लोकमत 'वसंतोत्सव'... संगीत सम्राट वसंत देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 18:09 IST2018-03-07T18:09:11+5:302018-03-07T18:09:26+5:30
तसेच अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. अनेक लघुपटांनासुद्धा संगीत दिले होते. बालभारती पाठ्यपुस्तकातील अनेक कवितांना उत्कृष्ट व लोकप्रिय चाली लावून संगीत दिले.

लोकमत 'वसंतोत्सव'... संगीत सम्राट वसंत देसाई
- रवींद्र वासुदेव गाडगीळ
काल आपण संगीत सम्राट स्व. वसंत देसाईंचा अलौकिक स्वरांचे किमयागार वसंत देसाई या लेखाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट संगीताचा शाही नजराणा बघितला. आता मराठी चित्रपट संगीत (१९४७ ते १९७६) :
'लोकशाहीर राम जोशी', 'साखरपुडा', 'क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके', 'अमर भूपाळी', 'ही माझी लक्ष्मी', 'माझी जमीन', 'श्यामची आई', 'कांचन गंगा', 'ये रे माझ्या मागल्या', 'उमाजी नाईक', 'बाळ माझा ब्रह्मचारी', 'छोटा जवान', 'मोलकरीण', 'स्वयंवर झाले सीतेचे', 'इये मराठीचिये नगरी', 'धन्य तो संताजी धनाजी', 'लक्ष्मण रेषा', 'बायांनो नवरे सांभाळा', 'राजा शिवछत्रपती', 'तूच माझी राणी'
इंग्रजी : 'शकुंतला', 'द सॉंग ऑफ बुद्ध', 'अव्हर इंडिया', 'मान्सून', 'द टायगर अँड प्लेन'
बंगाली : 'अमर भूपाळी'
गुजराथी : 'मोटी'
कन्नड : 'चिन्नड़ कलश'
नाट्यसंगीत (१९६० ते १९७५ ) : 'पंडितराज जगन्नाथ', 'सीमेवरून परत जा', 'बहुरूपी हा खेळ असा', ' संगीत तानसेन', ' जय जय गौरीशंकर', 'अवघी दुमदुमली पंढरी', 'भावना', 'गीत सौभद्र', 'प्रीतिसंगम', 'देव दीनाघरी धावला', 'शाबास बिरबल शाबास', 'महाराणी पद्मिनी', 'गीत गाती ज्ञानेश्वर', 'झेलमचे अश्रू', 'शिवराय कविभूषण', 'संत सखू', 'शिवदर्शन', 'मृत्युंजय', 'संत तुकाराम', 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'होनाजी बाळा', 'दुरितांचे तिमिर जावो', 'देणाऱ्याचे हात हजार', 'वाऱ्यास मिसळले पाणी', 'अवघा आनंदी आनंद', 'लहानपण देगा देवा'...
तसेच अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. अनेक लघुपटांनासुद्धा संगीत दिले होते. बालभारती पाठ्यपुस्तकातील अनेक कवितांना उत्कृष्ट व लोकप्रिय चाली लावून संगीत दिले. फैय्याज, जयवंत कुलकर्णी, के. जयस्वाल, प्रभाकर नागवेकर, वाणी जयराम, बाळ देशपांडे, साधना घाणेकर ह्या गायकांकडून ती गाणी गाऊन घेतली. 'वसंत स्वरप्रतिष्ठान' महाराष्ट्र पुरस्कृत हा जीवनपट मधु पोतदार ह्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या लिहिला आहे. संगीतातील उत्कृष्ट संयोजक आणि रचनाकार! आयुष्यभर त्यांनी संगीतातून भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्गांचा प्रपंच केला. संगीतासाठी वसंतरावांनी खऱ्या अर्थाने आयुष्य झोकून दिले. अविवाहित राहिले. त्यांचे जीवनात एक सुरेल रागिणी होती. ती छेडायला विणेसारखे दुसरे समर्थ वाद्य नाही, मह्णून ही 'वसंत वीणा'! साने गुरुजींनी वसंत रावांच्या हातात मोगऱ्याचा गजरा बांधला, तेव्हापासून त्या मोगऱ्याच्या सुगंधाने त्यांचे सारे जीवनच व्यापून टाकले. आयुष्यभर सूर आणि सुगंधाची लयलूट केली. अविवाहित असलेले वसंतराव अधिक प्रापंचिक आणि कुटुंबवत्सल होते.
