दिल्लीचा धडा!

By रवी टाले | Published: February 12, 2020 02:30 PM2020-02-12T14:30:23+5:302020-02-12T14:33:12+5:30

निवडणुकीचा शिमगा आटोपल्यानंतरचे कवित्व सुरू झाले आहे.

The lesson of Delhi! | दिल्लीचा धडा!

दिल्लीचा धडा!

Next
ठळक मुद्दे भाजपच्या गोटातील मंडळीला आता अचानक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करणे भोवल्याचा साक्षात्कार झाला आहे.राष्ट्रीय मुद्यांभोवतीच प्रचार केंद्रित करणे, या बाबीही पराभवासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चाही आता भाजपच्या गोटात होत आहे. भावनात्मक मुद्यांमुळे वाहवत न जाता विकासाच्या मुद्यांच्या आधारे मतदान केले म्हणून तो प्रगल्भ आहे!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर अपेक्षेनुरुपच लागले. विविध वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी (एक्झिट पोल) जो कल दाखविला होता, त्याला अनुरुप असेच निकाल लागले. आता निवडणुकीचा शिमगा आटोपल्यानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने निवडणूक निकालांचे विश्लेषण करीत आहेत. आम आदमी पक्षाच्या विजयापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचा आनंद झालेली मंडळी, दिल्लीच्या ‘प्रगल्भ’ मतदाराने कसा धर्मांधतेचा पराभव केला, विकासाला कसे प्राधान्य दिले, पोकळ राष्ट्रवादाचा कसा फुगा फोडला, या धाटणीचे विश्लेषण करण्यात गुंतली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाप्रती सहानुभूती बाळगणारी मंडळी अथवा त्या पक्षाचे समर्थक पराभवासाठी विविध बहाणे शोधण्यात मग्न आहेत.
ज्यांचा विजय झाला त्यांना जल्लोष करण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि पराभवाचे तोंड बघावे लागलेल्यांना पराभवासाठी कारणे पुढे करीत त्यांच्या जखमा कुरवाळण्याचा हक्क असतो. दोघांचाही अधिकार अथवा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही; मात्र उभय बाजूंनी केल्या जात असलेल्या विश्लेषणांवर काही प्रश्नचिन्हे मात्र नक्कीच उपस्थित केली जाऊ शकतात.
दिल्लीचा मतदार जर धर्मांधतेच्या एवढाच विरोधात असेल, भाजपच्या राष्ट्रवादातील पोकळपणा जर त्याला कळून चुकला असेल, तर मग साधारणत: दहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला दिल्लीतील सातही जागा कशा बहाल केल्या होत्या? त्यापूर्वी दिल्लीतील तीनही महापालिकांमध्ये भाजपला भरघोस यश कसे दिले होते? ...आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच जर मतदारामध्ये ही प्रगल्भता आली असेल, तर मग २०१५ मधील विधानसभा निवडणुकीत त्याच मतदाराने आम आदमी पक्षाच्या पदरात आजच्यापेक्षाही मोठ्या यशाचे दान कसे टाकले होते? म्हणजे विधानसभा निवडणुकीत मतदार प्रगल्भ होतो आणि लोकसभा निवडणुकीत नादान होतो असे म्हणावे का? कारण २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतही त्याच मतदाराने भाजपला भरभरून यश दिले होते!
दुसऱ्या बाजूला भाजपच्या गोटातील मंडळीला आता अचानक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करणे भोवल्याचा साक्षात्कार झाला आहे. असाच साक्षात्कार त्यांना २०१५ मधील विधानसभा निवडणुकीनंतरही झाला होता. मग यावेळी ती चूक का दुरुस्त केली नव्हती? अतिशय आक्रमकरीत्या केलेला नकारात्मक प्रचार, अरविंद केजरीवाल यांच्यावरील वैयक्तिक टीका, स्थानिक मुद्यांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय मुद्यांभोवतीच प्रचार केंद्रित करणे, या बाबीही पराभवासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चाही आता भाजपच्या गोटात होत आहे. ज्यांना आधुनिक काळातील चाणक्य म्हणून संबोधले जाते ते जातीने प्रचाराची धुरा सांभाळत असताना, त्यांना हे कळले नव्हते का?
असे आणखी काही प्रश्न उभय बाजूंना विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे विजय अथवा पराभवाच्या सरधोपट कारणमीमांसेसाठी अडचणीची ठरू शकतात. गमतीची बाब म्हणजे मतदाराने भाजपच्या धर्मांधतेच्या राजकारणाचा, बनावट राष्ट्रवादी भूमिकेचा पराभव केला, अशी मांडणी करण्यात आघाडीवर असलेली मंडळी प्रामुख्याने आम आदमी पक्षाची नव्हे, तर भाजपच्या पराभवामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असलेल्या इतर पक्षांची आहे!
थोडा खोलात जाऊन विचार करणाºया कुणाही सुज्ञ व्यक्तीला हे कळायला वेळ लागणार नाही, की दिल्लीचा मतदार खरोखरच प्रगल्भ आहे; मात्र त्याने भाजपच्या धर्मांधतेच्या राजकारणाचा, उठसुठ केवळ राष्ट्रवादाच्याच गप्पा करणाºया भाजपचा पराभव करण्यासाठी आम आदमी पक्षाला साथ दिली म्हणून तो प्रगल्भ नाही, तर स्वत:चे हित कशात आहे, हे ओळखून मतदान केले म्हणून तो प्रगल्भ आहे! त्याने लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्यांना आणि विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्यांना प्राधान्य देऊन मतदान केले म्हणून तो प्रगल्भ आहे! भावनात्मक मुद्यांमुळे वाहवत न जाता विकासाच्या मुद्यांच्या आधारे मतदान केले म्हणून तो प्रगल्भ आहे!
दिल्लीतील भाजपच्या पराभवानंतर भाजपविरोधी पक्षांना जसा आनंद झाला आहे, तसाच आनंद कर्नाटकात कॉंग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यावर झाला होता. त्यावेळी कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभानिमित्त एकाच व्यासपीठावर येऊन तमाम विरोधी नेत्यांनी भाजपच्या पराभवाचा प्रारंभ झाल्याचे जाहीर केले होते. आताही काही विरोधी नेत्यांनी तेच वक्तव्य केले आहे. कर्नाटकमधील त्या अध्यायानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षाही मोठे बहुमत मिळाले आणि कुमारस्वामी सरकारही टिकू शकले नाही, हा ताजा इतिहास आहे. उलट २०१४ मधील पराभवानंतर विरोधी ऐक्याची भाषा बंद झाली असताना, भाजपला एकापाठोपाठ पाच राज्यांमध्ये पराभव सहन करावा लागला.


- रवी टाले    
ravi.tale@lokmat.com  
















 

Web Title: The lesson of Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.