विस्मृतीत गेलेले पटेल-बोस द्वंद्व
By Admin | Updated: April 22, 2015 00:04 IST2015-04-22T00:04:55+5:302015-04-22T00:04:55+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात भाजपाच्या समर्थकांनी पंडित नेहरुंवर वार करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा काठीसारखा वापर करून घेतला.

विस्मृतीत गेलेले पटेल-बोस द्वंद्व
रामचन्द्र गुहा
(विख्यात इतिहासकार)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात भाजपाच्या समर्थकांनी पंडित नेहरुंवर वार करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा काठीसारखा वापर करून घेतला. आता त्यांनी यात आणखी एका नावाची भर घातली आहे. ते नाव सुभाषचन्द्र बोस यांचे. यातून वैचारिक भूमिकेतील सातत्य आणि इतिहासाचे सच्चेपण असे दोन प्रश्न उत्पन्न होतात. नेहरुंना तुच्छ लेखण्यासाठी कुणी एकाच वेळी पटेल आणि बोस यांचा वापर कसा काय करून घेऊ शकतो?
वल्लभभाई पटेल आणि बोस यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले. वल्लभभार्इंचे थोरले बंधू विठ्ठलभाई यांचे १९३३ साली निधन झाल्यानंतर तर हे संबंध फारच वाईट झाले. विठ्ठलभाईच्या अखेरच्या काळात बोस यांनी त्यांची चांगली शुश्रूषा केली. परिणामी विठ्ठलभाईनी आपल्या मृत्युपत्रामध्ये त्यांच्या संपत्तीचा तीनचतुर्थांश हिस्सा बोस यांना परदेशात भारताविषयीचा चांगला प्रचार करण्यासाठी दान देऊन टाकला. पण वल्लभभाईनी या मृत्युपत्राबाबतच शंका उपस्थित करून न्यायालयात खटला दाखल केला व तो जिंकून सुभाषचंद्र यांना त्या धनापासून वंचित ठेवले.
त्यानंतर पाच वर्षांनी महात्मा गांधी यांनी जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बोस यांचे नाव सुचविले तेव्हा त्याला वल्लभभार्इंनी कडाडून विरोध केला. गांधींनी तो जुमानला नाही व बोस काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर अध्यक्षपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळावा म्हणून १९३९ मध्ये बोस यांनी प्रयत्न सुरू केले. पटेल यांनी याही वेळी त्यांना विरोध केला. पण इतकेच नव्हे तर बोस यांना एक जाहीर इशारा देताना, तुम्ही अध्यक्ष म्हणून निवडून आलात तरी तुमचा एकही धोरणात्मक निर्णय स्वीकारला जाणार नाही, उलट कार्यकारी समिती नकाराधिकाराचा वापर करेल असे ठणकावले.
राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या वल्लभभार्इंच्या चरित्रामध्ये असा एक स्पष्ट उल्लेख आहे की, बोस यांच्या कार्यक्षमतेविषयी वल्लभभार्इंच्या मनात गंभीर शंका होत्या. इतकेच नव्हे, तर दोहोंतील मतभेदही अत्यंत टोकाचे होते. १९३७ साली सत्तेवर आलेले काँग्रेसचे सरकार सत्तेत कायम राहावे अशी पटेलांची इच्छा होती, तर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडून ब्रिटिशांविरुद्ध सरळ युद्ध पुकारावे असे बोस यांचे मत होते. राजमोहन आपल्या पुस्तकात पुढे असेही म्हणतात, की दोहोंच्या मतभेदांमधला आणखी एक मुद्दा म्हणजे महात्मा गांधी. गांधींवाचून काहीही अडणार नाही अशी बोस यांची भूमिका होती, तर गांधी हे अनिवार्य आहेत अशी पटेलांची धारणा होती.
काँॅग्रेस अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या निवडणुकीच्या प्रचारास बोस उतरले तेव्हा पटेल संतप्त झाले. त्यांनी बाबू राजेंद्रप्रसाद यांना एक पत्र लिहिले व त्यात स्पष्टपणे म्हटले की, बोस हे निवडणुकीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जातील असे मला वाटले नव्हते. सुभाषचंद्र यांची फेरनिवड झाली तर देशाची अपरिमित हानी होईल, असेही पटेल यांनी म्हटल्याचा एक उल्लेख सुगत बोस यांच्या ‘हिज मॅजेस्टिज अपोनन्ट’ या पुस्तकात आढळतोे. पटेल नैतिक अध:पात घडवून आणीत आहेत असा प्रत्त्यारोप बोस यांनी याच संदर्भात केल्याचा या उल्लेख पुस्तकात आहे.
