चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 13, 2025 11:57 IST2025-08-13T11:55:38+5:302025-08-13T11:57:38+5:30

भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तिणीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जाताहेत का ?

Let's fly the pigeons! Are we going to destroy science and conscience in the name of kindness to all creatures? | चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

मुंबईसारख्या महानगरातील शांतताप्रिय नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणे आणि सगळी कामं बाजूला सारून दाणे टाकण्यास सरकारला बाध्य करणे, हे वाटते तितके सोपे काम नाही; पण शांततेचं प्रतीक आणि प्रेमाचा संदेशवाहक असलेल्या कपोतांनी (कबुतरांनी) ही किमया करून दाखवली आहे! आपल्या राजकीय निष्ठा आणि विष्ठांनी महानगरांना आणि पर्यायाने नागरिकांना वेठीला धरण्याचा मक्ता आजवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या नावे होता. यात आता कबुतरांची भर पडली! हा तर माणसांच्या संगतीचा, पंक्तीचा आणि सहवासाचा परिणाम असू शकतो. मुंबईत राहून कबुतरांना एवढे शहाणपण तर आलेच असेल. आपल्या हक्कांसाठी उगीच एखाद्याच्या दारात तिष्ठत बसण्यापेक्षा फडफड करून त्यांची झोपमोड केल्याखेरीज अथवा विष्ठा करून जगणे मुश्कील केल्याशिवाय कोणालाच जाग येत नाही, हा ‘कबुतरी’ धडा मराठी माणसांनी शिकण्यासारखा आहे. राज्यातील जनतेचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून सरकार कबुतरांसाठी धडपड करत आहे. यावरून या सजीव पक्ष्याची महत्ता राजकीय पक्षांहून अधिक असल्याचे अधोरेखित होते.

पूर्वी मुंबईत सगळीकडे झाडी होती, त्यावर कावळ्यांचं राज्य होतं. दादर, परळ, लालबाग, विलेपार्ले इथे मराठी माणसांचा वावर होता. गिरणी कामगारांच्या चाळींमध्ये पितृपक्षात कावळ्यांना मिष्ठान्न मिळायचं आणि तेही पिंडीवर गपगुमान बसून आपली भूमिका बजावायचे; पण गिरण्या बंद झाल्या. झाडं तोडली गेली. टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या. मराठी माणूस उपनगरांतून बाहेर फेकला गेला. कावळे परांगदा झाले. आणि या निर्वासनाच्या पोकळीत कबुतरांनी घर केलं! आज दादरमधून मराठी माणूस हद्दपार झाला असला, तरी कबुतरखाना मात्र शाबूत आहे. दाणे टाकणाऱ्या श्रीमंतांच्या पुण्यकर्मांवर तो टिकून आहे. तुम्ही कितीही उपद्रवी असाल. जर तुमच्यामागे धनशक्ती असेल, तर तुमचं पंखही कोणी वाकडं करू शकत नाही, हा धडा कबुतरांनी शिकवला आहे.

प्रश्न केवळ मुंबईतील कबुतरांचा अथवा कोल्हापुरातील हत्तींचा नाही, तर त्या खेळात गुंतलेल्या भावना, श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा वापर करून सामान्य माणसाच्या विवेकावर अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जातात. कबुतरांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले तरी चालेल, आमच्या पुण्यकर्माच्या आड कोणी येता कामा नये, असा आग्रह कसा काय धरला जातो? कपोतांना दाणापाणी हे पुण्यकर्म कुठल्या धर्मग्रंथात सांगितले आहे?

जॉर्ज अर्वेल यांच्या ‘ॲनिमल फार्म’ या राजकीय रूपककथेत सुरुवातीला सत्तेवर आलेले प्राणी ‘आपण सर्व समान आहेत’ अशी घोषणा करतात; पण सत्ता स्थिरावत जाते, तसतसे नियम बदलतात. आणि शेवटी संविधानात बदल होतो की,“काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत!” कबुतरांच्या बाबतीत हेच तर होतंय. या जंगलातून बाहेर पडायचं असेल, तर बुद्धीवादी वर्गाने विवेक, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. नाहीतर उरतात फक्त दाणे, विष्ठा आणि फडफड...

Web Title: Let's fly the pigeons! Are we going to destroy science and conscience in the name of kindness to all creatures?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.