मीराकुमार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 02:45 AM2020-11-26T02:45:09+5:302020-11-26T02:47:36+5:30

राहुल गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष करण्याच्या खटपटीत निष्ठावंत आहेत, तर बंडखोरांनी मात्र मीराकुमार यांचे नाव पुढे सरकवायला सुरुवात केली आहे !

Mirakumar is the interim president of the Congress? | मीराकुमार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष?

मीराकुमार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष?

googlenewsNext

हरीष गुप्ता

कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून सध्या बराच गोंधळ आहे. राहुल गांधी पुन्हा एकवार पक्षाचे अध्यक्ष होणे कसे जमवून आणतील याबद्दल गांधी कुटुंबीयांच्या निष्ठावंताना अजिबात खात्री नाही. कॉंग्रेसचे पुनर्रचित मध्यवर्ती निवडणूक मंडळ पुढच्या वर्षी मार्चमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण करीत आहे. मात्र  तत्पूर्वीच राहुल यांना हंगामी अध्यक्ष करण्याच्या खटपटीत सध्या निष्ठावंत आहेत. आधी त्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून आणायचे आणि पुढे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून चाल द्यायची असा त्यांचा बेत आहे. पण कॉंग्रेस पक्षातल्या बंडखोरांनी मात्र राहुलना हंगामी अध्यक्ष होऊ द्यायचे नाही असे ठरवले असून, लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांना पक्षाचे हंगामी अध्यक्षपद देण्याचा घाट त्यांनी घातला आहे.

मीराकुमार यांच्या मदतीला पक्ष बळकट करण्यासाठी विविध प्रदेशातून आलेले ३-४ उपाध्यक्ष असतील. या घडीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत या पदावर यायला उत्सुक नाहीत.. आणि  दुसरे योग्य नाव पक्षाकडे नाही. भूपिंदर सिंग हुडा एक उपाध्यक्ष असतील. राहुल गांधी पुन्हा जम बसवण्याच्या प्रयत्नात असताना ओबामा यांच्या आत्मचरित्रातील  त्यांच्याबद्दलच्या शेऱ्याने सगळा डाव उधळला गेला. ओबामा यांनी एक प्रकारे कॉंग्रेसच्या बंडखोरांचे ‘हात’ बळकट केले, असेच म्हटले पाहिजे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी सगळी प्रक्रिया पुढे ढकलू इच्छितात. या पाच राज्यांतील निवडणुकीत कॉंग्रेस चांगली कामगिरी करील, त्यामुळे राहुल यांना पुन्हा एकवार अध्यक्षपदी येण्यासाठी अनुकूलता निर्माण होईल, असा त्यांचा होरा आहे.

नड्डाजींनी मैदान मारले!
बिहारमध्ये विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आभार प्रदर्शनासाठी’ भाजप पक्ष मुख्यालयात गेले होते. त्याप्रसंगी काहीतरी आक्रीतच घडले. दोन दशके उलटल्यावर बिहारमध्ये भाजप नितीशकुमार यांचा मोठा भाऊ झाला हे नक्कीच मोठे यश होते. पुढच्या वर्षी विविध राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकात बिहारमधल्या यशाचा भाजपला उपयोग होणार आहे. मुख्यालयात कार्यकर्त्यांपुढे पंतप्रधानांचे भाषण झाले. बोलताना नड्डा  यांच्याकडे वळून मोदी एकदम म्हणाले ‘नड्डाजी, आगे चलो  हम तुम्हारे साथ है’. अशी शाबासकी यापूर्वी कोणत्याही भाजपाध्यक्षाला मिळालेली नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मोदी यांनी पुन्हा शाबासकीचा उच्चार केल्यावर  मोदी यांचे आभार मानण्यासाठी नड्डा आपल्या जागेवरून उठले. आश्चर्य म्हणजे मोदी यांनी तिसऱ्यांदा ‘आगे चलो...’ म्हटले तेव्हा अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतरांनी टाळ्या वाजवल्या; पण त्यात जरा अवघडलेपणा होता. बिहारमध्ये पराभव होईल हे गृहीत धरून प्रचाराला जाणे टाळणाऱ्या नेत्यांना तर मोदी काही सुचवत नव्हते? खुद्द् मोदींकडून अत्यंत दुर्लभ अशी शाबासकी मिळाल्याने नड्डा यांचा रथ चार बोटे वरून चालू लागला, यात काही नवल  नव्हते? म्हणा ! बिहारमध्ये तळ ठोकून बसल्याचा त्यांना असा फायदा झाला. त्यांच्या वरिष्ठांच्या छायेतून नड्डा बाहेर येत आहेत, असे म्हणावे काय?- येणारा काळ याचे उत्तर देईल; पण त्यांनी मैदान गाजवले हे मात्र खरे.

रजनीकांत यांनी दिली हुलकावणी
मे २०२१ मध्ये तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी भाजप-अ. भा. अण्णा अद्रमुक पक्षाची युती अमित शाह यांनी पक्की केली. त्याच्या रोड शोने चेन्नईत बरीच हवा निर्माण केली. मात्र ज्येष्ठ सिनेस्टार रजनीकांत तसेच द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे बंधू एम. के. अलागिरी यांच्याशी त्यांची भेट काही होऊ शकली नाही. स्टॅलिन आणि अलागिरी यांचे काही जमत नाही. ज्या हॉटेलवर अमित शहा उतरले होते तेथे ते दुपारी अडीच वाजेपर्यंत बैठका घेत राहिले; पण दोघेही फिरकले नाहीत.

एसटीसी गाशा गुंडाळणार 
मोदी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा आजारी सार्वजनिक उद्योग बंद करण्याचा किंवा विकून टाकण्याच्या मोठ्या योजना सरकारने आखल्या होत्या. पण सहा वर्षे झाल्यावर मात्र ‘बोलणे सोपे करणे अवघड’ हे त्यांच्या लक्षात आले असावे. कर्माचाऱ्यांना गोल्डन हँडशेकसाठी अब्जावधी रुपये खर्च करूनही केंद्र सरकारला  अद्याप  बीएसएनएल किंवा एमटीएनएल विकता आलेले नाही. कदाचित एअर इंडिया किंवा भारत पेट्रोलियम विकण्यात सरकार यशस्वी होईलही; पण पडेल किमतीला. सहा वर्षांपूर्वी सरकारला स्टेट ट्रेडिंग कार्पोरेशन (एसटीसी) बंद करावयाचे होते. बीएसई  तसेच एनएसई अशा दोनही शेअर बाजारातून एसटीसी आत्ता आत्ता डीलिस्ट  झाले. नोव्हेंबर ३० पर्यंत मुंबई, कोलकाता, अहमदाबादसह सर्व शाखा बंद करण्याचे परिपत्रक एसटीसी मंडळाने काढले आहे. राहिलेल्या शाखा डिसेंबरअखेरपर्यंत बंद होतील. २०२१ साली हे महामंडळ केवळ कागदावर उरेल. कायदेशीर बाबी पूर्ण व्हायच्या बाकी असतील एवढेच ! कर्मचाऱ्यांना घसघशीत गोल्डन हँडशेक मिळालाच आहे. काहींच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. यानंतर एमएमटीसीचा नंबर आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दोन्ही महामंडळाच्याकडे असलेल्या जमिनी नंतर विकता येतील.  

(लेखक लोकमत वृत्त समुहात नॅशनल एडिटर आहेत)

Web Title: Mirakumar is the interim president of the Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.