दांडे तेच, पण झेंडे बदलले...मराठवाड्यात असंतोषाचे मतलबी वीर
By सुधीर महाजन | Updated: October 4, 2019 08:05 IST2019-10-04T08:01:01+5:302019-10-04T08:05:02+5:30
एळकोट : असंतोषाचे वारे हे मतलबी वारे ठरते की, खरोखरच उद्रेकाला वाट मोकळी करून देणारे, हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होईल.

दांडे तेच, पण झेंडे बदलले...मराठवाड्यात असंतोषाचे मतलबी वीर
- सुधीर महाजन
दांडे तेच, पण झेंडे बदलले या महाराष्ट्राच्या राजकीय चेहऱ्याचे प्रतिबिंब मराठवाड्यात न पडले तर नवलच. इकडे पण तीच गत आहे. सत्तेच्या सावलीत विसावण्यासाठी भल्याभल्यांनी रांग लावली. जेव्हा प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या त्याचे पडसाद या दोन्ही पक्षात उमटले. निष्ठावान कार्यकर्ते आणि मावळ्यांचा असंतोष उफाळून आला. बंडोबा संतापाची वाफ उतरताच थंडोबा होतात की, मैदानात उतरतात, हे पाहावे लागेल. असंतोषाचे वारे बीड जिल्ह्यात वाहायला सुरुवात झाली आहे. माजलगावमधून रमेश आडसकरांची उमेदवारी जाहीर होताच बऱ्याच दिवसांपासून तयारी करणारे मोहन जगताप नाराज झाले आणि आता कोणत्याही पक्षाकडून लढण्याची भाषा करीत आहेत, तर आष्टीमध्ये भीमराव धोंडेंना उमेदवारी मिळाल्याने सुरेश धससमर्थक नाराज झाले. केजमध्ये संगीता ठोंबरे यांचे तिकीट कापले. त्या कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. केजमधून शरद पवारांनी नमिता मुंदडांची उमेदवारी भरसभेत जाहीर केली होती; पण त्यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडेंच्या या कुरघोडीच्या राजकारणाने रंगत वाढवली असली तरी आपल्याच जिल्ह्यातील हा असंतोष निवडणुकीपूर्वी शमविण्याचे काम त्यांच्यासमोर वाढून ठेवलेले दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हे लोण पसरले. प्रारंभी जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेची वाट धरली. आ. सुरेश धस बाहेर पडले आणि उमेदवारी देऊनही नमिता मुंदडा भाजपवासी झाल्या. या तिघांनीही राष्ट्रवादी सोडताना धनंजय मुंडेंवर खापर फोडले.
असंतोषाचे हे वारे हिंगोली जिल्ह्यातही पोहोचले. युतीचे उमेदवार जाहीर होताच कळमनुरीमध्ये माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे यांनी वेगळी वाट धरण्याची भाषा सुरू करून समर्थकांची जमवाजमव सुरू केली. लातूरच्या औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांना भाजपने उमेदवारी दिली. पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहायक असल्याने भाजप इच्छुकांमध्ये चलबिचल वाढली आणि शिवसैनिकांनी त्यांना साथ दिली. या मुद्यावर पालकमंत्र्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न झाला. सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे पुत्र रोहन यांना तुळजापुरातून लढायचे होते; पण ही जागा राणा जगजितसिंगांना दिल्याने त्यांनी पण असंतोषाचे फलक शहरात झळकावले.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात भाजपने ही जागा सेनेला सोडली आणि गेली ३० वर्षे काँग्रेसचे राजकारण करणाऱ्या अब्दुल सत्तारांना सेनेने उमेदवारी दिली. यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये असंतोष होणे साहजिक होते. भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची भाषा केली. असे मराठवाडाभर असंतोषाचे वारे वाहत आहे. पक्षाचे निष्ठावान पाईक म्हणून आजवर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे अशी प्रतिक्रिया उमटली, त्याचे नवल वाटायला नको; पण सत्तेची शंभर टक्के हमी वाटत असताना डावलले जाण्याचे दु:ख मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी आजवर ज्याला विरोध केला त्याचाच झेंडा हाती घेण्याची वेळ आल्याने हा असंतोष उफाळला. उमेदवारी देताना युतीने जिंकण्याची खात्री असणाऱ्या विरोधी पक्षांतील लोकांना उमेदवारी दिली. अब्दुल सत्तार, नमिता मुंदडा ही काही वानगीदाखल उदाहरणे. गंगापूरमधील सेनेचे माने, पैठणमधील भाजपचे दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जाण्याचे कारण राजकीय संधीचा अभाव आणि सतत डावलण्याचे दु:ख. असंतोषाचे वारे हे मतलबी वारे ठरते की, खरोखरच उद्रेकाला वाट मोकळी करून देणारे, हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होईल.