मोदींची दुहेरी अडचण

By Admin | Updated: December 15, 2014 00:27 IST2014-12-15T00:27:13+5:302014-12-15T00:27:13+5:30

लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने हताश झालेला काँग्रेस पक्ष आता हळूहळू आक्रमक होऊ लागला आहे.

Modi's double problem | मोदींची दुहेरी अडचण

मोदींची दुहेरी अडचण

लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने हताश झालेला काँग्रेस पक्ष आता हळूहळू आक्रमक होऊ लागला आहे. मोदींच्या सरकारला ‘यू टर्न’ सरकार म्हणणारी पुस्तिका नुकतीच काँग्रेस पक्षाने प्रकाशित केली, तीत सरकारला निरुत्तर करणारे अनेक आरोप आहेत. निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींनी जनतेला जी आश्वासने दिली ती या काळात त्याला पूर्ण तर करता आलीच नाहीत उलट त्या आश्वासनांना हरताळ फासणारीच कृती या सरकारने केली असल्याचे या पुस्तिकेत म्हटले आहे. ‘सत्तेवर आल्यापासून शंभर दिवसांच्या आत विदेशी बँकांत दडविलेला स्वदेशी लोकांचा काळा पैसा आम्ही परत आणू’ हे मोदींनी जनतेला दिलेले महत्त्वाचे आश्वासन होते. आलेला पैसा नागरिकांच्या खात्यात जमा केला जाईल व त्यातून प्रत्येकाच्या वाट्याला किमान ३ लक्ष रुपये येतील असेही ते म्हणाले होते. शंभर दिवस उलटून गेले आणि त्या पैशाचा साधा शोधही मोदींच्या सरकारला लावता आला नाही. ‘१९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धात भारताला जो पराभव पत्करावा लागला त्याला काँग्रेसच कारणीभूत असल्याचा व तसे सांगणारा अहवाल हेंडरसन ब्रूक्स याने दिला असल्याचा’ आरोपही मोदींनी लावला होता. सत्तेवर येताच हा अहवाल जनतेसमोर आणू असे ते म्हणाले होते. सरकारला त्याही आश्वासनाचा आता विसर पडला आहे. विरोधी पक्षात असताना भाजपाने आयुर्विमा विधेयकाला कडवा विरोध केला होता. हे विधेयक मंजूर झाले तरी सत्तेवर आल्यानंतर आम्ही ते रद्द करू असेही ते म्हणाले होते. आता या विधेयकाची त्यांनाच जास्तीची गरज असल्याचे जाणवू लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक आम्ही मंजूर करू अशी टोकाची व स्व- विरोधाची भूमिका मोदींनी घेतली आहे. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचे व राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याचे आश्वासनही मोदींनी दिले होते. याबाबत गुजरात सरकारसह केंद्राला कोणतेही आश्वासक पाऊल आजवर टाकता आले नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातच गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेले २१ मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्षही अशाच आरोपांसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. काँग्रेसने प्रकाशित केलेल्या या आरोप पुस्तिकेत मोदींनी घेतलेल्या अशा ३६ उलट वळणांची (यू टर्न) यादी दिली आहे. विरोधी बाकावर असताना बेछूट आरोप करणे सोपे असते. सत्तेची जबाबदारी खांद्यावर आली, की आपले जुने बेछूटपण आपल्या अंगलट येते याचाच अनुभव भाजपासह नरेंद्र मोदी आता घेत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी आपला पक्ष व आपण ज्यामुळे जातीय तणाव वाढेल असे कृत्य वा वक्तव्य करणार नाही आणि जो ते करील त्याची आपण गय करणार नाही असे उद््गार काढले होते. या आश्वासनाचा पराभव आता त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनी व खासदारांनी करणे सुरू केले आहे. गिरिराज सिंग हे त्यांच्या पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार म्हणाले, ‘मोदींच्या सरकारला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे’, तर साध्वी निरंजन ज्योती या मंत्रीणबाईने मोदींच्या पक्षाला विरोध करणारे सारेच रामजाद्यांच्या विरोधात असणारे हरामजादे आहेत असे ओंगळ उद््गार परवा काढले. या दोघांचे धर्मांध अनुकरण करणाऱ्या भाजपामधील पुढाऱ्यांची व त्यांच्या मागे असलेल्या संघ परिवारातील नेत्यांची संख्याही मोठी आहे. तात्पर्य, विरोधात असताना घेतलेल्या भूमिका जशा मोदींना आता अडचणीच्या होत आहेत तसे त्यांच्याच पक्षाचे व परिवाराचे आततायी लोकही त्यांना अडचणीत आणत आहेत. गेले सात महिने देशाला अतिशय जोरकस भाषेत नीतीपासून तत्त्वज्ञानापर्यंतचा डोस पाजत आलेले नरेंद्र मोदी राज्यसभेत प्रथमच नमते घेताना दिसले. निरंजन ज्योतींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनी त्या सभागृहाचे काम बंद पाडले तेव्हा, ‘आता तिने माफी मागितली असल्यामुळे सभागृहाचे कामकाज चालू द्या’ असे बचावात्मक उद््गार काढणारे मोदी प्रथमच देशाला पाहता आले. हा बदल मोदींएवढाच काँग्रेससाठीही महत्त्वाचा व त्याच्या शिडात जास्तीची हवा भरणारा आहे. हा घटनाक्रम मोदींच्या सरकारला धोका असल्याचे सांगणारा नाही. त्यांच्या पक्षात त्यांना भक्कम पाठिंबा असून, त्याच्याजवळ लोकसभेत पुरेसे बहुमतही आहे. मात्र काँग्रेसची आरोपपत्रिका व मोदींच्या पक्षातील लोकांचा उठवळपणा या गोष्टी त्या बहुमतालाही गप्प करू शकणाऱ्या आहेत. काँग्रेस पक्षाजवळ पुरेसे खासदार नाहीत आणि इतर विरोधक त्या पक्षाला आपले शत्रू मानणारे आहेत ही स्थिती सरकारसाठी अनुकूल म्हणावी अशी आहे. मात्र निरंजन ज्योती, गिरिराज सिंगसारखे लोक त्यांचा बकवा असाच सुरू ठेवणार असतील तर सारे विरोधक भाजपाविरुद्ध एकवटतील.

Web Title: Modi's double problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.