कोण कोण होणार मराठी पंतप्रधान?

By संदीप प्रधान | Published: January 9, 2019 05:34 PM2019-01-09T17:34:05+5:302019-01-09T17:37:33+5:30

पुढील ५० वर्षे मोदीच पंतप्रधानपदी राहतील हे आणि पुढील ५० वर्षांत देशाला बरेच मराठी पंतप्रधान लाभतील ही दोन्ही विधाने टाळ्या मिळवण्याकरिता केलेली आहेत....

Marathi Candidates for Prime Minister post in future  | कोण कोण होणार मराठी पंतप्रधान?

कोण कोण होणार मराठी पंतप्रधान?

ठळक मुद्देमोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भक्कम बहुमताचे सरकार ना सरसंघचालक मोहन भागवत यांना दिसत आहे ना उद्धव ठाकरे यांना.गडकरी यांच्या रूपाने मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता ६० ते ७५ टक्के आहे.पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव असू शकते. ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आहे.

- संदीप प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्लू आईड बॉय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाला २०५० पर्यंत एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली की नाही ते माहित नाही. परंतु पत्रकारांचे अगोदरच लांब असलेले कान आणखी लांब झाले. नरेंद्र मोदी हे पुढील ५० वर्षे देशाचे पंतप्रधान राहतील, अशी घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी केलेली असल्याने अचानक मोदींचे आरक्षण रद्द करुन फडणवीस यांनी मराठी माणसाचं घोडं कसं काय दामटलं हा विचार पत्रकारांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले असल्याने २०६४ पर्यंत ते खुर्ची सोडणार नाहीत. मोदींचे सध्या वय ६९ वर्षे आहे. शहा यांची भविष्यवाणी खरी ठरली व फडणवीस यांची बत्तीशी खरी ठरली नाही तर मोदींचे वय त्यावेळी ११४ वर्षे असेल. समजा क्षणभर असे गृहीत धरु की, मोदींची पंतप्रधानपदाची ५० वर्षे पूर्ण झाल्यावर मराठी माणसाचा पंतप्रधानपदी क्रमांक लागेल, असे फडणवीस बोलले असतील तर सध्या मोदींना बदलून लागलीच पंतप्रधानपदाकरिता रा. स्व. संघ ज्यांचा विचार करु शकेल, असे नितीन गडकरी ज्यांचे सध्या वय ६२ वर्षे आहे ते २०६४ साली ते फक्त १०७ वर्षांचे असतील. ज्यांचे पंतप्रधानपद हा गेल्या काही वर्षांत चक्क टिंगलटवाळीचा विषय झाल्याने आता त्यांनीच 'साहेबांना पंतप्रधान करण्याचे' हे सोडून बोला, अशी तंबी दिली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सध्या वय ७९ असून ते मोदींच्या कारकीर्दीच्या पन्नाशीनंतर या पदावर विराजनाम झाले तर त्यावेळी त्यांचे वय १२४ वर्षे असेल. समजा मोदी यांचे पंतप्रधानपद उपभोगून पन्नास वर्षांनंतर मन तृप्त झाले व त्यांनी आपला वारसदार म्हणून फडणवीस यांना त्या गादीवर बसवण्याचे ठरवले तर सध्या ४९ वर्षांचे असलेले फडणवीस हे त्यावेळी ९४ वर्षांचे असतील. वरील हास्यास्पद अंकगणित याकरिता दिले की, पुढील ५० वर्षे मोदीच पंतप्रधानपदी राहतील हे आणि पुढील ५० वर्षांत देशाला बरेच मराठी पंतप्रधान लाभतील ही दोन्ही विधाने टाळ्या मिळवण्याकरिता केलेली असून वास्तववादाच्या कसोटीवर त्याचा विचार केला तर ती अशक्य कोटीतील आहेत.

