत नाही. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत गोवा हे राज्य पण येते. आता सर्वोच्च न्यायालयानेच बॉम्बेचे मुंबई, कलकत्ताचे कोलकाता, मद्रासचे चेन्नई अशी नामांतरास मान्यता दिली आहे.
अनेक महत्त्वाच्या सरकारी सूचना हिंदीतूनच दिल्या जातात, असे का? हे केवळ महाराष्ट्रातच होते. तामिळनाडू, केरळ, प. बंगालमध्ये होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार शब्दकोशातील मंत्री, सचिव, सभासद, सेनापती, पंतप्रधान इत्यादी अनेक शब्द आजही व्यवहारात आहेत.
अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्य इत्यादींना शासकीय शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती-छात्रवृत्ती हा शब्द अयोग्य आहे. विशिष्ट जाती-जमातीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण नियमित घ्यावे यासाठी त्यांना उत्तेजनार्थ विद्यावेतन देण्यात येते, म्हणून विद्यावेतन हा शब्द योग्य ठरतो.
लोकशाही हा शब्द जरी मराठीत रूळला असला तरी तो योग्य नाही. कारण त्यात जो शाही शब्द आहे तो राजेशाही, बादशाही, या संबंधित आहे. म्हणून लोकतंत्र हा शब्द योग्य ठरतो. स्वातंत्र्य सेनानी ही उपाधी अनेक व्यक्तींच्या आधी लावण्यात येते. हे योग्य नाही. कारण सेनानी म्हणजे सेनापती. सेनापती एकच असतो आणि सैनिक अनेक असतात. म्हणून स्वातंत्र्य सैनिक हा योग्य शब्द वापरणे आवश्यक आहे.
हिंदू हा शब्द सिंधुपासून तयार झाला अशी एक धारणा आहे. त्याचे स्पष्टीकरण व पुष्टीकरण असे करण्यात येते की, अरबी लिपीत ‘स’ हे अक्षरच नाही. पण ते चुकीचे आहे. कारण सलाम, सलमान, सुलेमान, सुलतान असे अनेक शब्द ‘स’पासून सुरू होणारे शब्द अरबीत आहेत. ‘हिंदू’च्या मूळ अरबी शब्दाचा अर्थ काळ्या तोंडाचा चोर, दरोडेखोर, असा आहे. हिंदू हा शब्द कोणत्याही वेदात, पुराणात, महाभारतात, रामायणात नाही म्हणून आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म हे शब्द योग्य आहेत व ठरतात.
महाराष्ट्रा असा उच्चार न करता आपण महाराष्ट्र असा करतो. आंध्राचे आंध्रच करतो. पण स्पेलिंग प्रमाणे तामिलनाडू, तिलकरत्ने, जयवर्धने, इत्यादीचे उच्चार करतो पण मूळ उच्चार हा तमिळनाड, जयवर्धन, तिलकरत्न असा आहे. गुप्ता, मिश्रा या आडनावांचे स्पेलिंगनुसार उच्चार पण मूळ गुप्त, मिश्र आहे.
सहस्रचंद्रदर्शन सोहळा अनेकांचा साजरा होतो. पण दर महिन्यात अमावास्या सोडल्यास २८-२९ दिवस चंद्र आकाशात दिसतो. त्याचे दर्शन घेणे असा अर्थ नसून शुक्ल प्रतिपदेच्या चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा साजरा केला जातो. व्यवहारात शिशुपण, बालपण, आजारपण, प्रवास इत्यादी कारणांमुळे कोणीच शुक्ल प्रतिपदा/द्वितीयेच्या चंद्राचे सहस्र दर्शन घेतलेले नसते.
संगीत क्षेत्रात विशेष स्थान असणाऱ्या गायिकेस संगीत विदुषी ही उपाधी लावतात, जी योग्य आहे. पण पुरुष गायकाला पंडित ही उपाधी लावणे अयोग्य आहे. पंडित म्हणजे ब्राह्मण व अनेक विख्यात संगीत कलाकार ब्राह्मण नसतात. म्हणून पुरुष संगीत कलाकारांना ‘संगीत विद्वान’ ही उपाधी लावणे योग्य जंजीरा नावाचा किल्ला प्रसिद्धच आहे. हा किल्ला एका बेटावर आहे. अरबीमध्ये जजीरा चा अर्थ बेट आहे. म्हणून जजीरा (बेट) हे मूळ नाव योग्य ठरते. जजीराचे मराठीकरण करताना ज वरती नजरचुकीने अनुस्वार दिल्याने जंजीरा असा शब्द तयार झाला असे दिसते.
कोकण-दक्षिण महाराष्ट्र इत्यादी विभागात ‘भातशेती’ हा चुकीचा शब्द प्रयोग रूढ झाला आहे. पोळीची शेती, भाकरीची शेती असा शब्दप्रयोग प्रचारात नाही. तांदूळ शिजविल्यावर ‘भात’ तयार होतो व तांदूळ धानाची मळणी केल्यावर मिळतो. पूर्व विदर्भात धानाची शेती होते. म्हणून ‘धानाची शेती’ हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात वापरात येणे आवश्यक आहे.
मनमुराद, मनपसंद, जिल्हाधिकारी इत्यादी शब्द संस्कृत व फारसीचे जोड शब्द आहेत व ते आता मराठीच झाले आहेत. ते बदलण्याची आवश्यकता नाही. पण ज्या शब्दांचा अर्थ विपरीत होतो त्यासाठी योग्य शब्द वापरले गेले पाहिजेत व त्यासाठी सर्व मराठी भाषक सतत प्रयत्न करतील असा विश्वास आहे.

Web Title: The most common words and dialects used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.