महाराष्ट्राचे क्रांतिवीर नागनाथआण्णा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:24 PM2022-07-10T16:24:08+5:302022-07-10T16:26:52+5:30
स्वातंत्र्यानंतर सत्तेचे राजकारण न करता सतत राबणाऱ्या शेतकरी समूहासाठी संघर्ष करणारे नागनाथ नायकवडी यांनी आयुष्यातील सहा दशके शेतकऱ्यांच्या, धरणग्रस्तांच्या, दलित, आदिवासी, शेतमजूर, यांच्या हितासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. या थोर क्रांतिकारकास जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन!
- वसंत भोसले, संपादक लोकमत, कोल्हापूर -
आंध्र प्रदेशाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी-नेहरू आणि काँग्रेसला चिमटा काढण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात काही ठरावीक लाेकांची मक्तेदारी नव्हती, असे मत व्यक्त केले. येत्या १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे अर्थात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्ष असणार आहे. ज्या विचारधारेचा, राजकारणाचा नरेंद्र मोदी यांना अभिमान आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता, याचीदेखील नाेंद करायला हवी. याची चर्चा आता होत राहणार. टीकाटिप्पणी होत राहणार याविषयी वाद नाही. मात्र, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रीय चळवळीने मध्यवर्ती भूमिका बजावली होती हे कोणी नाकारू शकत नाही. इतिहास या विषयाची एक बाजू चांगली असते की, त्यात कोणालाही बदल करता येत नाही. त्याचे विश्लेषण विविध प्रकारे करता येईल. सोयीनुसारही अर्थ काढण्यास संधी मिळेल. मात्र, महात्मा गांधी यांनी अखेरच्या टप्प्यात साऱ्या देशाला स्वातंत्र्यलढ्यात उतरविले हे अमान्य करू शकत नाही.
काँग्रेसशिवायदेखील अनेक गट-तट, संघटना, चळवळी, क्रांतिकारी सेना उभारून ब्रिटिश साम्राज्याला धक्का देण्याचे ऐतिहासिक काम करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र लढा देणारी आझाद हिंद सेना होती. अनेक ठिकाणी छोटे-मोठे गट क्रांतिकारकांच्या सहभागाने इतिहास घडवीत होते. सुभाषचंद्र बोस यांची जडणघडण काँग्रेस पक्षातच झाली होती. स्वातंत्र्याची कल्पना-संकल्पनादेखील काँग्रेसच्या विचारधारेनुसारच होती. लढा देताना हिंसेचा मार्ग स्वीकारायचा की, अहिंसेचा यावर तीव्र मतभेद होते. त्यांनी हिंसेचा मार्ग निवडून भारताला आझाद करण्यासाठी सशस्त्र लढा देणारी सेना उभारली. तीच आझाद हिंद सेना म्हणून नावारूपाला आली.
देशाच्या काेनाकोपऱ्यांत अनेक गट तयार झाले होते. महात्मा गांधी यांचा विचार शिरसावंद्य मानूनही हिंसेच्या मार्गाने लढा देणारे काही गट होते. त्यापैकीच एक सातारचे प्रतिसरकार स्थापन करणारा क्रांतिकारकांचा गट होता. नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा इव्हेंट करायचा असेल; मात्र काँग्रेससह देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांचे स्मरण नको आहे. सातारचे प्रतिसरकार हा आझाद हिंद सेनेसारखाच लढा देणारा मोठा गट क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथआण्णा, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, आदींच्या नेतृत्वाखाली लढत होता. तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील (आताच्या सांगली जिल्ह्यात) कामेरी येथे ३ जून १९४३ रोजी पहिली बैठक झाली होती. ३ जून २०१८ रोजी या प्रसंगाला पंचाहत्तर वर्षे झाली होती. तेव्हा सातारच्या प्रतिसरकारचे कोणालाही स्मरण देखील झाले नाही. आपल्या देशात सहा ठिकाणी क्रांतिकारकांनी प्रतिसरकार स्थापन करून त्या परिसरातून ब्रिटिशांचे शासन उखडून टाकले होते. त्याविरुद्ध अतिशय कठोर कारवाई ब्रिटिशांनी केली आहे. सहापैकी तीन प्रतिसरकारे तातडीने मोडून काढली. महाराष्ट्रातील सातारा, उत्तर प्रदेशातील बलिया आणि पश्चिम बंगालमधील मिदनापूरचे प्रतिसरकार मोडून काढण्यास अवधी लागला. सातारचे प्रतिसरकार एकमेव असे होते की साडेतीन वर्षांनी स्वातंत्र्याची पहाट दिसू लागल्यावर क्रांतिकारकांनी शस्त्रे खाली ठेवली म्हणून ते संपुष्टात आले.