त्यामुळे फडणवीस जेव्हा म्हणतात की, पुढील ५० वर्षांत देशाला अनेक मराठी पंतप्रधान मिळतील तेव्हा ते वस्तुत: पुढील पाच वर्षातील बोलत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भक्कम बहुमताचे सरकार ना सरसंघचालक मोहन भागवत यांना दिसत आहे ना भाजपासोबत अनेक दशकांची युती असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिसत आहे. निवडणुकीत पानिपत होऊन काँग्रेसच्या किंवा तिसऱ्या अथवा चवथ्या आघाडीतील एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकार आले तर प्रश्नच मिटला. परंतु बरेच मित्र जोडून कुबड्यांचे सरकार भाजपाला चालवायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना ते कितपत जमेल, याबाबत भाजपामधील अनेकांना शंका वाटत असावी व ती रास्त आहे. मोदींनी कायम भक्कम बहुमताचे सरकार चालवले असून त्यांच्या सरकारची सुरुवात मोदींपासून होऊन मोदींपर्यंत संपते. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बिनचेहऱ्याचे असतात. त्यामुळे निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्षांचे नखरे, रागरुसवे सांभाळत सरकार चालवणे त्यांना जमणे अशक्य आहे. अशावेळी नितीन गडकरी यांच्यासारखा नेता हा रा. स्व. संघाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असू शकतो. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना गोपीनाथ मुंडे यांचे काहीवेळा शिवसेनेसोबत खटके उडाले. मात्र गडकरी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. त्यांच्या कामाच्या धडाकेबाजपणाबद्दल ठाकरे यांनी अनेकदा त्यांचे जाहीर कौतुक केले होते. उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांच्यातील संबंधात बिब्बा पडला तो नारायण राणे यांच्या बंडानंतर चिमूरची पोटनिवडणूक लागली तेव्हा. अर्थात त्याला आता बरीच वर्षे झाली. शिवाय मोदी-शहा यांच्यापेक्षा गडकरी हे शिवसेनेला जवळचे वाटू शकतात. मराठी माणसाला पंतप्रधानपद मिळत असताना विरोध करुन अपशकुन करणे शिवसेनेला परवडणारे नाही. गडकरी यांचे शरद पवार यांच्याशी उत्तम संबंध आहेत. भाजपाला मित्रपक्षाची गरज असेल तर गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर पवार हे पडद्याआडून सूत्रे हलवून त्यांना मदत करु शकतात. गडकरी यांच्या रूपाने मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता ६० ते ७५ टक्के आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकु अवस्था निर्माण झाली तर भाजपा व काँग्रेसला बाजूला ठेवून छोट्या पक्षाचा नेता पंतप्रधान होऊ शकतो. मात्र त्या परिस्थितीत मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू वगैरे नेत्यांमध्ये शरद पवार यांचा क्रमांक पाचव्या-सहाव्या स्थानावर असू शकेल. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पवार यांच्या स्पर्धेतील नेते बाद ठरले तर त्यांना पंतप्रधान होण्याकरिता फारुख अब्दुल्लांपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा पाठिंबा लाभेल. मात्र पवार हे पंतप्रधान होण्याची शक्यता १० ते १५ टक्केच आहे.

केंद्रात भाजपाचे सरकार काठावरचे बहुमत घेऊन आले व संघाला मोदी-शहा यांचे जोखड फेकून देण्याचीच इच्छा असेल, नितीन गडकरी यांच्यापेक्षा तरुण, आक्रमक चेहऱ्याच्या ताब्यात देश सोपवायची इच्छा असेल तर खुद्द देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात. मात्र फडणवीस हे पंतप्रधान झाले तर मोदींबरोबरच संघाला गडकरी यांनाही राजकारणातून निवृत्त करावे लागेल. कारण फडणवीस यांच्या हाताखाली गडकरी केंद्रात काम करु शकणार नाहीत. तसेच एकाच राज्यातील, एकाच शहरातील, एकाच जातीचे दोन नेते पंतप्रधान व मुख्यमंत्री करणेही उचित होणार नाही. त्यामुळे गडकरी हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याचा मार्गही या पर्यायात बंद होतो. फडणवीस यांचे मंत्रिमंडळ तरुण असेल. अर्थात फडणवीस यांचा राष्ट्रीय राजकारणातील तोकडा अनुभव, त्यांच्यापेक्षा अनुभवी लोक पक्षात असणे वगैरे बाबी लक्षात घेता ही शक्यताही ५ ते १५ टक्केच आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव असू शकते. ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आहे. आदित्य यांना संसदीय राजकारणाची आवड असून त्यांनी अनेकांशी या विषयावर गेली काही वर्षे सल्लामसलत केली आहे. अर्थात आदित्य यांनी महाराष्ट्रात राजकारण करावे की राष्ट्रीय स्तरावर यावर शिवसेनेत मतैक्य झालेले नाही. खुद्द आदित्य यांना दिल्लीत राजकारण करण्याची इच्छा आहे, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. महाराष्ट्रात आदित्य निवडणूक लढवून आमदार झाले तर त्यांनाच पक्षाचे गटनेते व्हावे लागेल. समजा ते गटनेते झाले नाहीत तर जो कुणी गटनेता होईल त्यांच्यावर आदित्य यांचा रिमोट कंट्रोल राहील. समजा शिवसेना सत्तेत आली तर आदित्य मंत्री होतील. नाही तर आदित्य यांना एक आमदार म्हणून सभागृहात बसावे लागेल. मात्र आदित्य दिल्लीतील राजकारणात गेले तर राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सुप्रिया सुळे वगैरे नेत्यांसोबत उठबस करण्याची संधी त्यांना लाभेल. भविष्यात (कदाचित पुढील ५० वर्षांत) आदित्य हे रालोआकडून भाजपाच्या पाठिंब्याने पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात. सध्या आदित्य यांचे वय २९ वर्षे असून समजा पुढील ५० व्या वर्षी आदित्य ठाकरे हे पंतप्रधान होणार असतील तर त्यांचे वय ७९ वर्षे असेल. अर्थात ही शक्यता या घडीला शून्य ते चार टक्के आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मराठी पंतप्रधान होतील हे विधान जागतिक मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरुन केले होते. काही पत्रकारांच्या मतानुसार, मराठी प्रेमाचे उमाळे काढण्याच्या अशा व्यासपीठावरुन अशी आकर्षक विधाने करणे हा प्रोटोकॉल असतो. फडणवीस यांनी त्या प्रोटोकॉलचे आचरण केले की, त्यांनाही मोहन भागवत यांच्याप्रमाणे सध्या लोकसभा निवडणुकीनंतर विपरीत चित्र दिसत असल्याने त्यांनी विशाल आघाडीच्या राजकारणाबाबत वास्तववादी वक्तव्य केले ते अल्पावधीतच स्पष्ट होईल.

Web Title: Marathi Candidates for Prime Minister post in future 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.