गुजरातच्या भूमीतच मोदी आणि शहांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:22 AM2017-11-04T03:22:06+5:302017-11-04T03:22:23+5:30

गुजरातवर पंतप्रधान मोदींनी २२ वर्षे अधिराज्य गाजवले. देशात अन् परदेशात गुजरात मॉडेलचा डंका २०१४ पासून सातत्याने वाजवला गेला. काँग्रेसमुक्त भारताची घोषणाही गुजरातमधेच जन्मली. त्याच गुजरातच्या धरतीवर विकास हा शब्द आता विनोदाचा विषय ठरला आहे.

Modi's turban in Gujarat's land | गुजरातच्या भूमीतच मोदी आणि शहांची दमछाक

गुजरातच्या भूमीतच मोदी आणि शहांची दमछाक

Next

- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)

गुजरातवर पंतप्रधान मोदींनी २२ वर्षे अधिराज्य गाजवले. देशात अन् परदेशात गुजरात मॉडेलचा डंका २०१४ पासून सातत्याने वाजवला गेला. काँग्रेसमुक्त भारताची घोषणाही गुजरातमधेच जन्मली. त्याच गुजरातच्या धरतीवर विकास हा शब्द आता विनोदाचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह दोघांची भाषा बदलली आहे. गुजरातमध्येच दोघेही विकासाच्या मॉडेलचा उल्लेख करायलाही आता घाबरतात. आपल्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींच्या सभांना अलोट गर्दी उसळते आहे, याचा अंदाज येताच मोदींचे गुजरात दौरे वाढले. २५०० कोटींच्या घोषणांच्या खैरातीसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा लांबवली गेली. राहुल गांधींच्या भाषणांना प्रत्युत्तर देण्यासाठी दोन डझन केंद्रीय मंत्री तैनात करण्यात आले. विविध जाती जमातींचा पाठिंबा मिळवण्यासाठी पैशांच्या भरपूर राशी ओतल्या जाऊ लागल्या, तरी यंदाची लढाई सोपी नाही याची जाणीव एव्हाना सर्वांनाच झाली आहे.
लोकसभेच्या दिग्विजयानंतर दिल्ली, बिहार आणि पंजाबचा अपवाद वगळला तर निवडणुकांच्या विजयासाठी मोदी आणि शहांची जोडी म्हणजे भाजपचे चलनी नाणे बनले होते. गेल्या तीन वर्षांत सीमेवरचे सर्जिकल स्ट्राईक्स असोत की नाट्यपूर्णरीतीने सादर केलेली नोटाबंदी त्याचे सारे श्रेय एकट्या पंतप्रधानांच्या पदरात घातले गेले. जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांपासून राज्यांच्या विधानसभांपर्यंत भाजपचा प्रत्येक विजय पंतप्रधानांना समर्पित केला गेला. ‘अति झाले आणि हसू आले’ या उक्तीनुसार कर्कश प्रचाराच्या या अतिरेकाची कधीतरी खिल्ली उडणारच होती. ‘विकास वेडा झालाय’ सारखी मजेदार घोषणा जेव्हा गुजरातच्या मोदी लँडमधेच दुमदुमू लागली तेव्हा ‘गुजरातचा विकास आमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. विकासविरोधी लोकांना केंद्राकडून एक पैसादेखील मिळू देणार नाही’अशा दर्पोक्तीचा संचार मोदींच्या शब्दांमध्ये झाला. जनतेच्या करातून गोळा झालेल्या सरकारच्या तिजोरीचे आपण एकटे मालक नाही, याचे भानही राहिले नाही. भाषणांचा तोल सुटल्याचेच हे लक्षण होते. ‘एक देश एक कर’ अशी आकर्षक घोषणा देत, ऐतिहासिक जीएसटीचे संसदेत मध्यरात्री घंटानादाने स्वागत करण्यात आले. त्याचे सारे श्रेयही आपल्याकडे ओढण्याचा घाट मोदी सरकारने घातला होता. तथापि पुरेशी पूर्वतयारी नाही आणि घिसाडघाईने केलेली अंमलबजावणी यामुळे या लक्षवेधी करसुधारणेचा