Kartarpur Corridor: The need for extreme caution | कर्तारपूर कॉरिडॉर: आत्यंतिक सावधगिरीची गरज
कर्तारपूर कॉरिडॉर: आत्यंतिक सावधगिरीची गरज
भारतातील लक्षावधी शीख भाविकांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कर्तारपूर कॉरिडॉरचे अखेर शनिवारी उद्घाटन झाले. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉरिडॉरच्या चेक पोस्टचे उद्घाटन केले, तर तिकडे पाकिस्तानातपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नियाजी यांनी कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. कर्तारपूर हे पाकिस्तानात रावी नदीच्या तीरावर वसलेले छोटेसे शहर आहे. कर्तारपूरचा अर्थ होतो ‘देवाचे स्थान!’ हे शहर स्वत: गुरू नानक यांनी वसवले होते. त्यांनी आयुष्याचा अखेरचा कालखंड कर्तारपूरमध्येच व्यतित केला. ते निजधामास गेल्यानंतर हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांच्या अनुयायांनी गुरू नानक आमचेच असा दावा केला आणि त्यांची स्वतंत्र समाधीस्थळे उभारली. दोन्ही समाधीस्थळांमध्ये केवळ भिंत होती. पुढे रावीच्या पुराने दोन्ही समाधीस्थळे वाहून गेली; मात्र गुरू नानक यांच्या पुत्रांनी त्यांच्या अस्थी असलेला कलश वाचविला आणि रावीच्या दुसºया तीरावर अस्थींचे दफन केले. कालांतराने तिथे नवी वस्ती निर्माण झाली. ती आज डेरा बाबा नानक म्हणून ओळखली जाते, तर जिथे गुरू नानक यांनी देह ठेवला त्या ठिकाणी कर्तारपूर साहिब गुरुद्वारा उभारण्यात आला. स्वाभाविकपणे शिखांसाठी ते अत्यंत पूज्यनीय स्थळ आहे; मात्र फाळणीत तो भाग पाकिस्तानचा हिस्सा झाल्याने भारतातील शिखांना तिथे जाण्यात अनंत अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक भाविक भारताच्या सीमेतून दुर्बिणीच्या साहाय्याने कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेऊन समाधान मानायचे. कर्तारपूर कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे शीख भाविकांची मोठीच सोय झाली आहे; मात्र जे जे भारत आणि भारतीयांच्या सोयीचे असेल, त्यामध्ये खोडा घालण्याचा इतिहास असलेल्या पाकिस्तानने अचानक कर्तारपूर कॉरिडॉरच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतल्याने मनात शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. गतवर्षी कर्तारपूर कॉरिडॉरच्या उभारणीचा प्रारंभ झाला तेव्हाच शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या अमेरिकास्थित फुटीरवादी संघटनेने, कर्तारपूर कॉरिडॉर हा खलिस्तान निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीचा सेतू सिद्ध होईल, असे वक्तव्य केले होते. भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेले नवज्योतसिंग सिद्धू कर्तारपूर कॉरिडॉरच्या निर्मितीसंदर्भात प्रचंड उत्साहात असले तरी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मात्र त्यांची साशंकता उघडपणे बोलून दाखवली होती. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरागमन होण्याची भीती त्यांना खात आहे, हे उघड आहे. कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या काही दिवस आधी पाकिस्तानने एक ध्वनिचित्रफीत जारी केली होती. त्या चित्रफितीमध्ये जर्नैलसिंग भिंद्रानवालेसह तीन खलिस्तानवाद्यांची छायाचित्रे होती. पाकिस्तानचे मनसुबे स्पष्ट करण्यासाठी ती चित्रफीत पुरेशी आहे. कर्तारपूर कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी पाकिस्तान सरकारपेक्षाही पाकिस्तानी लष्कराने जास्त पुढाकार घेतला, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा काही तरी ‘छुपा अजेंडा’ आहे हे उघड आहे. भारतासोबत वैर हा पाकिस्तानी लष्कराचा एकमेव अजेंडा आहे. रणांगणात भारतीय सैन्यदलांकडून चारदा सपाटून मार खाल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराने काही दशकांपासून भारताला त्रास देण्यासाठी दहशतवादाचा सहारा घेतला आहे. पंजाबमध्ये काही दशकांपूर्वी फोफावलेली खलिस्तानवादी चळवळ आणि दहशतवादामागे पाकिस्तानी लष्कराचाच हात होता हे एक उघड गुपित आहे. आता कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून भाविकांच्या आवरणाखाली पाकिस्तानी लष्कर राजरोसपणे दहशतवाद्यांना भारतात घुसवू शकते. काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला दहशतवादाची आणखी एक आघाडी उघडण्याची नितांत गरज भासू लागली आहे. त्या अनुषंगाने त्यांना कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये सुसंधी दिसणे स्वाभाविक म्हणावे लागेल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नियाजी यांनी, कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करून पाकिस्तानी भूमीत दाखल होणाºया भाविकांनी पारपत्र बाळगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते; मात्र पाकिस्तानी लष्कराने आपल्याच पंतप्रधानाचा निर्णय फिरवला आणि पारपत्र अनिवार्य केले. भारतीय भाविकांच्या पारपत्रांचे स्कॅनिंग करून पाकिस्तानी लष्कर प्रचंड मोठा ‘डेटा बेस’ तयार करू शकते आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जगभर त्याचा वापर करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. एसएफजे आणि इतर काही खलिस्तानवादी संघटनांनी ‘सार्वमत २०२०’ची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये राहायचे की स्वतंत्र व्हायचे हा निर्णय घेण्यासाठी स्कॉटलंड जर सार्वमत घेऊ शकते, तर खलिस्तानसाठी आम्ही का घेऊ शकत नाही, हा त्यांचा सवाल आहे. हे कथित सार्वमत अवघ्या काही महिन्यातच घेण्याचा त्यांचा मानस आहे. कर्तारपूर कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानद्वारा करण्यात आलेल्या घाईमागे हेदेखील कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानी लष्कराचा पूर्वेतिहास लक्षात घेता, कर्तारपूर कॉरिडॉरसंदर्भात भारताने अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे. देशांतर्गत समीकरणांमुळे कॉरिडॉरला विरोध करणे तर भारत सरकारसाठी शक्य नव्हते; मात्र आता पाकिस्तानी लष्कराचे दुष्ट मनसुबे हाणून पाडण्यासाठी आत्यंतिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सरकार, गुप्तचर संघटना आणि सशस्त्र दले त्यामध्ये अपयशी ठरल्यास, देशाला अनेक वर्षे त्याची फळे भोगावी लागू शकतात!Web Title: Kartarpur Corridor: The need for extreme caution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.