अशा या ऐतिहासिक सातारच्या प्रतिसरकारचा अमृत महोत्सव २०१८ मध्ये आला आणि कोणाच्याही स्मरणात न राहता काळाच्या पडद्याआड निघून गेला. या प्रतिसरकारच्या आघाडीवरचे नेते क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी! त्यांचे जन्म शताब्दी वर्ष उद्याच्या १५ जुलैला आहे. सांगली जिल्ह्यातून संथपणे वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या वाळवा गावी आण्णांचा जन्म नायकवडी या शेतकरी कुटुंबात झाला. (१५ जुलै १९२२). आण्णांचे नव्वद वर्षांच्या आयुष्याचे दोन भाग प्रामुख्याने करता येतील. वयाच्या विसाव्या वर्षात घरच्यांना न सांगता कोल्हापुरात प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमधील घेत असलेले शिक्षण अर्धवट सोडून ९ ऑगस्ट १९४२ च्या मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात हजेरी लावली. महात्मा गांधी यांच्या ‘करो या मरो’ या घोषणेने प्रभावित होऊन परतलेल्या युवकांमध्ये नागनाथआण्णा होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना हैराण करून सोडायचा निर्धार केला. यासाठी शस्त्रे हवीत. शस्त्रांसाठी पैसा हवा. पैशांसाठी सरकारी कचेऱ्या लुटायच्या. ट्रेझरीवर हल्ले करायचे. टपालाने जाणाऱ्या मनिऑर्डरचा खजिना लुटायचा. त्यासाठी रेल्वे थांबवून लुटायच्या. अशा कारवाया सुरू केल्या. स्वातंत्र्य लढ्यातील नागनाथआण्णांची ही पहिली भूमिका आहे. पैसा आणि शस्त्रे मिळाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण आवश्यक होते. त्यासाठी याच नागनाथ या युवकाने दिल्ली गाठली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेना म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात प्रवेश करून ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारण्यास येणार होती. आझाद हिंद सेनेवर कारवाई करण्यासाठी दिल्लीहून शीख रेजिमेंटची बटालियन पाठविली होती. त्या बटालियनच्या जवानांचे कोलकत्याला पोहोचण्यापर्यंत मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेविरुद्ध लढण्यास नकार देऊन बंड केले. (याला खरे बंड म्हणतात.) या सर्व जवानांची धरपकड झाली. दिल्लीला आणून कोर्टमार्शल सुरू झाले. यापैकी काही जवानांना आणून प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांना प्रशिक्षण देता येईल या कल्पनेने नागनाथ हा तरुण एकटाच दिल्लीला गेला. त्यापैकी नानकसिंग आणि मिसासिंग यांना गाठून घेऊनच आले. लुधियाना जिल्ह्यातील या जवानांनी चांदोलीच्या जंगलात प्रतिसरकारसाठी जमलेल्या सुमारे चारशे युवकांना शस्त्रे चालविणे, दारूगोळा बनविणे, तो उडविण्याचे प्रशिक्षण देत होते. त्या प्रशिक्षण शिबिरावर सातारा पोलिसांनी छापा टाकला. तो दिवस होता २५ फेब्रुवारी १९४५! गोळीबार झाला. नागनाथआण्णांसह अनेक युवक अंधारात चकवा देऊन पळाले. मात्र, पंजाबचे नानकसिंग आणि वाळव्याचे किसन अहिर मृत्युमुखी पडले.
