शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

मोदी यांची ‘कसोटी’!

By admin | Updated: August 16, 2015 21:56 IST

भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तिकडे श्रीलंकेत विराट कोहली कप्तान असलेली भारतीय ‘टीम’ हरत होती आणि इकडे लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १२५

भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तिकडे श्रीलंकेत विराट कोहली कप्तान असलेली भारतीय ‘टीम’ हरत होती आणि इकडे लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १२५ कोटींच्या ‘टीम’ला आवाहन करीत होते. क्रिकेटच्या जगतात ‘टी-२०’चा जमाना आल्यापासून ‘अफाट’ खेळून ‘झटपट’ विजय हस्तगत करण्याला प्राधान्य दिले जात आले आहे. उलट केवळ कसोटी सामने खेळले जात असताना सातत्य व संयम राखून अखेर विजय पदरात पाडून घेण्याला महत्त्व दिले जाई.. ‘कसोटी’ ते ‘टी-२०’ ही भारतीय क्रिकेटची जी वाटचाल आहे, त्यामुळे खेळाडूंच्या प्रवृत्तीत जो फरक पडला, तोच आपल्या समाजाच्या प्रकृतीत पडत गेला आहे. भारतीय समाजाची ही प्रवृत्ती व प्रकृती लक्षात घेऊनच नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ‘थिम’ ही ‘अब की बार मोदी सरकार’ आल्यावर ‘झटपट’ बदल होईल, हीच ठेवली होती. ही ‘थिम’ मतदारांना भावली व भाजपाच्या हाती स्वबळावर सत्ता आली. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच लालकिल्ल्यावरून भाषण करताना मोदी यांनी याच ‘टी-२०’ पद्धतीने घोषणांची आतषबाजी केली आणि स्वत:ला ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेतले. पण गेल्या वर्षभरात ‘झटपट’ असे काही जनतेच्या हाती न लागल्याने जी एक नाराजीची भावना समाजाच्या सर्व थरांतून व्यक्त होऊ लागली आहे, त्याला प्रतिसाद म्हणून मोदी आता ‘टी-२०’ कडून ‘कसोटी’च्या पद्धतीकडे वळू पाहत आहेत. म्हणूनच ‘१२५ कोटींच्या टीम’ला लालकिल्ल्यावरून त्यांनी आवाहन केले. गेल्या एक वर्षात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण केंद्रात झालेले नाही, हे ठासून सांगतानाच, भ्रष्टाचार हा वाळवीसारखा आहे आणि वाळवी निपटून काढताना कसे इंच इंच जमीन व भिंती यांच्यावर औषध टाकावे लागते, तसेच भ्रष्टाचार निपटतानाही करावे लागेल, असे मोदी यांनी सुचवले. केंद्रात भ्रष्टाचार झालेला नाही, हे निक्षून सांगतानाच, जेव्हा मोदी हे वाळवीचे उदाहरण देतात, तेव्हा राज्यांत - उदाहरणार्थ व्यापमं प्रकरण - भ्रष्टाचार अजून आहे व तो निपटून काढता आलेला नाही, याची ते अप्रत्यक्ष कबुली देत असतात. त्याचवेळी सुषमा स्वराज यांची कृती हा भ्रष्टाचार नव्हे, हेही ते कॉँग्रेससह इतर विरोधकांना बजावू पाहत असतात. शिवाय कायम एखाद्या रोगिष्ट माणसाप्रमाणे नैराश्यात बुडून आजाराचाच विचार करीत बसू नका, असे सांगून हे भ्रष्टाचाराचे प्रकरण मिटण्यास वेळ लागणार आहे, असेही मोदी सुचवू पाहत आहेत. थोडक्यात मोदी आता ‘टी-२०’कडून ‘कसोटी’कडे कार्यपद्धती नेऊ पाहत आहेत; कारण देश चालवताना ‘झटपट’ निर्णय घेता येत नाहीत, याची जाणीव त्यांना आता झाली आहे. मात्र ‘टी-२०’ ते ‘कसोटी’ हा प्रवास खरोखरच किती ‘कसोटी’ पाहणारा आहे, याची प्रचिती स्वातंत्र्यदिनाच्या आधी एकच दिवस सैन्यदलांंसंबंधातील ‘एक पद, एक निवृत्तिवेतन’ या मुद्द्यावरून दिल्लीत जे रण माजलेले पाहायला मिळाले, त्याने ‘मोदी सरकार’ला आणून दिली आहे. हरयाणातील रेवाडी येथे भाजपाने निवृत्त सैनिक व अधिकाऱ्यांचा प्रचंड मेळावा निवडणूक प्रचाराच्या काळात घेतला होता. ‘आमचे सरकार आल्यावर ही योजना लागू करण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही’, अशी ग्वाही या सभेत मोदी यांनी दिली होती. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही आणि निदान स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना मोदी यासंबंधी घोषणा करतील, अशी निवृत्त सैनिकांची अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे. ‘आम्ही आश्वासन दिले आहे, ते पाळू, विश्वास ठेवा’, इतकेच मोदी सांगू शकले आहेत. मात्र स्वातंत्र्यदिन आहे, म्हणून दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने करणाऱ्या निवृत्त सैनिक व अधिकारी यांना हटविण्यासाठी पोलिसांनी जी हडेलहप्पी केली, त्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर झळकल्याने देशभर संतापाची लाट उसळली. ती थोपविण्यासाठी या झालेल्या प्रकाराबद्दल स्वत: जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करून मोदी यांनी या ‘एक पद, एक निवृत्तिवेतन’ या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली असती, तर त्याचा परिणाम चांगला झाला असता. मात्र तसेही मोदी यांनी काही केले नाही. याचे कारण ‘किमान सरकार, कमाल राज्यकारभार’ ही घोषणा देणे जितके सोपे आहे, तितकेच ते अंमलात आणणे महाकठीण आहे आणि नोकरशाही व पोलीस प्रशासन यांची राज्यकारभारावर पकड असल्याने, ही घोषणा अंमलात आणताना त्यांना दुखावून चालत नाही, याची प्रखर जाणीव गेल्या वर्षभरात मोदी यांना झालेली आहे. मोदी यांचीही मूळ प्रवृत्ती ‘टी-२०’चीच आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या काळात ‘धडाका’ दाखवू शकले. पहिल्या वर्षभरात ‘चमकदार’ घोषणाही करू शकले. पण राज्यकारभार ‘कसोटी’च्या प्रवृत्तीने करायचा असतो, तरच तो परिणामकारक होत असतो, हे लक्षात आल्यावर, आता जनतेच्या अपेक्षांना लगाम घालणे त्यांना भाग पडत आहे. म्हणूनच यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मोदी यांच्या भाषणाची ‘थिम’ गेल्या वेळेपेक्षा वेगळी व ‘कसोटी’ प्रवृत्तीवर भर देणारी होती. विराट कोहली पुढे आला, तो ‘टी-२०’च्या प्रवृत्तीमुळे. पण श्रीलंकेत कसोटी खेळताना त्याच्या ‘टीम’ला पहिल्या डावातील चमकदार कामगिरी टिकवता आली नाही. ही ‘कसोटी’ मोदी पार पाडतील, अशी आशा करूया; कारण त्यावरच देश कोठे जाणार, हे अवलंबून आहे.