अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:27 IST2025-11-03T06:26:35+5:302025-11-03T06:27:10+5:30
दुबार मतदार दिसला की त्याला बडवा, असा ‘आदेश’ ठाकरे बंधूंनी दिला आहे. पण काँग्रेसला तो कितपत रुचेल हा प्रश्नच आहे.

अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
महा-मनसे, असे नवीन समीकरण शनिवारच्या मुंबईतील ‘सत्याचा मोर्चा’मध्ये बघायला मिळाले. महाविकास आघाडी अधिक राज ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महा-मनसे असे समीकरण कायम राहण्याची शक्यता कमी असली, तरी सहभागी झालेल्या प्रत्येकच पक्षाला या मोर्चाने ताकद दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘अशीच एकजूट ठेवा’, हा जो सल्ला त्यांच्या भाषणात दिला त्याचा सन्मान करत सगळे निवडणुकीतही एकत्र राहतील, याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. २०१९ मध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांना एकत्र आणले होते आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले. आता तोच धागा पुढे नेत राज ठाकरेंनाही सहभागी करून घेतले, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल.
भाजप-महायुतीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटून लढतील न लढतील; परवाच्या मोर्चाने विरोधकांमध्ये जान आणण्याचे काम निश्चितच केले आहे. काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार की नाही, याविषयी माध्यमांतून अनिश्चितता व्यक्त केली जात होती, पण बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे मोठे नेते आले. बिहार निवडणुकीची किनार असल्याने राज यांच्याबरोबर दिसू नये म्हणून आणि ‘एकला चलो रे’च्या मार्गावर प्रदेश काँग्रेसला नेण्याची इच्छा असल्याने हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले नसावेत, पण त्यामुळे विरोधकांची एकजूट रोखली गेली नाही. शरद पवार आणि काँग्रेस या दोघांचा मोर्चात सहभाग असला, तरी वरचष्मा ठाकरे बंधूंचाच होता. मुळात शिवसेनेचे राजकारण हे आक्रमक वा हिंसक प्रतिक्रियेचे राहिले आहे आणि काही वर्षांपासून दुरावलेले राज ठाकरे आता उद्धव यांच्यासोबत आल्याने खळ्ळखट्ट्याकच्या दिशेने ते पुन्हा एकदा जाताना दिसत आहेत. मतचोरी आणि दुबार मतदार दिसला की, त्याला बडवा, असा ‘आदेश’ ठाकरे बंधूंनी मोर्चात दिला आहे. काँग्रेसला तो कितपत रुचेल हा प्रश्नच आहे.
अशा हिंसक प्रतिक्रियेचे राजकारण काँग्रेस कधीही करत नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी मंचावरून बडवातुडवाची भाषा केली, तेव्हा थोरातांना कसनुसे झाले असेल. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि तेव्हाच्या एकत्रित राष्ट्रवादीसोबत गेले, तेव्हा तिघांमध्ये लिखित असा कोणताही किमान समान कार्यक्रम नव्हता. मात्र, स्वत:ला कुठे मुरड घालायची याचे भान उद्धव ठाकरे यांनी ठेवले आणि काँग्रेस-शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला छेद जाईल, त्यातून अंतर्गत मोठे मतभेद निर्माण होऊन महाविकास आघाडी फुटेल, अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नाही. मात्र, राज ठाकरे यांना भविष्यात सोबत घेतले, तर ते अशी समंजस भूमिका घेतीलच याची खात्री नसल्याने त्यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाचीही तयारी दिसत नाही.
राज यांचे लहरी राजकारण काँग्रेसच्या पचनी पडणार नाही. मात्र, कालच्या मोर्चाला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता भाजपविरोधात सगळ्यांनीच एकत्र यायला हवे, अशी लोकेच्छाही दिसून आली. या लोकेच्छेचा सन्मान झाला अन् सगळे एकत्र राहिले, तर मुंबईसह राज्यात वेगळे चित्र दिसू शकेल. मतदार याद्यांमधील घोळाविरुद्ध विरोधक एकवटले आहेत, पण याबाबत त्यांच्या भूमिकांमध्ये मात्र विसंगती दिसते. ‘मतदानाला आलेला कोणी मतचोर वा दुबार मतदार दिसला, तर त्याला बडवा’ असे ठाकरे बंधू म्हणतात, तेव्हा निवडणुका होणार याला त्यांचा विरोध नसल्याचे त्यातून ध्वनीत होते. त्याचवेळी वर्षभर निवडणुका नाही झाल्या, तर काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणतात. मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका होताच कामा नयेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. सदोष मतदार याद्यांवरून न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. हे सगळे बघता कालच्या मोर्चाने विरोधकांची एकजूट दाखविली असली, तरी त्यातील भाषणे बघता भूमिकेबाबत एकवाक्यतेचा अभाव दिसतो. एकजूट दाखवतानाच भूमिकेची एकवाक्यताही विरोधक दाखवू शकले, तर त्यांना अधिक बळकटी मिळू शकेल. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग चार-पाच दिवसांत नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी महा-मनसे नेमकी काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे.