रणबीर कपूर नावाचा ‘मॅन चाइल्ड’ बदलत गेला, त्याची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 07:38 AM2023-12-30T07:38:35+5:302023-12-30T07:39:33+5:30

तो जिथं काम करतो त्या फिल्म इंडस्ट्रीतल्या चकचकाटात हा एकटाच कोपऱ्यात फुरंगटून बसलेल्या मुलासारखा आहे. त्याच्या आत स्वतःचं एक शहर वसलेलं आहे...

man child named ranbir kapoor changed his story | रणबीर कपूर नावाचा ‘मॅन चाइल्ड’ बदलत गेला, त्याची गोष्ट!

रणबीर कपूर नावाचा ‘मॅन चाइल्ड’ बदलत गेला, त्याची गोष्ट!

अमोल उदगीरकर, चित्रपट अभ्यासक

ॲनिमल ‘सिनेमाने   समाजमन ढवळून काढलं. स्त्रियांना तुच्छ लेखणारी पुरुषी मनोवृत्ती, हिंसाचाराचं  ग्लोरिफिकेशन यावर समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा झडल्या; पण  ‘ॲनिमल’  यशस्वी होण्याचे इतरही अनेक मायने आहेत. मार्व्हल्सच्या सुपर हिरो सिनेमांच्या यशानंतर टारंटिनो म्हणाला होता, ‘आता  कॅप्टन अमेरिका हे पात्र ती भूमिका करणाऱ्या ख्रिस इव्हान्सपेक्षा मोठं झालं  आहे; अभिनेत्यांना मोठं स्टार बनायचं असेल तर त्यांनी आपल्या अभिनयाने व्यक्तिरेखेचा पैस खूप मोठा केला पाहिजे!’ - रणबीरने ‘ॲनिमल’मध्ये साकारलेला रणविजय अगदी हेच करतो. 

चॉकलेटबॉय ते मारधाड करणारा ॲक्शन हीरो हा  कायापालट रणबीरने कसा केला ती प्रक्रिया रोचक आहे. मानसशास्त्रात ‘पीटर पॅन सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. शारीरिक वय वाढलेल्या, पण मनाने वाढण्यास नकार देणारा पुरुष म्हणजे ‘पीटर पॅन सिंड्रोम’ग्रस्त पुरुष. अजून एक चांगला शब्द म्हणजे ‘मॅन -चाइल्ड’. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जन्माला आलेले बहुतेक पुरुष या सिंड्रोमने ग्रस्त असावेत. 

या ‘मॅन चाइल्ड’ पुरुषांना घरातल्या जबाबदाऱ्या नको असतात. कामधाम करण्यापेक्षा  मित्रांसोबत चकाट्या पिटायला आवडतं. तणावाला तोंड देण्यापेक्षा दूर पळण्याची वृत्ती असते. एकूणच यांच्या आयुष्यातल्या प्राथमिकता गंडलेल्या असतात. ‘वेक अप सिड’मध्ये  रणबीरने साकारलेला सिड हे याचं आदर्श उदाहरण. वडिलांच्या पैशावर जगणारा, आयुष्यात काय करायचंय हे माहीत नसणारा, कोंकणासोबत अनेक दिवस एकत्र राहूनही तिचं प्रेम लक्षात न येणारा सिड हे मॅन चाइल्डचं बेस्ट उदाहरण. 

रणबीरची कारकीर्दच परिपक्व होण्यास जाणूनबुजून नकार देणाऱ्या मॅन चाइल्डची भूमिका करण्यात गेली आहे . ‘तमाशा’मधला चेहरा आणि मुखवटा वेगळा असणारा वेद, कलाकार बनता यावं म्हणून वेदनेचा पाठलाग करणारा जनार्दन जख्खर ऊर्फ जॉर्डन ‘रॉकस्टार’, आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होऊ शकत नाही हे कळल्यावरही  आपल्या हट्टावर अडून राहणारा ‘ए दिल है मुश्किल’मधला अयान आणि अजून अनेक! 