अक्षरश: बाजा वाजला. देशभरातील समस्त व्यापारी आणि उद्योजक सरकारच्या विरोधात खवळून उठले. हा जनक्षोभ पहाताच मोदींची भाषा पुन्हा बदलली. ‘जीएसटी करसुधारणा हा केवळ भाजपचा आविष्कार नाही तर काँग्रेस सरकारच्या काळातच त्याचा प्रारंभ झाला आहे, असा बचावात्मक सूर मोदींच्या भाषणातून ऐकू येऊ लागला. आपल्या लाडक्या गुजरातमधे शिरण्याआधी जीएसटीच्या तरतुदींमधे अनेक बदल करण्याचे संकट पंतप्रधानांवर ओढवले. सलग २२ वर्षे ज्या गुजरातमध्ये मोदींनी अधिराज्य गाजवले तिथे विकास रोखण्याचा आरोप जेव्हा मोदी आणि शहा काँग्रेसवर करू लागले तेव्हा कोट्यवधी गुजराती जनतेला त्यावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले. परिणामी राहुलच्या सभा आणि रोड शो ची गर्दी वाढत गेली. मोदी आणि शहांच्या सभांमधे रिकाम्या खुर्च्या त्यांचे स्वागत करू लागल्या. सत्तेचा अहंकार कधीही साथ देत नाही याचा हा पुरावाच नाही काय? लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकता येत नाही, याची जाणीव झाली की मोदी आणि शहांचे राजकारण कोणत्या स्तरावर उतरते, त्याचा साक्षात्कार बिहार, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्वांनी पाहिला आहे. देशात जो कोणी विरोधकाला साथ देईल, त्याच्या घरीदारी आणि व्यवसायावर लगेच आयकराच्या धाडी पडतात.
गुजरातमध्ये एका हॉटेलच्या खोलीत हार्दिक पटेल व अशोक गहलोत यांची भेट टिपण्यासाठी गुप्त कॅमेरे लावले गेले. वृत्तवाहिन्यांनी ते संदिग्ध दृश्य दिवसभर छोट्या पडद्यावर दाखवले. भाजपच्या तंबूत या एका घटनेने अक्षरश: घबराट पसरल्याचा संदेश मात्र राज्यभर पोहोचला. गुजरातच्या भूमीत राहुल गांधींना अचानक प्रचंड प्रतिसाद का मिळतो आहे? रा.स्व.संघाची कामगार शाखा भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचला अशी जाणीव याचवेळी का व्हावी, की यानंतर गप्प बसणे योग्य ठरणार नाही? मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी संघाच्या या दोन्ही संघटनांनी दिल्लीत कंबर का कसली? या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये आपली सत्ता आणि अब्रू वाचवण्यासाठी मोदी आणि शहांनी जमेल त्या सर्व तंत्रांचा राजरोस वापर सुरू केला आहे.
गुजरात मॉडेलला गुजरातेतच मात मिळत असल्याने विकासाची भाषा इथे मागे पडली आहे. नोटाबंदी, जीएसटीचे गुणगान, सर्जिकल स्ट्राइक्ससारखे निर्णय भाजपवर उलटले आहे. मोदींच्या तथाकथित लोकप्रियतेची आणि अमित शहांच्या चाणक्यनीतीची गुजरातच्या होम पीचवरच पुरती दमछाक झाली आहे. तरीही गुजरातची सत्ता भाजपच्या हाती कायम राहणार आहे, असे भाकीत मोदी धार्जिण्या वृत्तवाहिन्या सर्वेक्षणाद्वारे ठसवण्याचा अट्टाहास करीत आहेत. न जाणो इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही मतदान यंत्रे भाजपच्या विजयाची जादू बहुदा घडवतीलही. तथापि मोदींचा गुजरातमध्ये सतत २२ वर्षे चढत राहिलेला आलेख बºयापैकी खाली आला आहे. सारा देश हे चित्र रोज पहातो आहे. गुजरातचे घोडामैदानही तसे जवळच आहे.

Web Title: Modi's turban in Gujarat's land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा