निर्वासितांकडे वेगळ्या दृष्टीने पाहताना
By Admin | Updated: September 19, 2015 04:37 IST2015-09-19T04:37:30+5:302015-09-19T04:37:30+5:30
युरोपात दररोज दाखल होणारे निर्वासितांचे लोंढे नवनव्या समस्या उभ्या करीत आहेत. सुरुवातीला त्यांना विरोध करणारे आणि त्यांच्या मार्गात अडथळे उभे करणारे हंगेरी व जर्मनीसारखे देश आता

निर्वासितांकडे वेगळ्या दृष्टीने पाहताना
- प्रा.दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)
युरोपात दररोज दाखल होणारे निर्वासितांचे लोंढे नवनव्या समस्या उभ्या करीत आहेत. सुरुवातीला त्यांना विरोध करणारे आणि त्यांच्या मार्गात अडथळे उभे करणारे हंगेरी व जर्मनीसारखे देश आता अगदी नाईलाज म्हणून का होईना त्यांना स्वीकारायला तयार झालेले दिसत आहेत. मृतावस्थेत किनाऱ्यावर पडलेल्या आयलानचे फोटो जगभरात पसरल्यावर सहानुभूतीची जबरदस्त लाट जाणवायला लागली आणि त्यामुळे अनेक देशांचा निर्वासितांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मवाळ झाला आहे. इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांनीही एका मर्यादेत निर्वासितांना स्वीकारायची तयारी दाखवली आहे.
पण याच वेळी एक अस्पष्टसा शंकेचा सूर उमटू लागला आहे. निर्वासितांच्या नावाखाली आपल्या देशात इसिसचे अतिरेकी दहशतवादी घुसतील अशी भीती आता व्यक्त व्हायला लागली आहे. लेबेनॉन आणि जॉर्डनच्या भेटीवर असणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांना लेबेनिज शिक्षण मंत्री इलियास बाऊ साब यांनी याबद्दल स्पष्ट इशाराच दिला आहे. इंग्लंडमधल्या ‘द इंडिपेंडंट’ने याबद्दलचे एक वार्तापत्रही प्रसिद्ध केले आहे. आपल्याजवळ याबद्दलची पक्की माहिती नसली तरी येणाऱ्या निर्वासितांमध्ये अनेक गट संशयास्पद दिसत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तुर्कस्थान आणि ग्रीसच्या मार्गाने इसिसशी अतिरेकी युरोपात घुसण्याचा प्रयत्न करीत असावेत असा त्यांचा अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी लेबेनॉनमध्ये सैनिकांना पळवून नेणारे अतिरेकी निर्वासितांच्या छावण्यांमधून बाहेर पडले होते, असे सांगून त्यांनी निर्वासित आणि इसिसच्या दहशतवाद्यांमधल्या संबंधांवर बोट ठेवले होते.
याबद्दल त्यांनी पोप फ्रान्सीस आणि ब्रिटनमधल्या इंडिपेंडंट पार्टीचे नेते निगल फराज यांच्या मतांचा हवाला दिला आहे.
इंग्लंडमधल्याच ‘द टेलिग्राफ’ने निक स्क्वेअर्स यांनी रोमहून पाठवलेली पोपची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात निर्वासितांच्या संदर्भातली त्यांना जाणवणारी भीती व्यक्त झाली आहे. इटलीपासून फक्त दोनशे मैलांवर जगातले सर्वात भयावह दहशतवादी गट कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या घुसखोरीची शक्यता नजरेआड करता येत नाही. त्यातच युरोपातही इस्लामी आणि इतर दहशतवादी गट सक्रीय झाले आहेत. त्यामुळे सिरीया, लिबिया, भूमध्य समुद्रातून उत्तर आफ्रिका आणि तुर्कस्तानच्या मार्गांनी युरोपात दाखल होत असलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांमधून इसिसचे काही दहशवादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा धोका गंभीर आहे. व्हॅटिकन आणि रोमवर अतिरेक्यांचा रोख असू शकेल का, असे विचारल्यावर पोपने सांगितले की होय, अशा हल्ल्याच्या धोक्यांपासून रोम सुरक्षित राहील असे कुणीच सांगू शकणार नाही. युरोपात दाखल होत असलेले निर्वासित ज्या संघर्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत तो संघर्ष हे हिमनगाचे केवळ टोक आहे, असे सांगून पोपनी अतिशय खराब, वाईट आणि अन्याय्य सामाजिक आणि आर्थिक स्थिती हेच यामागचे कारण असल्याचे सांगितल्याचेही या वार्तापत्रातून समजते.
