पळवून आणला राम, त्याने फोडला घाम... भाजपाची पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 11:26 AM2018-09-06T11:26:47+5:302018-09-06T11:28:46+5:30

भाजपासाठी आया'राम' चांगलाच अडचणीचा ठरताना दिसत आहे

MLA Ram Kadam Remarks Create Tension For BJP | पळवून आणला राम, त्याने फोडला घाम... भाजपाची पंचाईत

पळवून आणला राम, त्याने फोडला घाम... भाजपाची पंचाईत

googlenewsNext

- दे.दे. ठोसेकर

राम नावाच्या लोकांना भाजपामध्ये आरक्षण लागू असल्याची चमचमीत खबर एकानं मला मागं दिली होती. त्यामुळेच कोणे एकेकाळी रामभाऊ म्हाळगी. त्यानंतर, राम कापसे व राम नाईक (डबल लक्ष्मीबारच्या धर्तीवर रामबार) आणि आता राम कदम अशी रामरांग भाजपात पिढी-दरपिढी पाहायला मिळते. उत्तनला प्रबोधिनी उभी राहिली आणि रामभाऊ म्हाळगी यांचा आमच्या पिढीला परिचय झाला. मात्र, कापसे आणि नाईक हे पूर्व व पश्चिम उपनगरांच्या वेशीवरील दोन राम त्यांच्या चिकित्सक वृत्तीकरिता आणि ‘हात धुऊन पाठी लागणे’ या वाक्प्रचाराची शब्दश: प्रचीती देणाऱ्या पाठपुराव्याकरिता ओळखले जात. (परिवाराबाहेरील व्यक्तीला सोडाच, अगदी परिवारातील व्यक्तीला गॅस कनेक्शनकरिता पत्र द्यायचे, तरी ब्लँक चेक दिल्यासारखा दहावेळा विचार करणारी ही दोन रामांची जोडी दुसºयाची पोरगी उचलून आणून देण्याचा विचारही करू शकत नव्हती). या दोन रामांपुढं तसा प्रस्ताव ठेवण्याची हिंमत कुणी केली नसती. पण, समजा केलीच असती, तर त्यांनीच कदाचित भीतीनं अंथरूण धरलं असतं. ‘देश बदल रहा है...’, ‘भाजपा बदल रहा है...’ आता भाजपात संघाच्या अभ्यासवर्गात राम निपजत नसल्यानं मनसेतून राम आयात करून त्यांना अभ्यासवर्गात धाडण्यात आलं. मात्र, या पठ्ठ्या आयातरामानं ‘कृष्ण चरित्रा’चं पारायण केलं की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे. रुक्मिणी ही सौंदर्यवती, लावण्यवती राजकन्या होती. तिचा भाऊ रुक्मी याला तिचा विवाह शिशुपालासोबत करायचा होता. मात्र, रुक्मिणीच्या घरच्यांचा विरोध असतानाही कृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं. या कथेमुळं प्रभावित झालेल्या आयातरामानं लागलीच दहीहंडीच्या सोहळ्यात घाटकोपरमध्ये पोरींभोवती रुंजी घालणाºया हजारो कन्हैयांना (जेएनयूमधील नव्हे) आश्वस्त करून टाकलं. यामुळं उपस्थित कन्हैयांच्या मन मे (कॅडबरी का) लड्डू फुटण्यापूर्वीच टीकेचा वणवा पेटला. (आयातरामाची तुलना रावणाशी केली गेली) रावणानं सीतेचं हरण केलं, पण तिच्या मनमर्जीचा आब राखला, त्यामुळं या तुलनेनं काही रावणसमर्थक भडकले. तात्पर्य काय तर भाजपाची या आयातरामानं मोठ्ठी पंचाईत करून ठेवली आहे. आंबूस पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्यानं जीभ घसरते, हे माहीत होतं. पण, घाटकोपरच्या त्या हंडीतील दही इतके आंबूस असेल, याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्या हंडीत पायधूळ झाडून आयातरामांच्या आयोजन कौशल्याकरिता त्यांची सर्वांसमक्ष पाठ थोपटली, तेव्हा कुणालाच आली नाही.

जीभ हा हाड नसलेला शरीराचा अवयव घसरल्यानं अनेकांची पंचाईत झाली आहे. दरवर्षी पाऊस पडून धरणं भरू लागली की, अजित पवार यांचा चेहरा भरलेल्या धरणांची दृश्य पाहून व त्यावरील विनोद वाचून खारट होतो. युवक आणि विशेषकरून युवती यांच्यासमोर बोलताना गिरीश बापट यांनी तुम्ही मोबाइलमध्ये ज्या चोरून क्लिप बघता, त्या मीही बघतो, याची प्रांजळ कबुली दिल्यापासून बापट मोबाइलमध्ये डोकावताच कुजबूज सुरू होते आणि खसखस पिकते. आ. प्रशांत परिचारक आणि माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम यांच्या वक्तव्यानंतर तर भाजपाच्या नेत्यांची अवस्था रेव्ह पार्टीत पकडलेले आरोपी चेहरा झाकतात, तशी झाली होती. (हल्ली, वाहिन्यांवर बातम्या बघताना भाजपाचे नेते चेहरा झाकून घेण्याकरिता टॉवेल शेजारी घेऊन बसतात म्हणे) देशभरात सत्तेच्या आंबूसरसानं भाजपाच्या अनेक नेत्यांचे मेंदू सुन्न आणि जीभ सैल झाली आहे की काय, असा संशय यावा, इतका हा आजार बळावला आहे. अर्थात, आयातरामांची तरी चूक काय? ‘हेट अ‍ॅण्ड लव्ह स्टोरी’चे इतके चित्रपट त्यांनी त्यांच्या तरुण वयात (बहुधा कॉलेज बंक करून) पाहिले आहेत. ‘संगम’मधील राधाचा पिच्छा पुरवणाºया सुंदर (राज कपूर) पासून ‘दिल’मधील मधूनं बलात्काराचा आरोप करूनही हार न मानणाºया राजा (आमीर खान) पर्यंत अनेकांनी राधा (वैजयंतीमाला) पासून मधू (माधुरी दीक्षित) पर्यंत अनेकींना आपल्या वासूगिरीने बेजार करून प्रेमात पडण्यास भाग पाडल्याचे या आयातरामाने पौगंडावस्थेत पाहिलं आहे. त्यामुळं मुलगी पटवण्याच्या फिल्मी चक्करमध्ये न पडता ‘बेटी उठाओ’चा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. आता हा दोष ‘पाया है दुश्मन को जबसे प्यार के काबिल, तबसे ये आलम है, रस्ता याद ना मंजिल’... असे बाळकडू देणाºया तिसरी मंजिलपर्यंत लागलेल्या फिल्मी थरांचा की, उत्तनच्या प्रबोधिनीत ऐकलेल्या कृष्णचरित्रातील ‘रुक्मिणीहरण’ कथेचा?
 

Web Title: MLA Ram Kadam Remarks Create Tension For BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.