मंत्र, तंत्र आणि यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:49 IST2018-12-20T22:49:15+5:302018-12-20T22:49:43+5:30
जामनेरच्या दोघांनी मतदान यंत्र हॅक करण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार करीत पराभूत उमेदवार जामनेरला येऊन धडकले. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्रात पारंगत असलेला पक्षच २०१९ चा सत्ताधारी राहणार हे मात्र निश्चित आहे.

मंत्र, तंत्र आणि यंत्र
मिलिंद कुलकर्णी
२०१९ हे वर्ष भारताच्या दृष्टीने महत्वाचे वर्ष आहे. पंचवार्षिक निवडणुका होणार असल्याने या वर्षाचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्टÑासारख्या प्रगत राज्याची विधानसभेची निवडणूकदेखील याच वर्षात होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, प्रशासकीय यंत्रणा, प्रसार माध्यमे आणि जनसामान्यांना या निवडणुकांविषयी उत्सुकता कायम राहणार आहे.
२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश आणि भाजपाला पराभवाचा धक्का बसल्याने लोकसभा निवडणुकीत काय होईल, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. तत्पूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्वांचलातील छोटी राज्ये यात भाजपाने दणदणीत यश मिळविल्याने भाजपा आणि मोदींना २०१९ ला काहीच धोका नाही, असे म्हटले जात होते. भाजपाचा मंत्र होता, ‘काँग्रेसमुक्त भारत’. पण भारतीय मतदार किती हुशार, चाणाक्ष आणि समजदार आहे, याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. तो २०१८ च्या मावळतीला आला.
कोणताही पक्ष आणि नेता जनतेला गृहित धरु लागला की, त्याला जमिनीवर आणण्यात भारतीय मतदार कधी चुकत नाही. मग ती आणीबाणी, जनता सरकारचा प्रयोग, पुलोद आणि कॉंग्रेसमुक्त भारताचा नारा असो..असे घडलेले आहेच.
काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला होता. विरोधकांनी त्याला ‘गरीब हटाव’ असा काँग्रेसचा मंत्र असल्याची टीका केली होती. ‘जय जवान, जय किसान’ हा लालबहादूर शास्त्री यांचा नारा प्रसिध्द आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषचंद्र बोस यांचा ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा’ हा नारा अनेकांना क्रांती कार्यात सहभागी होण्यास प्रेरक ठरला. महात्मा गांधीजींचा ‘चले जाव’चा नारा निर्णायक ठरला. हा इतिहास पाहता भारतीय जनता ही एखादी घोषणा, मंत्राला भारावते असेच चित्र आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाने ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. ही घोषणा जनतेला आवडली. परंतु, पाच वर्षात त्या घोषणेवरुन भाजपा आणि मोदींना अनेकांनी धारेवर धरले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोरे जाताना ‘शायनिंग इंडिया’चा नारा देण्यात आला; पण वाजपेयींसारखा नेता असूनही भारतीयांनी त्यांना पुन्हा संधी दिली नव्हती. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीसाठी कोणता नारा देते, आणि जनता त्याला कसा प्रतिसाद देते, याची उत्सुकता आहे.
मंत्रापाठोपाठ येतो तंत्र. देशात सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे ६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. निवडणूक तंत्र कॉंग्रेसला पुरते अवगत होते. एकहाती सत्तेचे दुष्परिणाम पक्ष आणि जनतेवर होतात, तसे झाले. देशातील राजकारण बदलले. मंडल आणि कमंडलच्या राजकारणात काँग्रेसचा जनाधार कमी झाला. अनेक राज्ये हातातून निसटली. काँग्रेसमधील नेत्यांनीच राज्या-राज्यात स्वत:च्या जहागिऱ्या तयार केल्या. प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओरिसात बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, छत्तीसगडमध्ये अजित जोगी, महाराष्टÑात शरद पवार असे नेते प्रभावशाली बनले. त्याचे नुकसान कॉंग्रेसला झाले. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, कांशिराम-मायावती, देवेगौडा, एन.टी.रामाराव-चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव, असे प्रादेशिक नेते आपल्या राज्यापुरती सीमित राहिले परंतु त्यांची शक्ती तयार झाली. निवडणूक तंत्र म्हणून प्रादेशिक अस्मिता, जातीय समीकरणे यांचा प्रभावी वापर काँग्रेसप्रमाणेच ही मंडळी करु लागल्याने त्यांना कमी-अधिक यश मिळू लागले. अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्याच्या असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचे देवदर्शन करीत मवाळ हिंदुत्वाचा नारा लोकांना भावत आहे. आता तर ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा देऊन नेते ‘साम-दाम-दंड-भेद’चा वापर करा, असे जाहीर आवाहन करीत आहे. भाजपाच्या या नवीन तंत्राला महाराष्टÑात तरी चांगले यश मिळत आहे. एक आकडी संख्या असलेल्या धुळे महापालिकेत भाजपाचे ५० नगरसेवक निवडून येतात, हे या तंत्राचे यश नव्हे काय?
मंत्र, तंत्रापाठोपाठ निवडणुकीत आता यंत्राला महत्त्व आले आहे. भाजपाच्या यशात मतदान यंत्राचा मोठा वाटा आहे, असा काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांचा आरोप आहे. तीन राज्यात यश मिळूनदेखील कॉंग्रेसचा मतदान यंत्रांना विरोध कायम आहे. इव्हीएम मशीन हॅक करता येतात, असा संशय जाहीरपणे धुळे महापालिका निवडणुकीत व्यक्त झाला. पराभूत उमेदवारांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढून चौकशीची मागणी केली. जामनेरच्या दोघांनी मतदान यंत्र हॅक करण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार करीत पराभूत उमेदवार जामनेरला येऊन धडकले. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्रात पारंगत असलेला पक्षच २०१९ चा सत्ताधारी राहणार हे मात्र निश्चित आहे.