‘वर्ल्ड नेट डेली’ या अमेरिकेतल्या वेबवार्तापत्रात याच आशयाचे वृत्त ब्रिटनमधले कट्टरपंथीय मुस्लीम धर्मगुरू अंजाम चौधरी यांच्या हवाल्याने दिले आहे. त्यात ते म्हणतात, जे इसिसच्या नजरेत शत्रू आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी अशाच एखाद्या मार्गाचा वापर इसिस सहजपणे करू शकेल. कदाचित आतापर्यंत असे व्हायला लागलेही असेल. युरोपमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी सिरीयन निर्वासित सहाय्यकारी ठरत आहेत का, असे विचारल्यावर चौधरी म्हणाले की, इस्लाम हा सर्वात वेगाने पसरत जाणारा धर्म आहे. सिरीयन निर्वासितांमुळे त्या वाढीचा वेग काहीसा वाढेल इतकेच.
काहीसे अशाच प्रकारचे विश्लेषण ‘वेस्टर्न जर्नालिझम’ या वेबवृत्त देणाऱ्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळते. त्यानुसार आज निर्वासितांना स्वीकारणाऱ्या देशांमध्ये केवळ वीस टक्के सिरीयन निर्वासित जबरदस्त दहशत निर्माण करायला पुरेसे आहेत. रँडी डीसोटो यांच्या वार्तापत्रात ओआरबी इंटरनॅशनल या ब्रिटीश संस्थेने सिरियात १० जून ते २ जुलै या काळात घेतलेल्या एका जनमत चाचणीचा तपशील वाचायला मिळतोे. त्यात लोकांनी व्यक्त केलेली मते विचार करायला लावणारी आहेत. निर्वासितांपैकी दर पाच जणांपैकी एका (म्हणजे वीस टक्के) सिरीयन नागरिकाच्या मते सिरीयाला इसिसमुळे लाभच झाला आहे. इसिस म्हणजे अमेरिकेने निर्माण केलेला एक दहशतवादी गट आहे, असा सिरीया आणि इराणमधल्या ऐंशी टक्के लोकांचा समज आहे. इसिसच्या कारवायांना पाठिंबा आहे, त्याला बशर अल असदच्या सिरीयातल्या जुलमी राजवटीची आणि इसिसने त्या राजवटीच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईची पार्श्वभूमी आहे हे नक्की. असदच्या राजवटीने गांजलेल्यांना इसिसच तारणहार वाटतो आहे. त्याच वार्तापत्रात लेबेनॉनच्या शिक्षण मंत्र्यांचे सुरुवातीला सांगितले मतही वाचायला मिळते. लेबेनॉनमध्ये जवळपास दहा लाख सिरीयन निर्वासित आहेत. तिथे सैनिकांना पळवून नेण्यासारख्या कारवाया त्या निर्वासितांपैकी दहशतवाद्यांशी संबंध असणारे अतिरेकी करीत असतात असेही साबांनी सांगितलेले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आता मर्यादित का होईना काही सिरीयन निर्वासिनांना स्वीकारणार आहे, हे पाहता तिथल्या नागरिकांना त्या निर्वासितांमध्ये घुसून इसिसचे अतिरेकी दहशतवादी आपल्या देशात येतील अशी भीती वाटते आहे. त्यामुळे ओबामा प्रशासनाने निर्वासितांना घेताना त्यांची योग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे लोकांचे मत आहे. निर्वासितांमध्ये काही जण दहशतवादी असल्याचे लक्षात आल्यामुळे निर्वासितांना हंगेरीत पोलिसांनी रोखल्याचे वृत्त ‘रॉयटर’नेही दिले आहे. यातूनच सिरीयन निर्वासितांपैकी केवळ सिरीयन ख्रिश्चन निर्वासितांनाच आपल्याकडे येऊ द्यावे अशी मागणीही व्हायला लागली आहे. आपण केवळ ख्रिश्चन निर्वासितांनाच येऊ देऊ असे स्लोव्हाकीयाने जाहीर केल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे, तर राष्ट्रपती पदाचे इच्छुक असणारे जेफ बुश यांनी जर निर्वासित ख्रिश्चन धर्मीय असतील आणि त्यांच्या जीवाला धोका असेल तर(च) अमेरिकेने त्याचा स्वीकार करावा असे मत मांडले असल्याचे ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’च्या वृत्तात वाचायला मिळते. एकूणच आयलानच्या दुर्घटनेमुळे निर्वासितांच्या संदर्भात सहानुभूतीची लाट निर्माण झाल्यासारखे वाटत असले तरी त्याला दहशतवाद्यांबद्दल वाटणाऱ्या भीतीची झालर आहे. जिहादी विचारांना विरोध करणाऱ्या अनेक संकेतस्थळांपैकी एक ‘बेअर नेकेड इस्लाम’ या संकेतस्थळाने प्रकाशित केलेले हे व्यंगचित्र याच चिंतेचे निदर्शक आहे.