जंगली अस्वलांशी लढतेय जपानी आर्मी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:16 IST2025-11-15T10:16:03+5:302025-11-15T10:16:16+5:30
Japan News: जपानमधील जंगलांमधून आता जंगली अस्वलं मोठ्या प्रमाणावर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. माणसांवर त्यांचे सातत्यानं हल्ले सुरू आहेत. या जंगली अस्वलांशी लढण्यासाठी जपानला थेट आपली आर्मीच आता रस्त्यावर आणावी लागली आहे.

जंगली अस्वलांशी लढतेय जपानी आर्मी!
जपानला अलीकडच्या काळात नवनवीन आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तर त्यांना कायमच जागरूक आणि जागृत राहावं लागत आहे. देशातील वाढती वृद्धांची संख्या, तरुणाईचा लग्नाला आणि मुलं जन्माला घालण्यास नकार... हे प्रश्न तर त्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. आता देशांतर्गत नव्या प्रश्नानं त्यांना घेरलं आहे आणि त्यासाठी त्यांना चक्क त्यांची आर्मीच रस्त्यावर उतरवावी लागली आहे.
काय आहे हा प्रश्न आणि तो इतका गंभीर का झालाय?
जपानमधील जंगलांमधून आता जंगली अस्वलं मोठ्या प्रमाणावर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. माणसांवर त्यांचे सातत्यानं हल्ले सुरू आहेत. या जंगली अस्वलांशी लढण्यासाठी जपानला थेट आपली आर्मीच आता रस्त्यावर आणावी लागलीआहे. जपानचे सैनिक या अस्वलांशी आता 'युद्ध' करताहेत ! या अस्वलांना पकडण्यासाठी आणि ते शक्य झालं नाही तर त्यांना मारण्यासाठी ठिकठिकाणी आर्मी तैनात करण्यात आली आहे.
गेल्या सात महिन्यांत अस्वलांनी मानवी वस्त्यांवर शंभरपेक्षा जास्त हल्ले केले आहेत. त्यात आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. रात्री-बेरात्री केव्हाही घरात, मानवी वस्त्यांमध्ये येऊन या अस्वलांनी हल्ले करणं सुरू केल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यासाठी पोलिस, सेल्फ डिफेन्स फोर्सेसच्या तुकड्या, आर्मी.. असे सारेच सज्ज झाले असून, त्यांनी रस्त्यांवर गस्त घालायला सुरुवात केली आहे. सुरक्षेचा प्राथमिक उपाय म्हणून नागरिकांनी घरात घंट्या ठेवण्याचं आवाहन सरकारनं नागरिकांना केलं आहे. अस्वलं दिसली की, नागरिकांनी घंटी वाजवावी. त्यामुळे कदाचित ही अस्वलं लांब जातील आणि या घंटीच्या आवाजानं पोलिस, आर्मीची मदतही नागरिकांना मिळू शकेल, हा यामागचा हेतू, वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, येथील डोंगराळ भागांमध्ये अस्वलांचा उद्रेक झपाट्यानं वाढतो आहे. सर्वाधिक हल्ले अकिता प्रांत आणि शेजारच्या इवाते शहरात झाले आहेत. मृत्युमुखी पावलेल्या आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्याही तिथेच जास्त आहे. नागरी वस्तीत जंगली अस्वलं दिसण्याच्या प्रकारात जवळपास दहापटीनं वाढ झाली आहे. केवळ अकिता प्रांतात आतापर्यंत सुमारे दहा हजार अस्वलं नागरी वस्तीत दिसली आहेत आणि त्यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलं आहे.
अगोदर स्थानिक पातळीवरील कर्मचारी, पोलिसांच्या मदतीनं अस्वलांचा उपद्रव थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं प्रांताच्या गव्हर्नरनं शेवटी सैन्याची मदत मागितली. अस्वलांना ठार मारण्याचं काम प्रशिक्षित शिकाऱ्यांकडे सोपवलं गेलं आहे. अलीकडच्या काही महिन्यांपासून जपानमध्ये अस्वलांची दहशत वाढली आहे. त्यांचे हल्ले सुपर मार्केट आणि शाळांपर्यंत पोहोचले आहेत.
अस्वलांच्या भीतीनं अनेक शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अस्वलांच्या भीतीमुळे लोकांनी बाहेर जाणं थांबवलं आहे. अनेक कार्यक्रम पुढे ढकलले गेले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सैन्य काजुनो, ओडेट आणि किताअकिता शहरांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी तैनात असणार आहे.