कोठे पंजाब, कोठे वारणेचे खोरे! साताराचे प्रतिसरकार स्थापन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेले नानकसिंग यांच्या पार्थिवावर त्याच रात्री सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रांतिकारक प्रसंग सारे विसरले. महाराष्ट्र आणि पंजाबनेही नानकसिंह यांची दोन बंडे विसरली. लुधियाना जिल्ह्यात जन्म आणि वारणा काठच्या सोनवडे येथे मृत्यू! कशासाठी तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी! महाराष्ट्राच्या इतिहासात याची नोंद असती तर २०१८ मध्ये अमृत महोत्सव साजरा झाला असता. पंजाबचे मुख्यमंत्री सुखवीरसिंग मान यांना तरी या इतिहासाची ओळख असेल का? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर नागनाथअण्णांसह अनेक क्रांतिकारकांनी हा लढा निकराने दिला. तुरुंगवास घडला; पण तो तुरुंग फोडून पसार होण्याचे धाडसही या क्रांतिकारी युवकांनी दाखविले. नागनाथ नायकवडी यांनी साताराच्या मध्यवर्ती तुरुंगाची पोलादी चौकट तोडून पलायन केले. (आता स्वतंत्र भारताचे आमदार पलायन करतात.)
स्वातंत्र्यानंतर सत्तेचे राजकारण न करता सतत राबणाऱ्या शेतकरी समूहासाठी संघर्ष करणारे नागनाथ नायकवडी यांचे रूप आणखी तेजाळताना दिसते. आयुष्यातील उर्वरित सहा दशके त्यांनी शेतकऱ्यांच्या, धरणग्रस्तांच्या, दलित, आदिवासी, शेतमजूर, यांच्या हितासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी संघर्ष छेडला. शिक्षणाची दारे गरिबाला खुली झाली पाहिजेत म्हणून काम केले. शेवटच्या टप्प्यात त्यांनी सहकार चळवळ कशी चालविली पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर घालून दिला. वाळव्यात हुतात्मा किसन अहिर यांच्या नावाने साखर कारखाना स्थापन करून स्मारक उभे केले. नानकसिंग यांचे स्मारक सोनवडे येथे शैक्षणिक केंद्र स्थापन करून सुरू केले. लुधियानाहून येथे वारणेच्या खोऱ्यात लढताना जीव सोडणाऱ्या योद्ध्याचे तेवढेच स्मरण शिल्लक आहे. याचे श्रेय वाळव्याच्या शेतकऱ्यांना आणि नागनाथ नायकवडी यांना जाते.
साखर उद्योगास नवे वळण देणारा ‘हुतात्मा पॅटर्न’चा प्रारंभ १९८१ मध्ये त्यांनी केला. लढाऊ स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख होतीच. सहकारी साखर कारखान्याच्या या नव्याने तयार झालेल्या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला. साखरेच्या उत्पादनाचा दर्जा, साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाची काटकसर, उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर, आदींचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून शेतकरी आणि साखर कामगारांना ‘साखर साक्षर’ केले. हुतात्मा साखर कारखान्यात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला साखर उताऱ्याचे महत्त्व पटवून दिले. उसाची लावण, भरणी, तोडणी, वाहतूक, गाळप ते कारखान्याचा काटकसरी व्यवहार याची उत्तम सांगड घातली. साखर कारखान्याच्या उभारणीसाठी काढलेल्या कर्जाचा एकही हप्ता एक दिवसही उशिरा भरला नाही. शेवटचा हप्ता भरून कारखाना कर्जमुक्त झाला तेव्हा सर्व शेतकरी सभासदांच्या घरात जिलेबीचे वाटप करून हा आनंद साजरा करणारा हुतात्मा हा एकमेव साखर कारखाना असेल. आज या कारखान्यात काम करणारा एकही कर्मचारी आता पस्तीस हजार रुपयांपेक्षा कमी वेतनावर नाही. साखर कामगारांना संघटित करून त्यांच्यासाठी वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करणारा एकमेव साखर उद्योगातील नेता नागनाथआण्णाच होते. उसाच्या गाळपाचे उत्तम नियोजन करून उत्पादकता वाढविण्याचे अनेक प्रयोग केले. परिणामी इतर कारखान्यांपेक्षा दोन-तीनशे रुपये प्रतिटन जादा भाव देता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले. सहकारात एक नवा आदर्श घालून दिला.
