महात्मा फुले: भारताच्या भविष्याचे उद्गाते, समाजसुधारक, एक दीपस्तंभ, जो अजूनही मार्ग दाखवतोय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:43 IST2026-04-11T11:43:14+5:302026-04-11T11:43:49+5:30
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त...

महात्मा फुले: भारताच्या भविष्याचे उद्गाते, समाजसुधारक, एक दीपस्तंभ, जो अजूनही मार्ग दाखवतोय!
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आज महात्मा फुले यांंचे नाव इतक्या वर्षांनीही आदराने घेतले जाते, अनेक पिढ्या त्यांचे हे ऋण विसरू शकल्या नाहीत याचे कारण समाजासाठी त्यांनी अविरत केलेले अद्वितीय काम. त्यांचे जीवन म्हणजे नैतिक धैर्य, निरंतर जिज्ञासा आणि सामाजिक हितासाठी अविचल वचनबद्धतेचे प्रतीक होते. महात्मा फुले यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या चळवळींनी समाजाला एक वाट दाखवून दिली. आपल्या सांस्कृतिक प्रवासातील त्यांचे योगदान आजही देशभरातील कोट्यवधी लोकांना मिळणाऱ्या शक्तीमध्ये सामावलेले आहे. समाजामध्ये त्यांनी जी आशा जागवली आणि त्यांच्यात जो आत्मविश्वास निर्माण केला, तो त्यांच्या विचारांचा परिपाक आहे.
१८२७ मध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या या महात्म्याने कधीच, कोणत्याच अडचणींचा बाऊ केला नाही आणि त्यातून मार्ग काढला. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी वाटचाल सुरू केली आणि नंतर पहाडाइतके उत्तुंग कर्तृत्व गाजवले. चौकसपणा आणि ज्ञानमिमांसा हा त्यांचा स्थायिभाव होता. आपण जितके जास्त प्रश्न निर्माण करू, तितके ज्ञान त्यातून बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे होते.
आपल्या संपूर्ण जीवनकाळात शिकणे आणि शिक्षण देणे हेच त्यांचे ध्येय बनले होते. शिक्षण आणि ज्ञान, ही कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही, ती एक शक्ती आहे, जी सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, याची त्यांना आत्यंतिक तळमळ होती. ज्या काळात शिक्षणाचा हक्क आणि आनंद अनेकांना नाकारला जात होता, अशा काळात त्यांनी मुलींसाठी आणि ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, अशा सर्वांसाठी पहिल्यांदा शाळा सुरू केल्या. ते म्हणत असत- ‘मुलांमध्ये आईमार्फत होणारी कोणतीही सुधारणा, अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणूनच, जर शाळा सुरू करायच्या असतील, तर त्या मुलींसाठी काढल्या पाहिजेत.’ त्यांनी अशा एका समाजाच्या निर्मितीसाठी काम केले, जिथे शाळा या न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचे माध्यम बनल्या.
शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. महात्मा फुले यांचे ज्ञान आणि शहाणीव यातून त्यांची कृषी, आरोग्य आणि ग्रामविकासाविषयीची समज विकसित झाली होती. आपले शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणारा अन्याय आपल्या समाजाला दुर्बळ करतो आहे, असे ते नेहमी म्हणत असत. गावात असो किंवा शेतात, या घटकांना सामाजिक विषमतेचे चटके कसे सहन करावे लागत आहेत, ते त्यांनी पाहिले होते. म्हणूनच त्यांनी, गरीब, वंचित आणि दुर्बळ घटकांना त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्याचवेळी, सामाजिक सौहार्दसुद्धा कायम राहील, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही, हा त्यांचा आग्रही विचार होता. म्हणूनच त्यांनी हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्थापित केलेली सत्यशोधक समाज ही चळवळ आधुनिक भारतातील सर्वात महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळींपैकी एक होती. सामाजिक सुधारणा, समाजसेवा आणि प्रत्येक माणसाच्या सन्मानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात ही चळवळ आघाडीवर होती. ही चळवळ समाजातील महिला, युवा आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची एक ठोस प्रभावशाली अभिव्यक्ती बनली. जर समाजाने आपल्या गाभ्याशी न्याय, प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर आणि सामूहिक प्रगतीची भावना ही मूल्ये जपली तर तो समाज अधिक सक्षम होऊ शकतो असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता.
महात्मा फुले यांच्या वैयक्तिक जीवनातूनही आपल्याला धैर्याची शिकवण मिळते. सतत कामात व्यग्र असणे, सातत्याने लोकांमध्ये असणे याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. मात्र, प्रकृतीबाबत अत्यंत गंभीर आव्हाने समोर असतानाही त्यांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. अर्धांगवायूच्या गंभीर झटक्याने त्यांना असंख्य मर्यादा आल्या, पण तरीही त्यांनी आपले काम आणि आपले संकल्प साकारण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे शरीर जणू त्यांची सत्त्वपरीक्षाच घेत होते, मात्र समाजाप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. त्यामुळेच आजही लाखो लोकांसाठी, विशेषतः संघर्षातून धैर्य मिळविणाऱ्यांसाठी, महात्मा फुले यांचे जीवितकार्य आजही आदर्शवत आहे. सावित्रीबाई फुले यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय महात्मा फुले यांचे स्मरण पूर्ण होऊच शकत नाही. त्या स्वतः आपल्या देशातील महान सुधारकांपैकी एक होत्या. महात्मा फुले यांचे निधन झाल्यानंतरही सावित्रीबाईंनी हा वसा तसाच पुढे चालू ठेवला. १८९७मध्ये प्लेगच्या साथीचा उद्रेक झालेला असताना त्यांनी बाधित रुग्णांची इतक्या समर्पण भावनेनं सेवा केली की, त्या स्वतः त्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आणि त्यातच त्यांना आपले प्राण गमावावे लागले.
मला २०२२मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते, त्यावेळी मी शहरातील महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शिक्षणासारख्या विषयांप्रति आपल्या बांधिलकीची आपण नव्याने मांडणी करत आहोत, अन्यायाप्रति आपल्या संवेदनशीलतेची पुन्हा नव्याने जाणीव करून देत आहोत. नैतिक स्पष्टता आणि लोककल्याणाचा उद्देश यांची जोड मिळाल्यास, भारतातील सामुदायिक शक्ती चमत्कार घडवून आणू शकते असेच त्यांची जीवनगाथा आपल्याला सांगते. म्हणूनच ते आजही लाखोंना प्रेरणा देत आहेत. त्यांचे शब्द आणि कृतीतून आजही आशेचा किरण डोकावतो. म्हणूनच महात्मा जोतिराव फुले त्यांच्या जन्मापासून दोनशे वर्षांनंतरही भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक आहेत.