पटेल आणि गांधी या दोहोंचा विरोध असतानाही बोस यांची फेरनिवड झाली. त्यांनी पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला. काँॅग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या दृष्टीने ही बाब मोठी अडचणीची ठरली. अशा स्थितीत आपण बोस यांच्याबरोबर काम करूच शकत नाही, असे पत्र पटेल यांनी राजेंद्रप्रसाद यांना दिले. त्यानंतर गांधी आणि पटेल यांनी एकत्र येऊन सुभाषबाबूंच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अनेक अडथळे निर्माण केले व अखेरीस बोस यांना अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाचाही राजीनामा देणे भाग पडले. पटेल आणि बोस यांच्यातील द्वंद्वाचे अत्यंत यथार्थ चित्रण राजमोहन गांधी यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. ते लिहितात, बोस यांच्या मनातला सारा कडवेपणा जणू पटेल यांच्यासाठीच राखीव होता. पण गांधी मात्र याबाबत फारसे कठोर नव्हते.
१९४६ साली मात्र बोस यांच्या बाबतीत पटेल यांची भूमिका मवाळली व सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेला त्यांनी मदतही केली. राजमोहन या संदर्भात लिहितात की, आझाद हिंद सेनेमुळे सुभाषबाबूंची प्रतिमा अत्यंत उंचावली गेली व पटेलांच्या मनातही सुभाषबाबूंच्या शौर्याविषयी आदराची भावना निर्माण झाली होती.
राजकीय मतभेदांखेरीज पटेल आणि बोस यांच्यात टोकाचे तात्त्विक मतभेदही होते. बोस हाडाचे समाजवादी तर पटेल खासगी व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूती बाळगणारे. हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या बाबतीतही पटेलांच्या तुलनेत बोस अधिक सहानुभूती बाळगून होते. आपल्या ‘दी इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात हिंदू महासभेवर कठोर टीका करताना बोस म्हणतात, हिंदू महासभा म्हणजे इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांचा हिंदू अवतार असून, ब्रिटिश सरकारच्या हातातील ते बाहुले बनले आहे. राजकीय चळवळीपासून घाबरून राहणारे आणि सुरक्षित मार्ग शोधणारे अशाच लोकांचा हिंदू महासभेत भरणा आहे. बोस, नेहरू आणि पटेल या तिघांनी अनेक वर्षं तुरुंगात काढली. पण हिंदुत्ववाद्यांनी मात्र तत्कालीन राजसत्तेला कधीही आव्हान दिले नाही. उलट सत्तेशी जुळवून घेण्याचीच भूमिका घेतली. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी.
देशाचे आर्थिक नियोजन आणि निधर्मी तत्त्व या बाबतीत बोस-नेहरू यांच्यात एकवाक्यता आणि गांधींशी बाळगावयाच्या निष्ठबाबतीत मतभेद होते. नेहरू-पटेल यांच्यात मात्र गांधींबाबत एकवाक्यता होती. देश स्वतंत्र व्हावा ही एक बाबवगळता बोस आणि पटेल यांच्यात राजकीय, व्यक्तिगत आणि तात्त्विक असे सारेच आणि टोकाचे मतभेद होते.
या देशातील मुस्लिमाना देशावरील निष्ठा सिद्ध करून दाखवावी लागेल अशी भूमिका बाळगणारे लोक पटेलांच्या चष्म्यातून देशाकडे पाहत असतात. तर ब्रिटिशांच्या वसाहतवादापेक्षा जपानचा वसाहतवाद सौम्य होता, अशी धारणा बाळगणारे बोस यांच्या आडून नेहरूंवर तुटून पडतात. पण एकाच वेळी पटेल आणि बोस यांचा आधार घ्यायचा आणि नेहरूंवर वार करायचे हा शुद्ध राजकीय संधिसाधूपणा तर आहेच, पण ती बुद्धिभ्रष्टताही आहे.