१९७५ मध्ये इजा, बीजा आणि तिजा असे अभिजात भारतीय संगीतकार एका पाठोपाठ हिरावून नेले. संगीतकार मदन मोहन, संगीतकार सचिन देव बर्मन आणि सूर सम्राट वसंतराव देसाई. चित्रपट संगीत सृष्टीच्या इतिहासातील एक काळेकुट्ट पान!
वसंतराव निर्व्यसनी होते. कसलीही व्याधी जडण्याची त्यांना शक्यता नव्हती. तरीसुद्धा त्यांना अंतर्ज्ञान शक्ती होती, हे त्यांनी अनेकदा मृत्यूपूर्व काही दिवसांमधून बोलण्यातून आणि कृतीतून केलेल्या आवरा-आवरीवरून कळून चुकते. परंतु, कोणालाच अंदाज आला नाही,की त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. तेव्हा ते पेडर रोड येथे राहत होते. एरव्ही सावध आणि सतर्क राहणारे त्यांच्या इमारतीमधील नादुरुस्त लिफ्ट मध्ये अडकून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सिनेसृष्टीला, रसिक श्रोत्याला जबरदस्त धक्का बसला.
त्यांच्या अंत्ययात्रेत तत्कालीन मुख्यमंत्री मा. शंकरराव चव्हाण, मधुकरराव चौधरी, सुशीलकुमार शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, चित्रपती व्ही. शांताराम, जी.पी. सिप्पी, जे.बी. एच. वाडिया, आधुनिक वाल्मिकी गदिमा, संगीतकार सी. रामचंद्र, नौषाद, कल्याणजी-आनंदजी, सलील चौधरी, सुधीर फडके, संगीतकार रवी, जयदेव, एन. दत्ता, श्रीनिवास खळे, ह्रिषीकेश मुखर्जी, यश चोप्रा, कवी गुलजार, दत्ता धर्माधिकारी, आशा भोसले, उषा मंगेशकर, महेंद्र कपूर, अभिनेत्री दुर्गा खोटे, संध्या, नायक रमेश देव, दादा कोंडके, भालचंद्र पेंढारकर, शाहू मोडक, धुमाळ, विश्राम बेडेकर, संगीत भूषण राम मराठे, संगीतकार यशवंत देव, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (तत्कालीन मंत्री), प्रभाकर कुंटे, मधुसूदन वैराळे, तत्कालीन महापौर सुधीर जोशी, दाजी भाटवडेकर, नाटककार विद्याधर गोखले, वामनराव देशपांडे, जयवंत कुलकर्णी.... एवढे मोठमोठे दिग्गज चक्क रस्त्यावर त्यांच्या पेडर रोड ते गिरगावातील चंदन वाडीतील विद्युतदाहिनी पर्यंत अंत्य यात्रेत होते.
तेवढेच श्रद्धांजली कार्यक्रमात, तेवढेच संगीत श्रद्धांजली कार्यक्रमात! एवढेच नाही, तर अस्थी कलशाच्या पेडर रोड ते शिवाजी पार्कच्या मिरवणुकीतही! परत वर्षभर व प्रथम स्मृतीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमातही तेवढेच मित्र, नट, संगीतकार, बालचमू, विद्यार्थी, सहकारी आणि रसिक श्रोते जन. एवढे थोर भाग्य आजपर्यंत मृत्युनंतरही कोणाच्याच वाट्याला आले नाही. एवढा मोठा अफाट जनसंपर्क, एवढी मोठी लोकप्रियता. आजही इतकी वर्ष होऊनही त्यांच्या 'वसंत वीणा'चे झंकार प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या हृदयात उमटत आहेत. तसेच संगीताचा सुगंधी सूर मनात दरवळतोय आणि तो कायम राहील. अशी थोर स्वर-पुण्याई.
ravigadgil12@gmail.com