‘ॲनिमल’मधल्या रणबीरच्या पात्रामध्ये मॅन -चाइल्डपणाच्या छटा आहेतच. अभिनेत्याच्या भूमिकांमध्ये एकच पॅटर्न पुन्हा पुन्हा दिसायला लागतो तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात शोधणं हा नेहमीच चालणारा खेळ.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन  कपूर घराण्यात जन्माला आलेला हा मुलगा खूप वेगळा आहे. त्याच्या आजूबाजूचं जग, तो जिथं काम करतो ती फिल्म इंडस्ट्री चकचकाटी; तिथं हा एकटाच कोपऱ्यात फुरंगटून बसलेल्या मुलासारखा आहे. त्याच्या आत वसलेल्या स्वतःच्या शहरात तो खुश असतो. तो सोशल मीडियावर नाही, त्याची  पीआर एजन्सी नाही, साधा  सेक्रेटरीही  नाही.  आपलं अपील आपल्याभोवती असणाऱ्या गूढ वलयात  आहे याची उपजत जाणीव त्याला असावी. रणबीरच्या सामाजिक राजकीय भूमिका काय, तो कुठल्या टूथपेस्टने दात घासतो, कुठल्या जीममध्ये जातो याबद्दल त्याच्या चाहत्यांना  काहीही माहीत नसतं. शोबीझमध्ये राहून प्रसिद्धीकडे पाठ वळवून राहणं हे थोर आहे. 

नीतू सिंग सांगते की, रणबीर लहानपणापासूनच खूप डिटॅच्ड  आहे. आपण सगळेच जण आपल्या बालपणाचं प्रॉडक्ट असतो. रणबीरही. वडील ऋषी कपूर आणि आई नीतू सिंगमध्ये नेहमी भांडणं व्हायची. मग  रणबीर रात्र-रात्र बाहेरच्या पायऱ्यांवर बसून राहायचा. रणबीरचे वडिलांशी संबंध पिक्चर परफेक्ट नव्हते. ऋषी कपूरच्या शेवटच्या दिवसांमध्ये ते अंतर बरंच मिटलं. मग ऋषी कपूर यांनी पोराला कळवळून सांगितलं, ‘बस झाले तुझे हे प्रयोग. बस झाले ‘जग्गा जासूस’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’सारखे सिनेमे. तू कपूर आहेस. अभिनेता आहेस. प्रेक्षक जर तुझा सिनेमाच बघायला येणार नसतील तर काय अर्थ आहे तुझ्या कलेला?’

- त्यावेळेस सातत्याने फ्लॉप देणाऱ्या (‘संजू’सारखा अपवाद वगळता) आणि आपल्या सहकलाकारांबरोबरच्या शर्यतीमध्ये मागे पडलेल्या रणबीरने वडिलांचा सल्ला ऐकला खरा! या वर्षी ‘तू झूठी मै मक्कार’ आणि ‘ॲनिमल’सारखे सिनेमे करून रणबीर सुपरस्टारपदाच्या शर्यतीमध्ये आला, एवढंच नव्हे, तर त्याच्या समवयस्क  अभिनेत्यांपेक्षा खूप पुढं निघून गेला आहे .

आयुष्य मस्त सुरळीत चालू असतं. आवडत नसताना पण घरच्यांच्या मनाप्रमाणे त्यांनीच निवडलेलं करिअर आपण करत असतो. जगासमोर आपली सुखवस्तू , आनंदी प्रतिमा स्थिरावत असते आणि मग रणबीर कपूर येतो. आपल्या ठुसठुसणाऱ्या जखमा जाग्या  करतो. रणबीर ‘रॉकेटसिंग’मध्ये येतो आणि आपल्या टर्रेबाज बॉसला उलटून सांगतो, ‘सर, मुझे तो नंबर दिखते ही नही, बस लोग दिखते है! बिझनेस नंबर से नही लोगों से बनता है!’- आता असं कुठं असतं का ?  ‘ये जवानी है दिवानी’मध्ये हा बहाद्दर म्हणतो, ‘२२ तक पढाई, २५ तक नौकरी, २७ तक शादी, तीस तक बच्चे, साठ तक रिटायरमेंट... और फिर मौत का इंतजार... धत ऐसी  घिसी पिटी लाइफ पे!’ 

- आता या अव्यवहारी माणसाला कोण सांगणार की, बाबारे, सुरक्षित आयुष्य जगणं महत्त्वाचं नाही का? सगळेच लोक रिस्क घ्यायला लागले तर जगाचा कारभार कसा चालेल? ‘पाश’ एका कवितेमध्ये लिहितो,  ‘मैं घास हूँ, मैं आपके हर किए-धरे पर उग आऊंगा’. 

- रणबीर हा एका पिढीसाठी पाश म्हणतो ती ‘घास’ आहे. amoludgirkar@gmail.com

 

Web Title: man child named ranbir kapoor changed his story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.