दीदींविरुध्द मोदी ; संघर्ष टिपेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:49 PM2021-04-05T23:49:33+5:302021-04-05T23:50:29+5:30

मिलिंद कुलकर्णीएएकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चरमसीमा गाठली आहे. आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या ...

Modi against Didi; The struggle is over | दीदींविरुध्द मोदी ; संघर्ष टिपेला

दीदींविरुध्द मोदी ; संघर्ष टिपेला

Next

मिलिंद कुलकर्णीएएकीकडे

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चरमसीमा गाठली आहे. आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होत असताना त्याच दिवशी तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान होत आहे. प.बंगालमध्ये आठपैकी तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी मतदान होत आहे. एकूण २९४ जागांपैकी आतापर्यंत ९१ जागांसाठी मतदान मंगळवारी आटोपेल. तरीही चर्चा आहे ती, केवळ बंगालचीच. ममता बॅनर्जीविरुध्द नरेंद्र मोदी अशी लढत दिसून येत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष केवळ या राज्याच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. अर्थात त्याला कारणेदेखील अनेक आहेत, तरीही दीदी आणि मोदी या दोन वलयांकित नेत्यांभोवती सगळी निवडणूक केंद्रित झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये साम्यस्थळे आणि विरोधाभासदेखील मोठ्या प्रमाणात आहे. नरेंद्र मोदी हे संघटनात्मक कार्यातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेले नेते आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर विकासाचे मॉडेल जसे आहे तसा गोध्राचा डागदेखील आहे. २०१४ नंतर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले आणि २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका त्यांच्या नावावर भाजप जिंकला. प्रथमच भाजपने लोकसभेत बहुमत मिळविले. मोदींच्या करिष्म्यामुळे १६ राज्यांत भाजपची सत्ता आली. मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील कौल स्वत:कडे वळविण्यासाठी घोडेबाजारदेखील झाला. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीतून भाजपचे निवडणूक तंत्र यशस्वी होताना दिसून आले. प्रत्येक राज्याची निवडणूक भाजप स्वतंत्र पध्दतीने लढवत असल्याचे दिसून आले. तेथील स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आणि समीकरण आखले जाते. प.बंगालमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. परंतु, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल १८ जागा मिळाल्या. एकूण ४०.६ टक्के मतदान भाजपला झाले. त्यामुळे भाजपला या राज्यात संधी असल्याचे जाणवले. बिहार निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा हे बंगालमध्ये प्रचारयात्रेत सहभागी झाले होते. यावरून भाजपचे नियोजन दिसून येते.


लढाऊ नेत्याची प्रतिमा
ममता बॅनर्जी यांची प्रतिमा लढाऊ, संघर्षशील नेत्या अशी आहे. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केलेल्या ममता बॅंनर्जी यांनी बंगालमधील डाव्या पक्षांच्या राजवटीविरुध्द कायम संघर्ष केला. मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या रॉयटर्स बिल्डिंगमध्ये आंदोलनादरम्यान प्रवेश करताना त्यांना पोलिसांनी रोखले, तेथे संघर्ष झाला. त्यानंतर तेथे कधीही न जाण्याची प्रतिज्ञा केलेल्या ममतादीदी थेट मुख्यमंत्री म्हणून तेथे प्रवेश करताना दिसून आल्या. अर्थात दरम्यानच्या काळात त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली. तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. डाव्यांविरुध्द संघर्षाचा पवित्रा स्वीकारताना भाजपशी मैत्री केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाल्या. ज्या कॉंग्रेसला सोडले, त्यांच्यासोबत २०११ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी केली. पुढे त्यांचे निम्मे आमदार फोडून आपला पक्ष मजबूत केला. सिंगूर व नंदीग्राम येथील भूसंपादन आंदोलनातून ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व सबल व सक्षम झाले. माँ, माती आणि माणूसचा नारा देत तृणमूल कॉंग्रेसने तब्बल १० वर्षे सत्ता राबवली. भुलते पारी शोबार नाम, भुलबो नाको नंदीग्राम (मी प्रत्येकाचे नाव विसरू शकते, पण नंदीग्रामला कधीच विसरू शकत नाही) असा नारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र ते राज्य असा ममता बॅनर्जी यांचा प्रवास झाला. जनतेची नस ओळखण्यात दीदी आणि मोदी हे दोघे माहीर आहेत. ‘सोनार बांगला’ म्हणत बंगालमध्ये आलेल्या मोदी आणि भाजपला ‘परके’ ठरवत दीदींनी बंगाली अस्मितेला हात घातला आहे. रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद्र विद्यासागर या महापुरुषांविषयी दोघेही बोलत आहेत. मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणाचा आरोप होत असताना नंदीग्राममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जायबंदी पायासह व्हीलचेअरवर बसून दीदी राज्यभर प्रचार करीत आहेत. चंडीपाठ करणाऱ्या दीदी, स्वत:ला शांडिल्य गोत्री हिंदू ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या दीदी, नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्रावर दीड तास ठिय्या मांडून बसलेल्या दीदी, राज्यपाल, निवडणूक आयोग, केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्यांवर हल्लाबोल करणाऱ्या दीदी असे वेगळे रूप या काळात दिसून आले. शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, भाकपा (माले)चे महासचिव दीपांकर भट्टाचार्य या सगळ्या नेत्यांनी दीदींना पाठिंबा देऊ केला आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रचाराचे रान उठविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी करीत असताना अद्याप प्रचाराला गेलेले नाही. यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखी स्थिती उद्भवल्यास भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता तयार होत आहे. एकंदरीत दोन्ही नेत्यांमधील संघर्ष केवळ बंगालपुरता न राहता तो देशव्यापी बनला आहे, हे मात्र निश्चित.
(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.) 

 

Web Title: Modi against Didi; The struggle is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव