द. कोरियातले एकेकटे लोक पाळतात 'दगड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 07:57 AM2024-05-15T07:57:11+5:302024-05-15T07:57:43+5:30

दक्षिण कोरियामध्ये दगडाला जणू काही आपला सोबती, जिवंत व्यक्ती समजलं जातं.

lonely people in south korea keep stones | द. कोरियातले एकेकटे लोक पाळतात 'दगड'

द. कोरियातले एकेकटे लोक पाळतात 'दगड'

आपल्या लेखी दगडाला किंमत काय? निर्जीवच तो. एखाद्याला आपण पाषाणहृदयी म्हणतो. दगड आपल्यासाठी इतका असंवेदनशील आहे. पण जगभरात सगळीकडेच दगडाला या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही.. दक्षिण कोरियामध्ये दगडाला जणू काही आपला सोबती, जिवंत व्यक्ती समजलं जातं.

३३ वर्षांची कू अह यंग हिच्या लेखी दगड म्हणजे तिचा जिवाभावाचा सखा सोबती. ती सेऊल येथे एका ठिकाणी नोकरीला लागली. काही दिवसांतच कामाच्या ठिकाणचा ताण आणि एकटेपणा तिला असह्य होऊ लागला. त्यावर उपाय म्हणून तिने घरी 'पेट रॉक' आणला. म्हणजे पाळीव दगड. 'बैंग बैंग इ' हे त्या पेट रॉकचं नाव. रोजच्या संघर्षात, कामाच्या ताणात तिला तिच्या पेट रॉकचाच काय तो आधार वाटतो. ती तर आपल्या पेट रॉकला चालायला, जिमला जातानाही सोबत घेऊन जाते.

कोरोना काळात कामाची पद्धत बदलली. वर्क फ्रॉम होम सुरू झालं. काम तर होत होतं, पण घरी बसून एकटेपणा वाढला होता. २९ वर्षांच्या लिमलाही असाच एकटेपणा जाणवत होता. घरी एकट्याने बसून काम करताना तिला आपल्याबरोबर कोणीतरी असावं असं वाटलं आणि तिने पेट रॉक घरी आणला. या पेट रॉकमुळे तिचं एकाकीपण कमी झालं. तिने आपल्या या पेट रॉकसाठी बसण्यासाठी झोपण्यासाठी स्वतंत्र जागा केली होती. झोपण्याच्या वेळी लिम पेट रॉकला गादीवरून उचलून आपल्या कुशीत घेते, त्याला थोपटते. त्याच्याशी गप्पा मारते.

ली सो ही ३० वर्षांची संधोधक. ती तर आपल्याकडील पेट रॉकला आपली मुलगी मानते. तिने तिचं नाव 'हाँगडुगे' ठेवलं आहे. पेट रॉक निर्जीव आहे, तो आपल्या भावना समजू शकत नाही हे तिला मान्य आहे. पण त्यांच्याशी बोलून मन मोकळं केल्याचा आनंद मिळतो. जो आनंद आपल्याला कुत्री-मांजरी यांच्याशी गप्पा मारताना मिळतो अगदी तसाच.

कू, लिम, ली ही तर केवळ प्रातिनिधिक उदाहरणं दक्षिण कोरियात लाखो लोकांनी आपल्या घरी पेट रॉक्स आणले आहेत. ते आपल्या पेट रॉक्सना जीव लावतात. त्यांना टोपणनावं देतात, आपल्या हाताने त्यांना सजवतात. आपल्या पेट रॉक्सचं हे कौतुक ते सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकून व्यक्त करतात. सोशल मीडियावरील पेट रॉक्सच्या पोस्टमुळे तर दक्षिण कोरियात पेट रॉक्सची लोकप्रियता खूपच वाढली.

दक्षिण कोरियातील लोकांसाठी हे पेट रॉक्स निर्जीव दगड नाहीत. हे पेट रॉक्स या देशातील लाखो लोकांसाठी कामाचा, पैशांचा ताण घालविण्यासाठीचा एक सुखद आणि आरामदायी सोबती आहे. कामावरून घरी आल्यावर आपल्या पेट रॉकला भेटल्यावर, त्याला हातात घेतल्यावर, त्याचा मऊ, गुळगुळीत स्पर्श अनुभवल्यावर, त्याला मनातल्या गोष्टी सांगितल्यावर लोकांच्या मनावरचा ताण हलका होतो. कोविड-१९ नंतर घरात एकट्याने राहण्याची संख्या दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे एकटेपणाही वाढला. हा एकटेपणा घालवण्यासाठी या लोकांना पेट रॉक्सचा मोठा आधार वाटतो.

दक्षिण कोरिया संपूर्ण आशियातला एकमेव देश आहे जो नोकरदारांकडून अति काम करून घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. याबाबतीत जगात दक्षिण कोरियाचा पाचवा क्रमांक लागतो. अति कामाच्या संस्कृतीने लोकांमध्ये ताण आणि एकटेपणाही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. दक्षिण कोरियाच्या कुटुंब मंत्रालयाच्या अहवालानुसार १९ ते ३९ वयोगटातील एकूण ३.१ टक्के युवक एकटे आणि एकाकी आहेत. कामाचा ताण आणि एकटेपणा यामुळे त्यांना मानसिक समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे. 

याच कारणामुळे दक्षिण कोरियातील तरुणांमध्ये पेट रॉक्सची 'क्रेझ' मोठ्या प्रमाणात आहे. पेट रॉक्स म्हणने स्वस्तात मस्त उपाय आहे. ५ ते ११ डॉलर्सला छोटे, गोल, गुळगुळीत पेट रॉक्स मिळतात. लोकांची पेट रॉक्सची गरज वाढत आहे, त्यामुळे पेट रॉक्स विकणाऱ्यांचं मार्केटही तिथे खूप तेजीत आहे. शेवटी माणसाला जो सुख-आनंद-समाधान देतो, सतत सोबत राहून आश्वस्त करतो, तोच प्रिय असतो. केवळ याच कारणामुळे दक्षिण कोरियातील लोकांचा दगडांवर जीव जडला आहे.

दगडांचे दिवस बदलले!

पाषाण युगापासूनच दक्षिण कोरियात दगडांना फार महत्त्व. निसर्गातील सर्वात ताकदवान घटक म्हणून दगडांकडे पाहिलं जायचं. त्यामुळे सार्वजनिक उद्यानात, छोट्या बागांमध्ये दगडांची विशिष्ट रचना केलेली असायची. त्यापुढच्या काळात दगड हे शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं. दक्षिण कोरियाची आर्थिक भरभराट जशी व्हायला लागली, तसा दगड हा दक्षिण कोरियात शुभ मानला गेला. आता दक्षिण कोरियात दगड हा केवळ प्रतीक नसून, जगण्यात आनंद मिळण्याचं माध्यम झाला आहे.

 

Web Title: lonely people in south korea keep stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.