Monuments should be socialized! | महापुरुषांच्या स्मारकांतूनही व्हावे समाजकारण!
महापुरुषांच्या स्मारकांतूनही व्हावे समाजकारण!

- डॉ. रविनंद नामदेव होवाळ
(राज्यशास्त्राचे प्राध्यापक)

मुंबईच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवून ती ३५0 फूट करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा आंबेडकरानुयायी समाजाला व जगभरातील लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना
सुखावणारी आहे. शंभर फुटांच्या चौथऱ्यासह हा पुतळा आता ४५० फूट उंचीचा होईल. याचवेळी निधी नसल्याने वाडिया रुग्णालय बंद करण्याच्या मुद्द्यावरील सुनावणीवेळी स्मारकांची उंची वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत; पण गोरगरिबांच्या उपचारासाठी पैसे नाहीत, अशा आशयाची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली.
राज्यातील विकासकामे आणि उपलब्ध निधीची कमतरता पाहता कोणत्या गोष्टींवर किती खर्च करावा, यावर मतमतांतरे स्वाभाविक आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या टिप्पणीनंतर आंबेडकरी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी या वादात अनपेक्षित तरीही कौतुकास्पद सूचना केली. इंदू मिल स्मारकातील पुतळ्याचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वळवावा, असे म्हणणे त्यांनी मांडले.
डॉ. आंबेडकरांचे स्मारक हा काहींसाठी राजकारणाचा भाग असला, तरी कोट्यवधी जनतेसाठी तो तसा विषय नाही. तो केवळ त्यांच्या आस्थेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. आस्थेसाठी शासकीय तिजोरीतून आपण किती खर्च करावा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आपण किती खर्च करावा, याबाबत काही निश्चित तत्त्वे आपण अजून तरी तयार अथवा मान्य केलेली नाहीत, असे आजवरच्या अनुभवांवरून दिसते. कुंभमेळ्याचे उदाहरण लक्षात घेतले, तरी याबाबतचे चित्र सुस्पष्ट होईल. उपलब्ध माहितीनुसार, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने २०१५ मध्ये २,३४० कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. जानेवारी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी तेथील राज्य सरकारने तब्बल ४२०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या आयोजनातून तेथील सरकारला केवळ एक कोटीचा महसूल मिळणार असल्याचा अंदाज त्या वेळी व्यक्त करण्यात आलेला होता.
आस्थेवरील खर्च पाहता दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टींसाठीही सढळ हस्ते खर्च करायला हवा, असे वाटते; परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. मागील वर्षी आॅगस्टमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात महापुरामुळे हजारो लोक विस्थापित झाले. त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १५४ कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यावर त्या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळ्यासाठी अडीच हजार कोटी आणि पूरग्रस्तांसाठी केवळ १५४ कोटी असे कसे, असा प्रश्न त्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता.
डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या अनुषंगाने चर्चा करताना दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. एक, ज्या इंडिया युनायटेड मिलला आपण इंदू मिल म्हणून ओळखतो, त्या मिलचे सध्या लोकप्रिय झालेले इंदू हे नाव स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे होते. बाबासाहेबांच्या पाच अपत्यांपैकी यशवंतराव तथा भैयासाहेब हे एकटेच जगले, तर बाबासाहेबांची उर्वरित चार अपत्ये बालपणीच मृत्युमुखी पडली होती. या चार अपत्यांमध्ये एक मुलगी होती व तिचे नाव इंदू होते. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक इंदू या नावाने ओळखल्या जाणाºया मिलच्या परिसरात व्हावे, हा ऐतिहासिक योगायोग आहे. दोन, आपल्याकरिता ज्यांनी उभे आयुष्य वेचले आहे, अशा लोकांची स्मारके उभारणे हे उचित कार्य असून, अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या कीर्तीस व लौकिकास साजेशी ठरतील, अशाच प्रकारे आपण ती उभारली पाहिजेत, असे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
सर फिरोजशहा मेहता यांच्या मुंबईतील स्मारकाच्या अनुषंगाने डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून मुंबईच्या ‘क्रॉनिकल’च्या संपादकांना जे पत्र पाठवले होते, त्यात त्यांची ही भूमिका स्पष्ट झाली आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या भारतासारख्या देशात पुनर्निर्माणाची प्रचंड जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाºया, आपल्या अथक प्रयत्न व त्यागामुळे आपल्याला त्यांचे कायमचे ऋणी करून ठेवणाºया व आपल्या अनेक समस्या स्वत:च्या अंगावर घेऊन त्यातील किमान काही समस्या तरी सोडवून दाखविणाºया कर्तृत्ववान व्यक्तींचे स्मारक उभारणे हे अत्यंत उचित असे काम आहे, असे डॉ. आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे. त्यांची ही सर्व विधाने आज स्वत: डॉ. आंबेडकरांनाच लागू होत आहेत. फिरोजशहा मेहता यांचे मुंबईतील स्मारक सार्वजनिक ग्रंथालयाच्या स्वरूपात उभे करावे, असे मत डॉ. आंबेडकरांनी मांडले होते. समाजाच्या विकासासाठी ग्रंथालय हे अत्यंत उपयुक्त असे साधन ठरते, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या पत्राला आता १०४ वर्षे उलटली असली, तरी कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मारकांसंदर्भात त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही अत्यंत उपयुक्त आहेत. एकेकाळी समाजोद्धारासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंड-अमेरिकेत जाऊन तेथील ग्रंथालयांचा आधार घ्यावा लागला होता. यापुढील काळात देशाच्या कानाकोपºयातून मुंबईला येऊन भावी पिढ्यांतील अनेक आंबेडकर देशोद्धारासाठी स्वत:ला तयार करतील, अशा प्रकारची काही रचना इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकातून उदयाला यावी, एवढीच माफक अपेक्षा आपण बाळगली पाहिजे.
 

Web Title:  Monuments should be socialized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.