थरूर यांचा पक्ष कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:39 IST2025-05-19T11:38:55+5:302025-05-19T11:39:22+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे!

Lokmat editorial What is Tharoor's party | थरूर यांचा पक्ष कोणता?

थरूर यांचा पक्ष कोणता?

शशी थरूर कोणत्या पक्षाचे? सुप्रिया सुळे यांचा पक्ष कोणता? श्रीकांत शिंदे यांची राजकीय भूमिका कोणती? हे खासदार वेगवेगळ्या पक्षांचे. मात्र, देश म्हणून आज हे सर्व जण एकत्र आलेले आहेत. असे सुमारे ४० खासदार आता भारताची भूमिका जगभर पोहोचविणार आहेत. पाकिस्तानचे मनसुबे उधळण्यासाठी सर्वपक्षीय खासदार एकवटले आहेत. याचे नेतृत्व आहे ते शशी थरूर यांच्याकडे. ‘युनायटेड नेशन्स’मध्ये अगदी वरिष्ठ पदांवर काम केलेले थरूर हे जागतिक कीर्तीचे लेखक आणि अभ्यासक. त्यांचा पक्ष कोणता, याचा विचारही न करता सरकारने या मोहिमेचे नेतृत्व त्यांच्याकडे द्यावे, हे आश्वासक. ‘आम्हाला विचारलेही नाही,’ अशी  काँग्रेसची खळखळ असली तरी त्याला काही अर्थ नाही. मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे आणि म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत त्याचा नायनाट करण्यासाठी  भारताने रणनीती आखली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, संसदीय कामकाज मंत्रालय परदेशात शिष्टमंडळे पाठविणार आहे.

दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी हे खासदार जगभर जाणार आहेत. देशातील सर्व राजकीय पक्षांतल्या ४० खासदारांची फौज सात गटांत विभागली जाणार आहे. विविध देशांत जाऊन ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल भूमिका मांडत ते पाकिस्तानचा पर्दाफाश करतील. या शिष्टमंडळातील खासदारांची निवड करताना पक्ष विचारात घेतला गेला नाही. त्यामुळेच तर इथे असदुद्दीन ओवैसी आहेत आणि प्रियांका चतुर्वेदीदेखील आहेत. युद्ध केवळ सीमेवर लढले जात नाही, तर ते ‘डिप्लोमसी’च्या स्तरावरही लढले जात असते. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ तर फत्ते केलेच; पण, पुढच्या युद्धासाठीही भारत तेवढाच सज्ज झाला आहे. आंतराष्ट्रीय समुदाय या युद्धात अधिक महत्त्वाचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात भारताची भूमिका न्याय्य आणि समंजस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते फाळणीचा व्रण घेऊनच. सर्व धर्म आणि अनेक भाषा या वैविध्यावर भारत ठामपणे उभा राहिला. एकाच धर्मावर उभा राहिलेला पाकिस्तान मात्र दुभंगला. असा धुमसणारा शेजार हे भारताचे प्राक्तन. पाकिस्तानने प्रत्येकवेळी काही नवे ‘मित्र’ मिळविण्याचा प्रयत्न केला. सोव्हिएत रशिया विरुद्ध अमेरिका या शीतयुद्धात अमेरिकेने पाकिस्तानचा उपयोग करून घेतला. जगभरात ठिकठिकाणी लष्करी तळ निर्माण करणाऱ्या अमेरिकेने दक्षिण आशियात पाकला वापरले.

पुढे या विळख्यात पाकिस्तान एवढा जखडला गेला की तो पुढे जाऊच शकला नाही. आता भारताचे भय वाटणारा चीन पाकिस्तानचा वापर करून घेताना दिसतो. अशावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडणे अतिशय आवश्यक आणि अपरिहार्य आहे. पाकिस्तानचे मनसुबे काय आहेत, हे लपून राहिलेले नाही. दहशतवादाला पोसण्याचा प्रयत्न पाकने आजवर कसा आणि कितीवेळा केला हे जगजाहीर आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात नुकतेच प्रत्यार्पण झाले. २६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील तो दहशतवादी हल्ला जग कधीच विसरू शकणार नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर केलेला तो भीषण हल्ला होता. ज्या पाकिस्तानने तेव्हा हे घडवले, ते ‘पठाणकोट’, ‘उरी’, ‘पुलवामा’, ‘पहलगाम’च्या घटनांनी अधोरेखित केले. पाकिस्तानचा हा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठीची ही मोहीम फार महत्त्वाची आहे. २२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून एक कडक संदेश दिला. मुळात, पाकिस्तानला अद्दल घडवल्यानंतर संपूर्ण देशाला हे सांगितले कोणी? कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी! पाकिस्तानवर खरा हल्ला हाच आहे. धर्म-भाषा-पक्ष विसरून एकसंधपणे उभा ठाकलेला भारत आज दिसतो आहे. आता दहशतवादविरोधी लढाईचे रणशिंग फुंकायला हवे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे!

Web Title: Lokmat editorial What is Tharoor's party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.