शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 08:29 IST

ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली.

कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांना उडवले. त्यानंतरचा घटनाक्रम एखाद्या चित्रपटातल्या थरार कथेलाही लाजवेल, असा आहे. त्याच्या बड्या बापाने, विशाल अग्रवालने सारी यंत्रणा हाताशी धरून या ‘बाळाला’ वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या जागरूक नागरिकांनी आणि माध्यमांनी त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरवले. त्याची दुष्कृत्ये साऱ्या जनतेसमोर आणली. मंत्री, प्रशासनातील अधिकारी, पोलिस, डॉक्टर, पबचालक या सर्वांची भंबेरी उडाली. सहा ते सात महिन्यांपूर्वीच घडलेले ललित पाटील प्रकरणही अशीच एखादी चित्रपटकथा वाटावी, असे होते. ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली.

पुण्यातील गरिबांना उपचार मिळावेत, कुणीही उपचारांविना मरू नये, या उदात्त हेतूने डेव्हिड ससून यांनी हे रुग्णालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला. याच वास्तूमधून नंतर तस्करीचे रॅकेट चालेल किंवा एखादा डॉक्टर पैशांसाठी आपले इमान विकेल, असे स्वप्नातही त्यांना वाटले नसेल. पुण्यातील ससून रुग्णालयाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या देशातील सर्वांत जुने असे हे सरकारी रुग्णालय पुण्यामध्ये १८९७ साली प्लेगची साथ आली, तेव्हाही वैद्यकीय सेवा पुरविण्यास तत्पर होते. १८६३ मध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. १८६७ मध्ये रुग्णालय प्रत्यक्ष सुरू झाले. तेव्हापासून ही वास्तू आणि हा परिसर रुग्णसेवेशी आपले नाते सांगत आहे. पुढे बी.जे. मेडिकल कॉलेजही याच परिसरात सुरू झाले.

डेव्हिड ससून मूळचे बगदादचे. ज्यू. बगदादमध्ये तिथल्या पाशाच्या गैरकारभाराला कंटाळून ते मुंबईत आले. त्यांच्या उद्योगाने इथून साऱ्या जगात विस्तार केला. पारशी समुदायाच्या बरोबरीने त्यांनी आपला उद्योग वाढवला. या ससून यांचे मुंबईबरोबरच पुण्याशीही खास नाते. मुंबईमध्ये ससून डॉक, ससून ग्रंथालय, जिजामाता उद्यान, सिनेगॉग आदींमध्ये त्यांचे योगदान दिसून येते. पुण्यामध्येही ससून रुग्णालयाबरोबरच निवारा वृद्धाश्रम, आशियामधील सर्वांत मोठ्या सिनेगॉगपैकी एक असणारा ओहेल डेव्हिड सिनेगॉग यांच्या निर्मितीमध्ये, निधीमध्ये ससून यांनी पुढाकार घेतला होता. ससून रुग्णालय हे त्यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने, रुग्णालय बांधून पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे पुण्यात निधन झाले.

या ससून रुग्णालयात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी उपचार घेतले आहेत. कोरोना काळातही हे रुग्णालय गरिबांसाठी धावून आले. इथल्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर  हजारो प्रगल्भ डॉक्टर देशाला दिले आहेत. दूर कशाला, महात्मा गांधी यांच्यावरही या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. गांधीजी  येरवडा कारागृहात असताना त्यांना त्रास होऊ लागला. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया येथे करण्यात आली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना वीज गेली आणि कंदिलाच्या प्रकाशात डॉक्टरांनी काम केले. ही घटना १९२४ची. अशा अनेक आठवणी या रुग्णालयाच्या आहेत. जुन्या गॉथिक शैलीतील आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे असे रुग्णालयाचे बांधकाम आहे. मूळ डेव्हिड ससून इमारत नंतर कमी पडू लागली. त्यामुळे त्यांचे नातू जेकब ससून यांनी दुसरी इमारत उभारली. पिढ्यान‌्पिढ्याचा हा ऐतिहासिक वारसा पैशांपुढे लोटांगण घालणाऱ्या यंत्रणेला माहीत तरी आहे का?

तासन‌्तास ओपीडीबाहेर रांगेत थांबणारा रुग्ण एकीकडे आणि पैशांपुढे लाळघोटेपणा करून बड्या बापाच्या मुलाला ‘सेवा’ पुरवणारे नराधम डॉक्टर दुसरीकडे. रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचे निलंबन झाले. मंत्र्यांच्या शिफारशीवरून डॉक्टरांची नेमणूक करणारे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेले. ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर घरी बसले. दीडशेहून अधिक वर्षे रुग्णसेवा बजावणाऱ्या ससून रुग्णालयामधील रुग्ण मात्र त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशी आशा बाळगून आहेत. एखाद्याची आयुष्याची कमाई क्षणार्धात ‘रुग्णालय स्वाहा’ होईल, या भीतीने रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच अर्धमेला होतो. अशा वेळी ससूनसारखी रुग्णालये अजून तरी धीर देतात. रुग्णसेवेचा दीर्घ वारसा सक्षमपणे पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारसह तेथील डॉक्टरांनीही यापुढे कंबर कसली पाहिजे. लाखोंचे शुल्क भरून डॉक्टरकीचे शिक्षण घेताना काही कष्ट मूल्यशिक्षणावरही घेण्याची गरज आहे. पबचालक, पोलिस, आरटीओ, उत्पादन शुल्क अधिकारी, आमदार, मंत्री असे सगळ्यांचे ‘नेक्सस’ समोर आल्यानंतरही वाटले नव्हते, असे प्रचंड दुःख ससूनने सर्वांना दिले. काही लाख रुपयांसाठी जिथे डॉक्टर रक्ताचे नमुनेच बदलतात, त्या संस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? ससूनचा थोर वारसा सांगतानाच, हा आरसा मात्र अस्वस्थ करणारा आहे!

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेLalit Patilललित पाटीलDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हAccidentअपघातDrugsअमली पदार्थ