पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:13 AM2022-03-02T08:13:42+5:302022-03-02T08:15:55+5:30

जगात बरेच काही विस्कटलेले आहे. या युद्धाने जगाची घडी आणखी विस्कटेल. आपण दीर्घकाळ चालेल, अशा शीतयुद्धाच्या कालखंडात प्रवेश करत आहोत.

kanwal sibal special interview western countries will make ukraine the second afghanistan | पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल

पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल

Next

संवादक:  शरद गुप्ता, वरिष्ठ संपादक, लोकमत समूह

रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? या हल्ल्याचे समर्थन करता येईल? 

सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन युक्रेन स्वतंत्र राष्ट्र झाले, त्यात या युद्धाची बीजे आहेत. रशियन सीमेवर ‘नाटो’चा प्रभाव वाढत गेल्याने धुसफूस सुरु झाली. रशियाने निषेध केला, पण तेव्हा तो कारवाई करण्याच्या स्थितीत नव्हता. २००९ साली जॉर्जिया आणि युक्रेनला ‘नाटो’चे सदस्यत्व देण्यात आले. फुटीर परगण्यांचा ताबा घेण्यापासून जॉर्जियाला रोखण्यासाठी रशियाने त्यावेळी लष्करी हस्तक्षेप केला. पश्चिमेला तो पुरेसा इशारा होता. पूर्वाश्रमीच्या रशियन प्रदेशात ‘नाटो’ने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर रशिया विरोध करेल, हे त्यातून दाखवायचे होते. बाल्टिक देशांची स्थिती वेगळी होती. युक्रेनने ‘नाटो’त सामील होण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा रशियाने ते प्रदेशातील आपले वर्चस्व आणि सार्वभौमत्वाला आव्हान मानले. २०१४ साली फ्रान्सच्या मध्यस्थीने रशिया व युक्रेनमध्ये मिन्स्क करार झाला. पूर्व युक्रेनमधील प्रदेशाला या कराराने स्वायत्तता दिली, परंतु हा करार मुळापासून राबविलाच गेला नाही. कारण युक्रेनमधील रशियन सैन्याला कोणताही भाग गमवायचा नव्हता. त्याने बळ वापरून तो ताब्यात घेतला. 

यामागे काही भौगोलिक-राजकीय कारणेही आहेत काय? 

रशियासाठी काळा समुद्र अतिशय महत्त्वाचा आहे. त्याशिवाय हा देश प्रभावी आरमार राखू शकत नाही आणि सिरियातील दोन तळ सांभाळणेही त्याला अशक्य होते. युक्रेन ‘नाटो’त सामील होऊ लागल्याने ते आणखी धोक्यात आले. युक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतराच्या लाटाही आल्या. त्यातले काही निर्णयांवर प्रभाव टाकणारे लोक होते. परराष्ट्र खात्यातील सध्या अवर सचिव असलेल्या व्हिक्टोरिया न्यूलँड त्यातल्या एक. 

नाटो किंवा रशियाबरोबर न जाता युक्रेन अलिप्त का राहू शकत नाही? 

तेच खरेतर सर्वांच्या हिताचे होईल. आपण अलिप्त राहू, असे ऑस्ट्रियाने १९५६ साली लेखी दिले. युक्रेनही आपण नाटोबरोबर जाणार नाही, असे आश्वासन देऊ शकतो. त्याक्षणी प्रश्न सुटून जाईल. 

...मग युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना नाटोबरोबर जाण्याची एवढी आग का? 

ते काही गंभीर, विचारी व्यक्तिमत्व नाही. ते विनोदी कलाकार होते. टीव्हीवरील एखादा वृत्त निवेदक उद्या भारताचा पंतप्रधान झाला तर काय होईल? युक्रेन अत्यंत भ्रष्ट समाज आहे. राजकारण्यांना कंटाळून लोकांनी झेलेन्स्की यांना निवडले. देशातील टोकाच्या राष्ट्रवादी कंपूच्या हातचे ते बाहुले आहेत. हा कंपू पोलंड आणि अमेरिकेच्या कलाने जाणारा आहे.

या युद्धाने जगाची घडी बदलेल की आहे तसेच चालू राहील? 

म्हणजे स्वित्झर्लंड आणि फिनलंड जसे नाटोबाहेर आहेत तसे. खरे तर जगात आधीच बरेच काही विस्कटलेले आहे. जगाचे सर्व कार्यक्रम पश्चिमी देश ठरवतात. संयुक्त राष्ट्रात ते सुधारणा होऊ देत नाहीत. आपण दीर्घकाळ चालेल, अशा शीतयुद्धाच्या  कालखंडात प्रवेश करत आहोत. रशियन टीव्हीवर त्यांनी बंदी आणली. दुसरा दृष्टिकोन ते का स्वीकारू शकत नाहीत? रशियाला शिक्षा दिली जात असेल, पण हे शुद्ध अराजक आहे. 

युरोपकडे जाणारी गॅस पाईपलाईन बंद करून रशिया सूड घेऊ शकेल ?  

नाही. रशिया असे कधी करेल, असे मला वाटत नाही. रशियासाठी तो बरकतीचा धंदा आहे, पण जर त्याने तसे केलेच तर जर्मनी, इटली आणि बाल्टिक देशांवर गंभीर परिणाम होतील.

युद्ध किती काळ चालेल? 

फार काळ नाही. रशियाने युक्रेनचे लष्करी बळ आधीच उद्ध्वस्त केले आहे. युक्रेनियन लोक रशियाचे बांधवच आहेत. त्यामुळे त्यांना क्षती पोहोचेल, असे रशिया वागणार नाही. लेनिनने निर्माण केला तेव्हाच युक्रेन देश झाला, असे पुतीन यापूर्वी म्हणालेले आहेत. युक्रेन म्हणजे सीमावर्ती भाग. रशियाला तेथे फक्त मैत्रीपूर्ण सरकार हवे आहे.

युक्रेनमध्ये रशियाचे कळसूत्री सरकार पश्चिमी देश स्वीकारतील काय? 

जर युक्रेनी सैन्याने नवे सरकार स्वीकारायचे ठरवले आणि अतिटोकाच्या उजव्या गटांविरुद्ध भूमिका घेतली तर परिस्थिती निवळेल. मात्र, पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतच राहतील. हा घाणेरडा खेळ आहे.

 

Web Title: kanwal sibal special interview western countries will make ukraine the second afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.