ज्या धरणांमुळे पाणी मिळाले, उसाचे मळे फुलले, त्या धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडून देता कामा नये, त्यांचे पुनर्वसन शंभर टक्के झाले पाहिजे, यासाठी लढणारा एकमेव साखर कारखाना त्यांनीच उभारला. आण्णांनी उपेक्षित, दलित यांच्याविरुद्ध लढताना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांपासून कधीही फारकत घेतली नाही. धर्मांध राजकारणाच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राॅबिनहूडसारखे होते. सतत फिरत राहणारे घरातून बाहेर पडलेले, स्वत:च्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पेन्शनवर गुजराण करणारे, अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे नागनाथआण्णा नायकवडी! साताराच्या प्रतिसरकारचा शासनाला विसर पडला तसाच विसर या क्रांतिकारकांचा पडू नये, यासाठी सतर्क राहिले पाहिजे, त्यांनी जी जीवनपद्धती स्वीकारली, सार्वजनिक जीवनात वावरताना जी मूल्ये जपली. त्यांचे आजन्म जतन करण्याचा निर्धार पुढील पिढ्यांनी केला पाहिजे. एक व्यक्तिमत्त्व म्हणून आण्णांकडे पाहिले तर अनेक आदर्श वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. १९७२ मध्ये घरदार सोडून शाळेत येऊन एखाद्या ऋषीमुनीसारखे राहण्यास सुरुवात केली. अखेरपर्यंत ते घरी गेले नाहीत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील वाळव्याला आल्या. आण्णांचा सत्कार केला. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना सांगितले की, ते शाळेतच राहतात. साखर कारखाना सुरू झाला की, साखर शाळेत राहतात. तेव्हा प्रतिभाताई पाटील यांनी आण्णांचा हात धरून कार्यक्रमाच्या ठिकाणाहून चालत घरी घेऊन गेल्या. राष्ट्रपतींनी आण्णांचा केलेला हा सन्मानच होता. पण तो प्रसंग सोडला तर आण्णा अखेरच्या श्वासापर्यंत शाळेतच राहिले! या थोर क्रांतिकारकास जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन!
भारत आणि महाराष्ट्र सरकारने प्रतिसरकारचे भव्य असे स्मारक करायला हवे. इतिहासाकडून काही शिकायचेच नसते का? साताराची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि प्रतिसरकारचे केंद्रस्थान आहे. साताऱ्याला भेटणाऱ्या माणसांना या इतिहासाची नोंद आपण एक आदर्श मूल्यांचा वस्तुपाठ म्हणून दाखवायला हवी. साताराच्या प्रतिसरकारचा इतिहास तर ताजा आहे. त्याचाही विसर समाज, शासन आणि प्रशासन तसेच नव्या पिढीला व्हावा, हे दुर्दैव आहे. प्रतिसरकारची लढाई उभी करणारी ही मुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची वंशावळ आहे, त्यांचा मला अभिमान वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफअली यांनी काढले होते. त्या लढ्यातील धगधगते क्रांतिकारक नागनाथ आण्णा होते!